Flashback : चित्रपटात फ्लॅशबॅक दाखवणे ही देखील कलाच..!

नायकाला किंवा नायिकेला आठवणी कशा छळत आहेत याची अनुभूती प्रेक्षकांना देण्यासाठी फ्लॅशबॅक तंत्राचा नावीन्यपूर्ण पद्धतीने वापर केला जातो.
flashback in movie
flashback in movieesakal
Updated on

फ्लॅशबॅकमध्ये जाणे आणि पुन्हा मूळ कथेकडे परतणे हे पटकथाकार आणि दिग्दर्शक दोघांचे कौशल्य असते.

आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलण्याचा अनुभव प्रेक्षकांना देण्याकरिता, नायक किंवा नायिका इतकी उदास का आहे याची कारणमीमांसा करण्यासाठी; नायकाला किंवा नायिकेला आठवणी कशा छळत आहेत याची अनुभूती प्रेक्षकांना देण्यासाठी फ्लॅशबॅक तंत्राचा नावीन्यपूर्ण पद्धतीने वापर केला जातो.

सुहास किर्लोस्कर

काही चित्रपटांत एखादी कथा सलग न सांगता ‘फ्लॅशबॅक’ तंत्राचा वापर करून सांगितलेली असते. फ्लॅशबॅक म्हणजे मूळ कथा पुढे जाण्यासाठी गतकाळामध्ये डोकावून ‘बघणे’.

आपण सर्वजण मनातल्या मनात आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेताना असे प्रसंग आठवणींतून डोळ्यांसमोर आणून ‘पुन्हा बघत’ असतो. साहित्यामध्ये तसेच चित्रपटाची पटकथा लिहितानाही हे तंत्र वापरले जाते.

फर्डिनंड झेका या दिग्दर्शकाने १९०१मध्ये हिस्टरी ऑफ क्राईम या फ्रेंच मूकपटामध्ये या तंत्राचा पहिल्यांदा वापर केला.

नंतर १९१८मध्ये प्रदर्शित झालेला हार्ट्‌स ऑफ द वर्ल्ड आणि १९३१ सालच्या सिटी स्ट्रीट्स अशा चित्रपटांमध्येही हे तंत्र वापरण्यात आले आणि १९३९पासून या तंत्राचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करण्यास सुरुवात झाली.

सिटीझन केन (१९४१) या चित्रपटाच्या सुरुवातीला नायक चार्ल्सचे निधन होते आणि त्याचवेळी तो शब्द उच्चारतो ‘रोझबड’.

त्यानंतरची कथा फ्लॅशबॅक तंत्राचा प्रभावी वापर करून ऑर्सन वेल्स यांनी पटकथा-दिग्दर्शनामधून दाखवली. सत्यजित राय यांनी जलसाघर (१९५९), नायक (१९६६), प्रतीद्वंद्वी (१९७२) अशा चित्रपटात हे तंत्र वापरले.

भारतीय प्रेक्षकांमध्ये हे तंत्र लोकप्रिय करण्याचे श्रेय गुलजार यांना जाते.

अचानक हा चित्रपट फ्लॅशबॅक तंत्राचा वापर कसा करावा याचे त्या काळातील भारतीय चित्रपटांच्या दृष्टीने उत्तम उदाहरण आहे. लष्करी अधिकारी नायक लष्करामधील शिक्षणाचा वापर करून विश्वासघात करणाऱ्या पत्नी आणि मित्राचा खून करतो.

तो हॉस्पिटलमध्ये असताना त्याच्या आठवणींमधून एकेक धागे उलगडत जातात. या चित्रपटात सात फ्लॅशबॅक आहेत, शिवाय एका फ्लॅशबॅकमध्येच दुसरा फ्लॅशबॅक आहे.

इजाजत चित्रपटामध्ये रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये पूर्वाश्रमीची पत्नी अचानक समोर येताच तिच्याबद्दलच्या आठवणींचा पट गुलजार यांनी फ्लॅशबॅकमधून उलगडला आहे. एकेक फ्लॅशबॅक बघितल्यानंतर प्रेक्षक ठरावीक कालावधीनंतर रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये येत राहतात.

टेबलावर ठेवलेल्या नायकाच्या पाकिटावर क्लोज-अप ठेवून त्यावरून फ्लॅशबॅकमधून रेखाने नसिरुद्दीन शाहचे पाकीट उघडल्याची घटना जोडली आहे, ती संकलकाची कमाल आहे. मौसम चित्रपटातील दिल ढूंढता हैं फिर वही... हे गाणे अनोख्या पद्धतीने चित्रित केले आहे.

