आपल्या शरीरात वीज तयार होते आणि ती शरीरभर वाहते हे माहिती आहे तुम्हाला? आपल्या शरीराच्या सगळ्या हालचाली आणि शरीरातील क्रिया विजेवर चालतात, असे म्हटले तर काय वाटेल? उदाहरणार्थ,
छातीत दुखायला लागल्यावर ईसीजी काढतात, हा ईसीजी किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राम, म्हणजेच हृदयाच्या स्नायूंमधून वाहणाऱ्या विजेच्या प्रवाहाचा आलेख असतो.
मेंदूच्या अंतर्गत कार्यामध्ये वाहणाऱ्या विद्युतप्रवाहाचा आलेख इलेक्ट्रोएनसिफॅलोग्राम किंवा ईईजी या आलेखाने मिळतो. अपस्मार किंवा फिट्सच्या विकाराच्या निदानात हा ईईजी महत्त्वाचा ठरतो.
एवढेच काय, आपल्या शरीराच्या हालचाली ज्या स्नायूंमुळे होतात, त्यांना मज्जातंतू जोडलेले असतात, या मज्जातंतूंमधून आणि स्नायूंमधूनही वीज वाहते, मज्जातंतूंच्या आणि स्नायूंच्या संभाव्य विकाराच्या निदानासाठी त्यांचेही आलेख काढले जातात. त्यांना इलेक्ट्रोमायोग्राफी आणि नर्व्ह कंडक्शन स्टडीज म्हणतात.