त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्।
गणपती बाप्पा हे आपल्या जीवनाचे आणि मनाचे आधारस्थान आहेत. गणेशोत्सवाच्यानिमित्ताने गावे, शहरे सजली आहेत; विविधरंगी रोषणाईने उजळली आहेत.
आनंद आणि ऐक्याचा संदेश देणारा हा उत्सव राज्याच्या कानाकोपऱ्यात मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. अनेक गावा-शहरांमधल्या सार्वजनिक गणपती मंडळांना वैभवशाली परंपरा आहे. दहा दिवसांच्या उत्सवापलीकडे जात यातील अनेक मंडळे वर्षभर समाजोपयोगी उपक्रम करत असतात. महाराष्ट्र आणि गोव्यातील काही प्रमुख शहरांमधील काही सार्वजनिक गणपती मंडळांचा हा धावता परिचय...
श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. शहाजीराजे भोसले यांनी १६३६मध्ये पुण्यात लाल महाल बांधला, तेव्हा जिजाबाईंनी या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली, त्यावेळी या गणपतीला प्रथम मान दिला गेला. कसबा गणपतीचा सार्वजनिक गणेशोत्सव १८९३पासून सुरू झाला. कसबा गणपती मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ असून येथेच मंडळातर्फे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. कसबा गणपती मंडळ धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी नावाजलेले आहे. दरवर्षी मंडळातर्फे ७५ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. तसेच, नगर जिल्ह्यातील खंडोबाची वाडी हे दुष्काळी गाव दत्तक घेऊन त्याचा विकास मंडळातर्फे केला जातो.
१८९३पासून या मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. श्री तांबडी जोगेश्वरी माता ही पुण्याची ग्रामदेवता. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला तेव्हा या मंडळाच्या गणपतीला मानाच्या दुसऱ्या गणपतीचे स्थान देण्यात आले. येथील श्रीगणेशाची उत्सवमूर्ती दरवर्षी शास्त्रशुद्ध पद्धतीने शाडू मातीतून तयार केली जाते. जुन्या काळातील गंजिफाच्या खेळात निरनिराळ्या चित्रांतील हत्तीच्या चित्रणाप्रमाणे, पूर्ण चेहरा असलेले मुख, हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. मंडळाच्या शताब्दी वर्षापर्यंत श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक सरदार नातूंकडील पेशवेकालीन वैभव सांगणाऱ्या पालखीतून निघत असे. त्यानंतर चांदीची पालखी तयार करण्यात आली. १८९६पासून उत्सवातील करमणुकीच्या कार्यक्रमांत मेळ्यांचा मोठा सहभाग होता.
गुरुजी तालीम ही पुण्यातील जुन्या काळातील सर्वात मोठी तालीम. १८८७पासून गुरुजी तालीम गणपती उत्सवाची सुरुवात झाली. भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख हशम वल्लद लालाभाई व रुस्तुमभाई (नालबंद बंधू) या तालमीच्या गुरुवर्यांनी या मंडळाची स्थापना केली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो. सुरुवातीस तालमीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होत असे, पण कालांतराने लक्ष्मी रोड मोठा झाल्यावर गणपती मंदिरासमोर मांडव टाकून उत्सव साजरा होऊ लागला. पुण्याचा राजा म्हणून या गणपतीची महती आहे. या गणपतीची विसर्जन मिरवणूक फुलांच्या रथातून काढतात.
लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या पुण्यातील पहिल्या काही मंडळींंपैकी एक होते तुळशीबागवाले. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी काही सहकाऱ्यांसह तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापना करून उत्सवाला प्रारंभ केला. त्यावेळी मानाच्या गणपतींचा क्रम ठरवताना तुळशीबागवाले यांच्या गणपतीला चौथे स्थान मिळाले. दातार, कर्वे आणि खटावकर यांनी उत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक देखावे, हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. दत्तात्रय खटावकर यांनी मंडळासाठी केलेले अनेक देखावे नावाजले गेले. येथील श्री गणेशाची मूर्ती १३ फूट भव्य उंचीची आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, तेव्हापासूनच केसरी संस्थेच्या गणेशोत्सवालाही प्रारंभ झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक पुण्यात विंचूरकरांच्या वाड्यात राहत असत. त्या वाड्यातील पटांगणात मंडप घालून हा उत्सव साजरा होत असे. त्यावेळी टिळक एखादे व्याख्यान देत, आणि इतरत्रही व्याख्यानासाठी जात असत. १९०५पासून हा उत्सव केसरीवाड्यात होतो. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते.