प्रिया भांबुरे (निकुम)
वाढप : ६ व्यक्तींसाठी
साहित्य : अडीचशे ग्रॅम मटकी, १ उकडलेला बटाटा, ४ कांदे बारीक चिरलेले, २ टोमॅटो बारीक चिरलेले, १ टेबलस्पून कांदा-लसूण मसाला, ३ टेबलस्पून मिसळ मसाला, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, उकळलेले पाणी आवश्यकतेनुसार, गूळ आवडीनुसार, २ टेबलस्पून कोथिंबीर, ४ टेबलस्पून तेल, मिक्स फरसाण गरजेनुसार, २ लादी पाव, १ लिंबू, १ टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर, १ टीस्पून हळद, ७ ते ८ कढीपत्ता पाने, अर्धा टीस्पून हिंग.
कृती : मटकी ८ ते १० तास पाण्यात भिजत घालावी. त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावेत. सुती कपड्यात बांधून मोड आणावेत. (विकतची मोड आलेली मटकी घेतली तरी चालेल.) कुकरमध्ये मोड आलेली मटकी घ्यावी.
पाणी जरा जास्तच घालावे, म्हणजे त्यामध्ये मटकीची पूर्ण चव उतरते. मटकीबरोबरच बटाटा उकडून घ्यावा. पाणी, हळद आणि मीठ घालून १ शिट्टी आणून मध्यम आचेवर शिजवावे. मटकी खूप जास्त शिजवू नये.
कढईत तेल गरम करून कढीपत्ता आणि हिंग घालून फोडणी करावी. कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. मिश्रण एकजीव झाले, की आले-लसूण पेस्ट, कांदा-लसूण मसाला, मिसळ मसाला, काश्मिरी मिरची पावडर, किसून घेतलेला उकडलेला बटाटा घालून २ ते ३ मिनिटे मंद आचेवर छान शिजू द्यावे.
शिजवलेली मटकी, उकळलेले पाणी, थोडा गूळ व गरजेनुसार मीठ घालावे. संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करून मध्यम आचेवर १० मिनिटे उकळून घ्यावे. वरून कोथिंबीर घालावी. मिसळीचा कट तयार आहे.
सर्व्ह करताना एका भांड्यात तळाशी मटकीचा एक थर घालून वरून फरसाण घालावे. कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. मिसळ तयार आहे. फरसाण, कांदा, लिंबू घालून गरमागरम सर्व्ह करावे. सोबत पाव द्यावा.