World Emoji Day : इमोजी बोलक्या झाल्या मग शब्द मुके होणार का ?

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात या चित्रलिपीचा वापर एवढा वाढला, की वेगवेगळ्या शब्दांना इंग्रजी भाषेत अधिकृतपणे सामावून घेतल्याचा पुरावा असणाऱ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘इमोजी’ हा मूळ जपानी शब्द स्वीकारला.
World Emoji Day
World Emoji DaySakal
Updated on

मोबाईलमुळे माणसाचं आयुष्य बदललं, हे कितीही खरं असलं तरी ते आता घासूनघासून अगदी गुळगुळीत झालेलं विधान आहे हेही तितकंच खरं. हे वाक्य वाचताही न येणारं आताचं पोर तर आता ह्या असल्या गुळगुळीत वाक्याकडे लक्ष देणार नाही, कारण मोबाईलपूर्व आयुष्य त्याला माहितीच नाही. आणि त्याला ते उलगडून बिलगडून सांगण्यातही काही अर्थ नाही, कारण मोबाईल नव्हते या घटनेची कल्पनाही त्याला करता येणार नाही.

तरीही मोबाईलमुळे माणसाचं आयुष्य बदललं. मुख्य म्हणजे दोन्ही हातांच्या पंजांना अनुक्रमे उजवीकडे आणि डावीकडे असणाऱ्या अंगठ्यांचा (केवळ मेसेज टाइप करताना नव्हे तर मोबाईल लॉक-अनलॉक करतानाही) खरंच उपयोग होऊ शकतो; आणि परिणामी माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे यात माणसाच्या बुद्धिमत्तेइतकाच वाटा माणसाला अंगठा असण्याचा आहे, हे विधान खरं आहे, हे पुन्हा सिद्ध झालं ते केवळ मोबाईलमुळे.

पण अंगठा मुख्य मुद्दा नाही. तो आहे मोबाईलमुळे जगण्यात झालेल्या बदलांचा. आता खरंतर यावरही खूप लोकांनी खूप लिहिलं बोललं आहे, रागालोभादी सर्व भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांत; शास्त्रीय भाषेत, अशास्त्रीय भाषेत वगैरे. पण यातलाच एक बदल सेलिब्रेट करण्यासाठी जगाने चक्क एका दिवसाची योजना केली आहे.

हा बदल आहे भाषेच्या वापरातला, आणि पर्यायाने भाषेतलाही, आणि इमोजी –चित्रखुणा म्हणू हवं तर –हे त्या बदलाचं दृष्य स्वरूप. आपल्याला सगळ्यांना एका वेगळ्या अर्थाने आपल्या खापर-खापर-खापर-खापर-खापर-खापर आज्या-पणज्यांनी संवादासाठी शोधलेल्या चित्रलिपीच्या जवळ नेणाऱ्या या चित्रखुणा. प्रत्येक वर्षातल्या जुलै महिन्यातली १७ तारीख या इमोजींसाठी राखून ठेवली आहे.

World Emoji Day
World Emoji Day: सर्वांत पहिला इमोजी कोणी तयार केला माहितीये का?

शब्दांचा, भाषेचा प्रवास संवादापासून ते लिपीपर्यंत होण्याच्या कितीतरी आधीपासून गुहेत राहणारे आपले पूर्वज गुहांच्या भिंतीवर, सड्यांवर पसरलेल्या कातळांवर चित्र काढून म्हणा, खोदून म्हणा व्यक्त होत होते. मात्र संशोधकांच्या मते मोहें-जो-दडो लिपी ही खऱ्या अर्थाने चित्रलिपी.

पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांत, वेगवेगळ्या कालखंडांत वावरणाऱ्या माणसाने मग आपली आपली लिपी आणि पर्यायाने लेखनपद्धती विकसित केली. लिपीमुळे विचारांच्या देवाणघेवाणीला एक सशक्त माध्यम मिळाले.

तंत्रज्ञानाबरोबर वाटचाल करणाऱ्या आजच्या लेखनपद्धतीला या चित्रखुणांमुळे एक वैश्विक परिमाण मिळाले आहे. पृथ्वीतलावरची कोणतीही भाषा बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या लोकांना समजू शकेल अशा तऱ्हेने आपले राग, लोभ, चिंता, आनंद, दुःख, भीती, हसू, आसू, आश्चर्य आणि खोड्याळपणाही व्यक्त करणारी चित्रभाषा.

आज जगातले अगणित लोक आपापल्या भावना व्यक्त करण्यासाठी या चित्रभाषेचा वापर करताहेत, दरवर्षी या भाषेतल्या चित्रांमध्ये भर पडते आहे.

विसावं शतक संपतासंपता ह्या इमोजी अवतरल्या. ‘व्यापक’ या शब्दाची सगळी व्याप्ती दाखवणारे प्रदेश अगदी थोडक्या काळात काबीज करणे हे आजच्या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य. त्याला इमोजी तरी कशा अपवाद असतील! अवघ्या दशकभरात इमोजी जपानमधल्या त्यांच्या मूळ स्थानापासून निघून जगभरात पसरल्या. मोबाईल वापरणाऱ्यांच्या कीपॅडवर इमोजी आल्या तेव्हा फक्त दोनशे-पावणे दोनशेच होत्या, आता कितीतरी आहेत.

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात या चित्रलिपीचा वापर एवढा वाढला, की वेगवेगळ्या शब्दांना इंग्रजी भाषेत अधिकृतपणे सामावून घेतल्याचा पुरावा असणाऱ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘इमोजी’ हा मूळ जपानी शब्द स्वीकारला.

इतकंच नाही आनंदाश्रू दर्शवणारी किंवा हसून हसून डोळ्यांत पाणी आले बुवा असं सांगणारी –फेस विथ टिअर्स ऑफ जॉय – चित्रखूण २०१५मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीचा ‘वर्ड ऑफ द इयर’ होती. एखाद्या चित्रखुणेने शब्दाचा मान मिळवण्याचा हा प्रसंग भाषेच्या प्रांतातला विरळा, आणि बदल अधोरेखित करणाराच म्हणायला हवा. अमेरिकेच्या अर्थसंकल्पात तर इमोजी त्याआधीच जाऊन बसल्या होत्या.

World Emoji Day
ऑफिसचा मेल करताना Emoji वापरता का? Research काय सांगतो वाचा!

मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते ‘सुरक्षितपणे’ भावना व्यक्त करण्याचा इमोजी हा उत्तम मार्ग आहे, काहीवेळा वेळ साजरी करण्याची ती पळवाटही असू शकते, अलीकडच्या कॉर्पोरेट भाषेत ‘विन-विन सिच्युएशन’ म्हणतात तशी. नुसताच उंचावलेला अंगठा आहे, अंगठ्याला तर्जनी टेकवून केलेली सुंदर अशा अर्थाची खूण आहे, अचंबित झालेला चेहरा आहे (हे चेहरेही सहा वेगवेगळ्या वर्णांचे आहेत), हृदय, फुलं-पानं-प्राणी, सूर्य, चंद्र, दिवे, यंत्रं, वाहनं अशा असंख्य चित्रखुणांचं, शिष्टाचार सांभाळून आपल्या भावना पोहोचवण्याचं, हे माध्यम लोकप्रिय न होतं तरच नवल.

नमस्काराची एकच इमोजी घ्या. ‘धन्यवाद’पासून ते ‘प्रणाम’, ‘आभारी आहे’, ‘समजलं’, ‘कऽऽ ळ्ळं’, ‘माफ कर’मार्गे ‘धन्य आहात/ आहेस’पर्यंत कितीतरी गोष्टी या एका नमस्कारातून व्यक्त करता येऊ शकतात.

World Emoji Day
Heart Emoji : हृदयाचा आकार वेगळाच असताना 'लाल दिल' हे हृदयाचं प्रतीक कसं बनलं ?

या चित्रखुणांमुळे शब्दांचा वापर खुंटेल की काय, अशी एक रास्त भीतीही काही काळ व्यक्त होत होती. पण ही भीती काही संशोधकांनी निराधार ठरवली आहे. शब्द लिहीत असतानाच ते शब्द ‘व्यक्त’ होण्यासाठी इमोजींचा लिहिणाऱ्याला अधिक उपयोग होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

भाषा ही प्रवाही हवीच. त्या प्रवासात शब्दांचं महत्त्व उणावू न देता त्या शब्दांना चित्रखुणांची जोड देता आली तर काही वेळा शब्द नीट उलगडतीलही आणि काही वेळा शब्दांची बचतही होईल.

World Emoji Day
World Emoji Day : इवलीशी Emoji व्यक्त करते प्रेम,भावना अन् बरंच काही, जाणून घ्या इतिहास अन् महत्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.