गिरिनाथ भारदे
कांचीपुरम नगरीची जमीन सपाट आणि पूर्णतः माती तसेच वाळूयुक्त आहे. त्यामुळे प्राचीन काळी येथे वाळूमधून पूजेसाठी शिवलिंगाची निर्मिती करणे स्वाभाविक आहे. अर्थातच, हे शिवलिंग पंचमहाभूतांपैकी ‘पृथ्वी’ या तत्त्वाचे प्रतीक झाले यात नवल नाही.
अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिका ।
पुरी द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायकाः ॥
अशी ही मोक्षदायिनी कांची नगरी म्हणजेच कांचीपुरम मंदिरांची नगरी म्हणून ओळखली जाते. या कांचीपुरममध्ये अनेक मंदिरांच्या मांदियाळीत एक महत्त्वाचे आणि भव्य मंदिर समोर येते, ते म्हणजे पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्त्वाचे रूप असणारे एकाम्बरेश्वर मंदिर.
पृथ्वी हा शब्द पृथा म्हणजेच जमीन या अर्थाने आपल्यासमोर येतो. या सृष्टीमधील जे जे जडतत्त्व आहे - उदाहरणार्थ दगड, माती, धातू - ते पृथ्वी तत्त्वापासून तयार झालेले आहेत असे आपण म्हणू शकतो. त्यावरून काठिण्य आणि स्थैर्य हे या तत्त्वाचे गुणविशेष होत. समर्थ रामदासांनीदेखील दासबोधात पृथ्वी तत्त्वाचे वर्णन केले आहे - जें जें जड आणी कठिण । तें तें पृथ्वीचें लक्षण ।