'तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा' पासून 'लंडन ठुमकदा' पर्यंत हिंदी चित्रपटातील स्त्री केंद्री गाणी कशी बदलत गेली?

‘राजकुमारी’पासून ‘धाकड’ पर्यंत, हिंदी चित्रपट संगीतात झालेला बदल स्त्री प्रगतीशी समांतरच ..
Womens in bollywood
Womens in bollywoodEsakal
Updated on

साहिरला कुणी क्रांतिकारी शायर म्हणते, कुणी रोमँटिक गीतकार, तर कुणी द्रष्टा कवी म्हणते! मला विचाराल तर साहीर हा ‘वुमेन्स पोएट’ होता. साहिरच्या गीतात, ‘वूमनहूड’चे सगळे पदर दिसतात.

अंजोर पंचवाडकर

काळाची कशी गंमत असते पाहा; तो तर सतत पुढे जातच असतो, पण बरोबर आपल्या भवतालात किती बदल घडवत असतो.

आज महिलादिनानिमित्त स्त्रियांच्या प्रगतीकडे एक दृष्टिक्षेप टाकला, तर त्यांनी पादाक्रांत केलेली यशोशिखरे पाहून आनंद वाटतो. हिंदी चित्रपट संगीतात झालेला बदलही असाच स्त्री प्रगतीशी समांतर आहे असे जाणवते.

सन १९४०मध्ये लिहिलेल्या ‘सो जा राजकुमारी...’ या अप्रतिम लोरीत, आपली लहानगी सुखात नांदो, तिला चांगला जोडीदार मिळो इतकीच अपेक्षा त्या पित्याने व्यक्त केलीये. तर, २०१६ सालच्या दंगल चित्रपटातला बाप आपल्या मुलींना ‘धाकड’ बनवायच्या ध्येयाने झपाटलेलाय. समाजातही हा बदल झालेला दिसतोच आहे की!

यातले दोन्ही पिता, काळानुसार आपापल्या जागी बरोबरच ना!

सो जा मीठे सपने आएँ

सपनों में पी दरस दिखाएँ

राजाजी माला पहनाएँ

चूमे मांग तिहारी सो जा... पासून

तन्ने चारो खाने चित कर देगी

तेरे पुर्जे फिट कर देगी

डट कर देगी दाव से बढ़ के

पेंच पलट कर देगी... पर्यंतचा हा प्रवास!

जीना तेरी गलीमें मरना तेरी गलीं में... पासून

हम तो ऐसे है भय्या... पर्यंतचा हा प्रवास!

हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठें... पासून

आएगी तू जो छमसे, सब झूम जाएंगे

तेरे उठे कदमपे सब घूम जाएंगे... पर्यंतचा हा प्रवास!

हा प्रवास सांगीतिकदृष्ट्या सुखद आहे किंवा नाही ही वेगळी गोष्ट, पण कालसुसंगत आहेच.

मला वाटते २०१०नंतर बिनधास्त, कणखर स्त्री भूमिका असलेले चित्रपट नियमित येऊ लागले आणि लोकप्रियही होऊ लागले.

क्वीन, कहानी (१ आणि २), पिंक, पिकू, इंग्लिश विंग्लिश, थप्पड़, नाम शबाना, मर्दानी, NH10, हिरॉईन अशी कितीतरी नावे सांगता येतील. नीरजा, गंगूबाई काठियावाडी, डर्टी पिक्चर, थलैवी, नो वन किल्ड जेसिका, राझी, शेरनी, गुंजन सक्सेना यांसारखे खऱ्या व्यक्तिरेखा असलेले चित्रपट.

आणि दंगल, मेरी कोम, सांड की आँख, सायना, शाबाश मिठू असे महिला खेळाडूकेंद्रित चित्रपट. आता त्यातल्या गाण्यांचा विचार करता, काही अपवाद वगळता या चित्रपटांतील गाणी माझ्या मते लोकप्रिय आणि चिरकाल टिकणारी नव्हती.

‘लंडन ठुमकदा’, ‘गौराई माझी लाडाची गं’, ‘एकला चलो एकला चलो रे’, ‘इश्क़ सूफियाना’, ‘बापू सेहत के लिए’, ‘ऐ वतन मेरे वतन आबाद रहे तू’ ही काही गाणी मात्र चांगलीच लोकप्रिय झाली.

पण या प्रकारचा मला विचाराल तर, चक दे इंडिया हा चित्रपट आणि त्यातले ‘बादल पे पाँव है, या छूटा गाँव है, अबतो भाई चल पडी अपनी तो नाव है’ हे गाणे माझे फार आवडते आहे. भारताच्या विविध भागातून आलेल्या एका ध्येयाने झपाटलेल्या मुलींची ताकद या गाण्यात तंतोतंत उतरली आहे.

पूर्वी कुक्कू, हेलन, जयश्री टी, बिंदू अशा सहकलाकार नृत्यांगना खलनायिका बनून नाचगाणी करत. पुढे मात्र ऐश्वर्या, शिल्पा शेट्टी, बिपाशा, कतरिना अशा मुख्य प्रवाहातल्या नायिका एखाद्या चित्रपटात ‘आयटम साँग’ करू लागल्या. आणि ‘कजरा रे’, ‘बिड़ी जलाई ले’, ‘चिकनी चमेली’सारखी गाणी लोकप्रिय होऊ लागली.

आता या समकालिक चित्रपट आणि त्यातल्या गाण्यांविषयी लिहिल्यावर एक प्रश्न उरतोच. पूर्वी असे स्त्री केंद्रित चित्रपट निघत नव्हते का? तर होतेच की, भरपूर होते. अगदी १९४० साली आलेला औरत (त्यातले अभिनेत्री-गायिका सरदार अख्तरचे ‘गगरी सुखी’, ‘बैल प्यासा पानी दे’ हे गाणे लगानमधल्या ‘घनन-घनन, घिर-आये बदरा’ या गाण्याची आठवण करून देणारे);

त्यावरच बेतलेला मदर इंडिया, साधना, सीमा, पतिता, बंदिनी, भाभी की चूड़ियां, परिणीता, सुजाता, साहिब बीबी और गुलाम, शारदा, मधुमती, डॉक्टर विद्या, पाकीजा, आँधी, अनुभव, खूबसूरत, अर्थ, मंडी, मंथन, अस्तित्व, अनपढ़, ममता, दृष्टि... हे आणि असे कितीतरी चित्रपट स्त्री किंवा स्त्रियांना मध्यवर्ती भूमिकेत ठेवून त्याभोवती रंगवले आहेत. आणि त्यातली गाणी... एकसो एक बहारदार! त्याकाळी प्रेम, विरह, श्रृंगार, समर्पण याभोवतीच प्रामुख्याने गाणी गुंफली जात.

पुरुषी दृष्टिकोनातून किंवा पुरुष दृष्टीसाठी (मेल गेझ) बहुतांश चित्रपट बनत. त्यामुळे जोरकस स्त्री अभिव्यक्तीची गाणी नायिकेसाठी घातली जात नसत. तरीही स्त्रित्वाचे किती विविध पदर दिसतात त्या गाण्यांतून. ‘गुण तो न था कोई भी, अवगुण मेरे भुला देना...’ अशा आर्जवात गुंतलेली कल्याणी किंवा ‘न जाओ सैंया छुडाके बय्या’ म्हणून आर्जवणारी मंजली बहु किंवा ‘काली घटा छाए, मोरा जिया तरसाए ऐसे में कहीं कोई मिल जाए’ म्हणणारी प्रेमकांक्षिणी असो;

‘एकही संग होते, है इसमें प्यारकी आबरू, मैं पीछे सब छोड़ आयी अपना...’ म्हणणाऱ्या समर्पिता प्रामुख्याने दिसतात. त्यातूनही ‘पंछी बनू उड़ती फिरू’,‘ मैं चली मैं चली देखो प्यार की गली’, ‘आज फिर जिनकी तमन्ना है...’ अशी मुक्त विहार करणारी स्वतंत्र स्त्रीही मधूनच चमकून जाते. कधी ‘सुन सुन सुन दिदी तेरे लिये एक रिश्ता आया है...’ म्हणून चिडवणारी चुलबुली बहीण मनात घर करते. तर कधी, पहाटे ‘ज्योति कलश छलके’ म्हणणारी प्रसन्न वहिनी लक्षात राहते.

स्वच्छ आणि सोज्ज्वळ पुरुषी नजरेला स्त्री कित्ती रूपे दिसू शकतात, ते ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ या गाण्यातल्या रूपकांतून दिसते पाहा-

एक लड़की को देखा तो ऐसा लगा,

जैसे सुबह का रूप

जैसे सरदी की धूप

जैसे वीणा की तान

जैसे रंगों की जान

जैसे बलखायें बेल

जैसे लहरों का खेल

जैसे खुशबू लिये आये ठंडी हवा....

गुलजार यांचा आँधी चित्रपट, ताकदीच्या राजकारणी स्त्रीच्या कथेवर बेतलेला, पण मूळ गाभा प्रेमाचा. त्यामुळे त्यातली तीनही द्वंद्व-प्रेमगीते, ‘तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा’, ‘तुम आ गए हो’ आणि ‘इस मोडसे जाते है...’ प्रचंड लोकप्रिय आहेत.

आणि ‘सलाम कीजिये आली जनाब आये है’ हे तिच्या राजकारणावर भाष्य करणारे, त्यामानाने जरा कमीच लोकप्रिय. ममतामधले ‘छुपा लो यूं दिल में प्यार मेरा’ हे मला स्त्रीइतके पुरुषाचेही समर्पण गीत वाटते. ‘मैं एक सदीसे बैठी हूँ ’हे लेकिनमधले स्त्री जन्माचे शाश्वत विरहगीत. ही सगळी गाणी अजरामर ठरली, कारण त्याच्याशी जोडलेले गायक, संगीतकार, गीतकार, सगळेच अफाट ताकदीचे.

