किशोर पेटकर
गतवर्षीपर्यंत कारकिर्दीत ग्रँडस्लॅमची एकही अंतिम फेरी न गाठलेल्या यानिक सिनर या जिद्दी टेनिसपटूची यंदाची कामगिरी स्पृहणीय ठरली.
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू यानिक सिनरने यूएस ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. २३ वर्षीय यानिकने न्यू यॉर्क शहरातील आर्थर अॅश स्टेडियमवर अमेरिकन (यूएस) ओपन टेनिस स्पर्धा जिंकणारा पहिला इटालियन पुरुष हा मान मिळवताना अप्रतिम खेळ केला.
२०२४च्या सुरुवातीस मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा सिनर हा पुरुष एकेरीत सध्या अग्रस्थानी असलेला खेळाडू. कारकिर्दीतील पहिले दोन ग्रँडस्लॅम किताब एकाच वर्षी जिंकणारा तिसराच टेनिसपटू. यापूर्वी असा पराक्रम जिमी कॉनर्सने १९७४मध्ये, तर गिलेर्मो व्हिलास याने १९७७मध्ये केला होता.