धर्म सांभाळणाऱ्यांना धर्म सांभाळतो अशा अर्थाचा एक श्लोक महाभारतातल्या यक्ष-युधिष्ठिर संवादात ज्येष्ठ पांडवाच्या तोंडी आहे. एका शब्दाचा बदल करून हा श्लोकार्थ मनुष्याचा जीवनाधार असणाऱ्या निसर्गालाही जसाच्या तसा लागू होतो.
प्रकृति रक्षति रक्षितः। निसर्ग सांभाळणाऱ्यांना निसर्ग सांभाळतो!!
जगभरात अनुभवाला येत असलेला नैसर्गिक परिसंस्थांचा ऱ्हास आता एका अक्राळविक्राळ संकटाच्या रूपात तुमच्याआमच्या उंबरठ्यावर उभा आहे. जगातल्या कोणालाच याची जाणीवच नाही असे नाही, जगाच्या कोणत्याकोणत्या कोपऱ्यातली सुज्ञ मंडळी जगाला या संकटाची जाणीव करून देत असतात; जगभरातल्या देशांच्या सरकारांनी यासंदर्भाने काही करावे असा आग्रह धरत असतात. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे निसर्ग रक्षणाच्या आघाडीवर काही काही घडतही असते.
अशाच काही काही घडण्यातला अलीकडचा अध्याय म्हणजे युरोपीय समुदायाने संमत केलेला ‘नेचर रिस्टोरेशन लॉ’ (एनआरएल) –निसर्ग पुनरुज्जीवन किंवा निसर्ग पुनर्बांधणी कायदा. युरोपीय समुदायाचे २०३० वर्षापर्यंतचे जैवविविधता धोरण आणि युरोपभरातले प्रशासक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा समावेश असणाऱ्या युरोपियन सस्टेनेबल डेव्हलपमेंट नेटवर्कच्या युरोपीय ग्रीन डीलचा हा एक भाग आहे.
भारतातले विलक्षण भौगोलिक व पर्यावरणीय वैविध्य आणि आपल्या एकूण भौगोलिक विस्तारापैकी जवळजवळ एक तृतीयांश भूगोलाला आलेली अवकळा पाहता भारताने असे एखादे पाऊल उचलावे अशी चर्चा या कायद्याच्या निमित्ताने आता सुरू झाली आहे.