फ्लॅशबॅकमध्ये संजीवकुमार आणि फ्लॅशबॅक बघणारा संजीव कुमार पडद्यावर एकाच फ्रेममध्ये दिसतात. आँधी चित्रपटामध्ये निवडणूक प्रचारासाठी नायिका आरती देवी (सुचित्रा सेन) ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य करत असते तेथे नायक जे.के. (संजीव कुमार) मॅनेजर असतो.

हे जेव्हा आरतीला ब्रिंदा काका (ए.के. हंगल) सांगतात त्यावेळी तिला फ्लॅशबॅकमध्ये गाणे आठवते, इस मोड से जाते हैं... हे दृश्य कितीही वेळा बघितले तरी डोळे पाणावतात.

त्याचे कारण योग्य जागी फ्लॅशबॅक, कॅमेरा (क्लोज-अप), दर्जेदार अभिनय आणि पार्श्वसंगीत. फ्लॅशबॅकमधून वर्तमानकाळात आल्यावरही त्या गाण्याचे संगीत तबला-तरंगवर ऐकू येते आणि प्रेक्षक भावुक होतात.

चित्रपटातील फ्लॅशबॅकचे अनेक प्रकार असतात.

आठवणी, एका क्रमाने

दिवार चित्रपटाची सुरुवात इन्स्पेक्टर रवीला (शशी कपूर) गौरव पुरस्कार दिला जातो या समारंभापासून होते आणि पुरस्कार स्वीकारताना त्याला लहानपण आठवते व ‘बॅक-एण्ड’ फ्लॅशबॅक सुरू होतो.

हा आठवणींचा मागोवा एका क्रमाने घेतला गेला आहे. टायटॅनिक चित्रपटाच्या सुरुवातीला त्या जहाजाचे काही भाग सापडल्याचे टीव्हीवर बघून ८० वर्षाची रोझ तिची कथा सांगण्यास तयार होते. त्यामुळे त्या अपघाताचे सविस्तर वर्णन फ्लॅशबॅकमधून आपल्याला दिसले.

फॉरेस्ट गम्प चित्रपटामध्ये नायक रस्त्यावरील एका बाकावर बसला आहे आणि शेजारी बसलेल्या स्त्रीबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःची कथा फ्लॅशबॅकमधून सांगतो.

सेव्हिंग प्रायव्हेट रायन चित्रपटाच्या सुरुवातीला एक वृद्ध गृहस्थ अत्यंत दुःखी अंतःकरणाने दफनभूमीला भेट देतो आणि कॅमेरा त्याच्या समोरच्या बाजूने जवळ जातो.

त्या वृद्धाच्या डोळ्यांचा अति-क्लोज अप (Extreme Close-up) वापरून फ्लॅशबॅक सुरू केला आहे. तो वृद्ध गृहस्थ कोण आहे हे चित्रपटाच्या शेवटी समजते.

आठवले तसे

प्रहार चित्रपटामध्ये नवीन भरती झालेला एक सैनिक लष्करी अधिकारी असलेल्या नायकाला उद्देशून अपशब्द वापरतो आणि त्या अपशब्दाच्या शब्दशः अर्थानुसार त्या नायकाला तो अनौरस का आहे याची आठवण होते, त्याविषयी फ्लॅशबॅक सुरू होतो, शोभा गुर्टू यांच्या आवाजात याद पिया की आए... गाणे ऐकू येते आणि नायकाला त्याचे वेश्यावस्तीमधले बालपण दिसते.

ये दुख सहा ना जाए... या ओळीवर फ्लॅशबॅक संपतो आणि नायक (नाना पाटेकर) अंधारामध्ये बसलेला दिसतो. हा फ्लॅशबॅक जसा आठवतो तसा प्रेक्षकांना दिसतो. त्याचा काही ठरावीक क्रम नाही.

प्रत्येक व्यक्ती आपल्या भूतकाळात डोकावून बघत असते परंतु प्रेमभंग किंवा अपघातासारख्या दुःखद घटना कधी उलट्या क्रमाने आठवतात किंवा त्या घटना ठरावीक क्रमानेच आठवतात असे नाही.

त्याप्रमाणेच अॅनी हॉलसारख्या चित्रपटात प्रेमात पडलेले- प्रेमभंग झालेले संस्मरणीय प्रसंग जसे आठवतील तशा स्वरूपात म्हणजेच एका ठरावीक क्रमाने दाखवले जात नाहीत. हा फ्लॅशबॅकचा एक वेगळा प्रकार आहे.