कथेच्या मागणीनुसार प्रतिभेचा साक्षात्कार घडवणारे! या सगळ्या गाण्यांचा आणि गीतलेखकांचा आढावा घेणे लेखनसीमेमुळे शक्य नसले, तरी साहिर लुधियानवी यांच्या ऋणनिर्देशाशिवाय लेख अपूर्ण राहील.

अगदी व्यावसायिक हिंदी चित्रपटातूनसुद्धा अभिजात कला साकारता येते, हे वेळोवेळी सिद्ध करणाऱ्या ज्या काही महान हस्ती आहेत, त्यात साहीर लुधियानवी एक नंबर! साहिरला कुणी क्रांतिकारी शायर म्हणते, कुणी रोमँटिक गीतकार, तर कुणी द्रष्टा कवी म्हणते! मला विचाराल तर साहीर हा ‘वुमेन्स पोएट’ होता. साहिरच्या गीतात, ‘वूमनहूड’चे सगळे पदर दिसतात.

Womens in bollywood
Women's Day 2024 : महिलांनो! आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हायचं असेल, तर आजच घ्या 'हे' निर्णय.. वाचा सविस्तर

स्त्रीवरील युगेयुगे होणारा पुरुषी अन्याय सांगताना साधना चित्रपटातल्या ‘औरत ने जनम दिया मर्दों को’ गीतामध्ये साहीर म्हणतो-

मर्दों ने बनायी जो रस्में, उनको हक़ का फ़रमान कहा

औरत के ज़िन्दा जलने को, कुर्बानी और बलिदान कहा

इस्मत के बदले रोटी दी, और उसको भी एहसान कहा

स्त्रियांवर अन्याय करणारेच नव्हे, तर त्यांच्यावरचे अत्याचार उघड्या डोळ्यांनी पहाणारेसुद्धा दोषीच-

मदद चाहती है ये हव्वा की बेटी

यशोधा की हम-जिंस राधा की बेटी

पयम्बर की उम्मत ज़ुलेख़ा की बेटी

सना-ख़्वान-ए-तक़्दीस-ए-मशरिक़ कहाँ हैं

साहीरची नायिका फक्त अन्याय सहन करते का? तर नाही, कर्मठाला ती तिखट शब्दात कशी सुनावते पाहा -

ये पाप है क्या ये पूण्य है क्या

रितो पर धर्म की मोहरे है

हर युग में बदलते धर्मो को

कैसे आदर्श बनाओगे

प्रियकराने नाकारलेल्या पण त्यामुळे नियतिशरण न होता वडील नसलेल्या आपल्या मुलाला सन्मानाने वाढवणारी निश्चयी आई लोरी गाताना सांगते (त्रिशूल)-

तू मेरे साथ रहेगा मुन्ने

में तुजे रेहेम के साये

ना पालने दूंगी

जिंदगानी की कड़ी धुप

में चला ने दूंगी

....

मेरा हर दर्द तुझे दिल

मैं बसाना होगा

में तेरी माँ हूँ

मेरा क़र्ज़ चूकाना होगा

आणि हीच स्त्री जेव्हा प्रेम करते, तेही भरभरूनच करते,

किसके हाथों ने मेरे हाथों से कुछ माँगा है

किसके ख़्वाबों ने मेरी रातों से कुछ माँगा है

साज़ बजने लगे

आँचल में खनक जाग उठी

दिल के सोए हुए तारों में खनक जाग उठी

जणू सारे विश्व तिच्या प्रेमाचे साक्षी आहे -

सितारे झिलमिला उठे, चराग जगमगा उठे

बस अब ना मुझ को टोकना

न बढ़ के राह रोकना

अगर मैं रुक गयी अभी

तो जा न पाऊँगी कभी

यही कहोगे तुम सदा के दिल अभी नहीं भरा

जो ख़त्म हो किसी जगह

ये ऐसा सिलसिला नहीं

मात्र, या प्रेमावर तुम्ही पाबंदी आणून पाहा, ती कसे बोचरे आव्हान देते तुम्हाला-

तख़्त क्या चीज़ है और लाल-ओ-जवाहर क्या है

इश्क़ वाले तो खुदाई भी लूटा देते हैं

हमने दिल दे भी दिया एहद-ए-वफ़ा ले भी लिया

आप अब शौक से देदें जो सज़ा देते हैं....

महिलादिन आणि साहीरचा जन्मदिवस एकच असावा हा किती सुंदर योगायोग!

---------------------

Womens in bollywood
International Women's Day: कुटुंबाच्या पाठबळावर वकिली क्षेत्राकडे महिलांचा कल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.