जाणून घ्या, भारतीय पुरातत्त्वशास्त्र विषयक सर्वेक्षणाची स्थापना कशी झाली?

पुरातत्त्वशास्त्रविषयक सर्वेक्षण विभागाने देशभरात तब्बल ३,६५० ठिकाणी संशोधन-उत्खनन करत स्मारके-संग्रहालये उभारली आहेत.
भारतीय पुरातत्त्वशास्त्र विषयक सर्वेक्षण
भारतीय पुरातत्त्वशास्त्र विषयक सर्वेक्षणesakal
Updated on

सुधीर फाकटकर

मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीचा इतिहास काही लाख वर्षांचा आहे, हे आपण जाणतोच. या वाटचालीत मानवाच्या आणि त्या त्या वेळच्या वातावरणाच्या असंख्य पाऊलखुणा कळत-नकळत मागे राहिलेल्या आहेत.

काळाच्या आणि भूगर्भाच्या उदरात गडप झालेल्या किंवा दृष्टीआड झालेल्या या खुणा आधुनिक युगातील मानवाच्या बघण्यात येऊ लागल्या.

प्रगत मानवाने वैज्ञानिक निकषांवर या पाऊलखुणांच्या आधारे आपल्या पूर्वजांचे व्यवहार अभ्यासण्यास सुरुवात केली.

यातून आकाराला आले पुरातत्त्वशास्त्र -आर्किऑलॉजी. प्राचीन अवशेषांचा वेध घेणाऱ्या या विज्ञानाचा आरंभ आपल्या देशात अठराव्या शतकात काही अभ्यासू ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी शोध घेत एशियाटिक सोसायटीत संग्रहित केलेल्या पुरातन वस्तूंमुळे झाला.

यातून १८६१मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्था (Archaeological Survey of India -ASI) आकाराला आली.

ब्रिटिश राजवट संपेपर्यंत विस्तारत गेलेली ही संस्था स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत आहे.

भारतीय पुरातत्त्वशास्त्र विषयक सर्वेक्षण
पुणे : शनिवारवाड्यासह जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाची स्मारके खुली

देशाच्या कानाकोपऱ्यात प्राचीन खाणाखुणांचा मागोवा घेत त्यांचा अभ्यास करणे, आवश्यकता असल्यास उत्खनन करणे, मिळालेल्या अवषेशांचे योग्य जतन करणे, संबंधित स्थळ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करणे, पुरातत्त्वविषयक उपयुक्त संस्थांशी साहचर्य प्रस्थापित करणे आणि पुरातत्त्व विषयक संग्रहालये निर्माण करणे असे या संस्थेचे उद्देश आहेत.

यासाठी ऐतिहासिक शहरे केंद्रस्थानी ठेवत पुरातत्त्व संशोधन आणि उत्खननासाठी देशात एकूण ३९ मंडल-प्रदेश निश्‍चित करण्यात आले आहेत.

संस्थेत प्राचीन इतिहास अभ्यास, उत्खनन, शिलालेख संशोधन, वास्तुरचनाशास्त्र, उद्यान, पाण्याखालील उत्खनन आणि विज्ञान अशा शाखा आहेत.

दिल्लीमध्ये इंडिया गेटच्या पूर्वेला लागून असलेल्या पुराना किल्ला परिसरात ‘मध्यवर्ती प्राचीन अवशेष जतन सुविधा’ उभारण्यात आलेली आहे.

तर संस्थेच्या मुख्यालयात लाखभर पुस्तके, हजारो छायाचित्रे, अहवाल आणि नियतकालिकांनी समृद्ध असे मध्यवर्ती ग्रंथालयही आहे.

भारतीय पुरातत्त्वशास्त्र विषयक सर्वेक्षण
नद्या पुनरुज्जीवित केल्यास पाण्याची वणवण थांबेल ज्येष्ठ पुरातत्त्व व मूर्तिशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे प्रतिपादन

पुरातत्त्वशास्त्रविषयक सर्वेक्षण विभागाने देशभरात तब्बल ३,६५० ठिकाणी संशोधन-उत्खनन करत स्मारके-संग्रहालये उभारली आहेत.

आपल्या देशातील ४२ जागतिक वारसा स्थळे आणि पुरातन अवशेष असलेल्या अन्य ४६ ठिकाणी पुरातत्त्वशास्त्राशी संबंधित संग्रहालये आहेत.

यातील अनेक ठिकाणांची माहिती ३६० अंशातील छायाचित्रण तसेच ध्वनिचित्र फितींच्या माध्यमातून मिळण्याची सुविधा संस्थेच्या संकेतस्थळावर आहे.

पुरातत्त्वशास्त्रविषयक सर्वेक्षण विभागाने आजपर्यंत हजारोंच्या संख्येने संशोधन-उत्खनन अहवाल तसेच प्राचीन अवशेष किंवा उत्खनन झालेल्या ठिकाणांविषयीच्या पुस्तिका, ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

या विभागाचे वार्षिक अहवाल तसेच पुरातत्त्वशास्त्रविषयक जगभरातील मान्यवर अभ्यासकांची व्याख्याने, सादरीकरणेदेखील संस्थेच्या संकेतस्थळावर आहेत. भारताचा सांस्कृतिक-ऐतिहासिक अभ्यास करणाऱ्यांसाठी हा मौलिक ठेवा आहे.

नोएडा येथे, याच संस्थेचा भाग असणाऱ्या, पुरातत्त्वशास्त्रविषयक संस्थेत पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी पुरातत्त्वशास्त्रातील खास पदविका अभ्यासक्रमाचे आयोजन केले जाते.

तर प्राचीन अवषेशांसंदर्भात संरचनात्मक जतन, रासायनिक जतन, शिलालेख-अंकशास्त्र या विषयांवरील कार्यशाळाही घेतल्या जातात. यातून पुरातत्त्वशास्त्र क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण होते. कला, वाणिज्य, विज्ञान तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही संस्थेत कामाच्या संधी मिळू शकतात.

भारतीय पुरातत्त्वशास्त्रविषयक सर्वेक्षण

धरोहर भवन, टिळक मार्ग, दिल्ली.

संकेतस्थळः https://asi.nic.in

-----------------

भारतीय पुरातत्त्वशास्त्र विषयक सर्वेक्षण
Nanded News : तामसा येथील ऐतिहासिक गौतमतीर्थाच्या जीर्णोद्धाराची आवश्यकता ; पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.