गुन्ह्याचा तपास

“गेल्या महिन्यात अमुक तारखेला कुठे होता?” असा प्रश्न पोलिस किंवा डिटेक्टिव्ह विचारतो, त्यावेळी फ्लॅशबॅक तंत्र वापरणे प्रेक्षकांच्या सवयीचे झाले आहे.

दृश्यम चित्रपटात त्या घटनेबद्दल नायक फ्लॅशबॅकमधून सांगतो त्याचबरोबर घडलेल्या घटनांमध्ये कपोलकल्पित घटनांचा समावेश केला आहे, ज्याची प्रेक्षकांना जाणीव असते.

काही चित्रपटांत गुन्ह्याच्या तपासासंबंधी पोलिसांना जसे धागेदोरे सापडत राहतात त्याप्रमाणे प्रेक्षकांना वेगवेगळे फ्लॅशबॅक कोणत्याही क्रमाने दिसतात आणि प्रेक्षक मनातल्या मनात त्याचा क्रम लावत राहतात.

अंडर सस्पीशन या चित्रपटात पोलिस (मॉर्गन फ्रीमन) तपासामध्ये हेन्रीकडून (जेन हॅकमन) एकेक घटना उलट तपासणी करून गुन्ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांना त्यावेळी अनेक घटना दिसतात,मात्र त्यातली खरी कोणती, हे चित्रपटाच्या शेवटी कळते.

जिगसॉ

मेमेंटोसारख्या चित्रपटात तर शेवटचा प्रसंग पहिल्या फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे, त्यानंतर सुरुवातीचा प्रसंग दुसऱ्या फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे.त्यापूर्वीच्या आठवणी पटकथाकार ख्रिस्तोफर नोलानने उलट्या क्रमाने दाखवल्या आहेत.

विशेष म्हणजे नायकाला मेमरी लॉसचा आजार असल्यामुळे कोणता प्रसंग घडलेल्या घटनेचा फ्लॅशबॅक आहे आणि कोणता प्रसंग नायकाच्या मनाचा खेळ आहे, याची सरमिसळ अनोख्या क्रमाने दाखवली आहे.

एकूणच चित्रपटात अनेक फ्लॅशबॅकचा कोलाज आहे आणि ते जिगसॉ कोडे सोडविण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर आहे.

ट्रेलर आणि पूर्ण घटना

गुडफेलाजसारख्या चित्रपटात एखादी घटना दाखवताना फ्लॅशबॅक त्या घटनेच्या मध्यातून सुरू होतो. त्यानंतर त्या घटनेचे धागे हळूहळू उलगडत जातात आणि त्यानंतरचा फ्लॅशबॅक घटनेच्या क्रमानुसार दाखवला जातो.

द युज्वल सस्पेक्ट चित्रपटाच्या सुरुवातीला कीटनचा खून होतो. त्यानंतर भूतकाळात काय घडले याबद्दल संशयित गुन्हेगारांपैकी एकाच्या मनोगतामधून प्रेक्षकांना फ्लॅशबॅक दिसण्यास सुरुवात होते.

यामधील फ्लॅशबॅक म्हणजे नक्की काय, हे कोडे चित्रपट पूर्ण बघितल्यावर समजते. शाईन चित्रपटामध्ये डेव्हिड हेल्फगॉट हा पियानो वादक एका हॉटेलचे दार ठोठावताना दिसतो.

तिथे महत्प्रयासानंतर प्रवेश मिळाल्यावर डेव्हिड बऱ्याच दिवसांनी पियानो वादन करतो आणि त्यावेळी फ्लॅशबॅकमधून डेव्हिडचे हरवलेले बालपण दिसते, त्याच्यावर हक्क दाखवून त्याला आपण सांगू तसेच पियानो वादन करण्यास जबरदस्ती करणारे त्याचे वडील दिसतात.

डेव्हिडच्या आताच्या अवस्थेचे कारण प्रेक्षकांना फ्लॅशबॅकमधून दिसते त्यामुळे कथा सांगण्याच्या या तंत्राचा वापर इथे कसा आवश्यक आहे, याची खात्री पटते.

फ्लॅशबॅक दाखवण्याचे ढोबळ मानाने काही प्रकार ‘बघितल्या’नंतर त्या तंत्राचा अभिनव पद्धतीने कसा वापर केला आहे याचा विचार करणे सयुक्तिक ठरेल.

