सुधीर शं. कुलकर्णी
सातव्या दिवशी ब्रेकफास्ट करता करता आमची बोट सफारीचं शेवटचं ठिकाण असलेल्या पासाऊला पोहोचली. जर्मनीच्या बव्हेरिया भागातलं हे शहर इन (Inn), इल्झ (Ilz) व डॅन्यूब या तीन नद्यांच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी डॅन्यूबमार्गे जगभर व्यापार होत असे. त्यामुळे या शहराला महत्त्व प्राप्त झालं.
कोविड विड महासाथीचा ओघ ओसरल्यानंतर, २०२२च्या उन्हाळ्यात माझी पत्नी शीलानं आणि मी यूरोपमधल्या एखाद्या नदीवर क्रूझनं सफर करण्याचं ठरवलं. ह्याआधी केलेल्या चीन आणि इजिप्तच्या दौऱ्यात, अनुक्रमे यांगत्से आणि नाईल नद्यांवरच्या सफारींचा अनुभव गाठीशी होताच. युरोपमध्ये आम्ही हंगेरीची राजधानी बुडापेस्टहून निघणाऱ्या डॅन्यूब नदीवरच्या आठ दिवसांच्या क्रूझ सफरीची निवड केली. जर्मनीतल्या पासाऊला ही क्रूझ (Passau) संपणार होती.
डॅन्यूब नदीची लांबी २ हजार ८५७ किलोमीटर (१ हजार ७७५ मैल) असून, वोल्गा नदीनंतर ती युरोपमधली दुसरी सर्वात मोठी नदी आहे. वोल्गा नदी फक्त रशियातून वाहते. त्याउलट, डॅन्यूब युरोपातील एकूण १० देशांतून प्रवास करते. आमची क्रूझ त्यातल्या चार देशांमधून जाणार होती.