ऱ्हिदम आणि ब्लूज संगीतकार, पियानो वादक, अमेरिकन गायक रे चार्ल्सच्या आयुष्यावर आधारित रे (२००४) या चित्रपटामध्ये नायकाला जेव्हा त्याच्या आयुष्यातील त्रासदायक घटना आठवतात त्याचवेळी काही सेकंदासाठी पडद्यावर लाल रंग दिसतो.

द रोड होम या चित्रपटात भूतकाळ फ्लॅशबॅकमध्ये दाखवताना कलर फिल्म आणि वर्तमानकाळ दाखवताना ब्लॅक अॅण्ड व्हाइट दाखवला आहे, कारण आठवणी रम्य असतात. भूतकाळ रंगीत दाखवण्यामधील कल्पकता दाद देण्यासारखी आहे.

रेजिंग बुल चित्रपटामध्ये एका बॉक्सरच्या खडतर आयुष्यावरील पूर्ण चित्रपट कृष्ण-धवल आहे. त्या बॉक्सरच्या आयुष्यातील काही सोनेरी क्षण म्हणजे त्याचे प्रेयसीबरोबर असलेले काही प्रसंग.

फ्लॅशबॅकमध्ये त्या आठवणी रंगीत दाखवताना पूर्वीच्या काळी टीव्हीवर चित्रे /फिल्म ज्या पद्धतीने दाखवल्या जायच्या तशा फोटोंचा /फिल्मचा कोलाज घरी हातात धरलेल्या कॅमेऱ्यावर शूट केल्यासारखा दाखवला आहे. त्यामध्ये जुन्या फिल्मवर उमटणाऱ्या रेषाही दिसतात.

इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड या चित्रपटाची संकल्पना अफाट आहे. मायकेल गॉन्ड्रे दिग्दर्शित क्लेमेंटाइन आणि जोएल (केट विन्सलेट आणि जिम केरी) एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या जोडप्याच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो आणि ते दोघे आपल्या मेंदूवर वैद्यकीय उपाय करून आठवणी पुसून टाकण्याचा घाट घालतात.

फ्लॅशबॅकमध्ये प्रेक्षकांना आणि नायकाला त्यांच्या रम्य आठवणी दिसतात त्याचवेळी त्या आठवणी पुसून टाकल्या जातात. आठवणी बघता बघता जोएल त्या आठवणी मेंदूमधून कायमच्या घालवून टाकण्याची प्रक्रिया थांबवतो.

त्यामुळे चित्रपटामध्ये फ्लॅशबॅक आणि फ्लॅश फॉरवर्ड दिसत राहतात, शिवाय नायक त्या फ्लॅशबॅकमधील प्रसंगामध्ये जाऊन संवाद साधतो, चित्रपट बघताना प्रेक्षक वर्तमानकाळ, भूतकाळ याच्या गोंधळामध्ये गुंतून जातात आणि नायकाच्या मानसिकतेचा अनुभव प्रेक्षकांना घेता येतो.

फ्लॅशबॅकमध्ये जाणे आणि पुन्हा मूळ कथेकडे परतणे हे पटकथाकार आणि दिग्दर्शक दोघांचे कौशल्य असते.

आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलण्याचा अनुभव प्रेक्षकांना देण्याकरिता, नायक/ नायिका इतकी उदास का आहे याची कारणमीमांसा करण्यासाठी; नायकाला/ नायिकेला आठवणी कशा छळत आहेत याची अनुभूती प्रेक्षकांना देण्यासाठी फ्लॅशबॅक तंत्राचा नावीन्यपूर्ण पद्धतीने वापर केला जातो.

अलीकडे अनेक चित्रपट सुरू असताना ‘चार वर्षापूर्वी....’, ‘सहा महिन्यानंतर...’ अशी अक्षरे उमटतात. तरीही फ्लॅशबॅकचा वापर अभिनवपणे करण्याचे प्रयत्न यापुढेही केले जातील.

कारण आपण आपल्या व्यक्तिगत आठवणी अशाच पद्धतीने फ्लॅशबॅकमध्ये बघत असतो. चित्रपट सुरू असताना एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळावे म्हणून इथे या प्रसंगात फ्लॅशबॅक आवश्यक आहे, असे प्रेक्षकांना वाटणे हे पटकथाकाराचे कौशल्य असते.

या वर्षात रिलीज झालेला तुमचा सर्वात आवडता चित्रपट कोणता, असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न कराल; तुम्हाला त्या चित्रपटातील प्रसंग आठवतील; तो चित्रपट तुम्ही कोणत्या थिएटरला बघितला हे आठवेल... यालाच फ्लॅशबॅक म्हणतात!

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.