भारतीय बनावटीच्या टाटा, महिंद्रा अशा कंपन्याही आता फ्युचरीस्टीक कार तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. टाटा अविन्या, महिंद्रा बीई सीरिजच्या माध्यमातून लवकरच त्या आपल्या भेटीला येणार आहेत.
सागर गिरमे
ऑटोमोबाईल उद्योगाने १९व्या शतकाच्या उत्तरार्धात खऱ्या अर्थाने वेग पकडला. पहिल्या अंतर्गत ज्वलन (Internal Combustion –कंबस्चन) इंजिन कारपासून सध्याच्या इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांपर्यंत अनेक टप्प्यांवर तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने मोठा लांबचा पल्ला गाठला आहे.
सध्याची ईव्हीची उदाहरणं बघितली तरी हे लक्षात येईल. इलेक्ट्रिसिटी अर्थात वीज हाताच्या किंवा पायाच्या जोरावर कंट्रोल करून तिच्यावर आरूढ होऊन आपण प्रवास करू शकू हे काही वर्षांपूर्वी आपल्या सर्वांसाठी स्वप्नवतच होते. फार तर पेंटोग्राफच्या मदतीने धावणाऱ्या रेल्वेपर्यंत आपली मजल राहील, असे आपल्याला वाटत होते.
मात्र तंत्रज्ञान झपाट्याने बदलले. जी वीज कंट्रोल करणे अशक्य वाटत होते, ती वीज आपण थ्रोटलवर नाचवत आहोत. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्स आता गल्लोगल्ली दिसायला लागली आहेत, आणि कालचे स्वप्न आज प्रत्यक्षात आलेले आहे.
आताच्या घडीला स्वप्नवत वाटणाऱ्या किंवा कल्पनेच्या पातळीवर असलेल्या फ्युचर कार किंवा फ्युचर व्हेईकलचे दिवस नक्की येणार, यात काही शंका नाही. सध्या उपलब्ध असलेल्या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बाजूला सारत, अगदी हॉलिवूडच्या साय-फायपटांमध्ये दाखवतात तशी वाहने आपल्या आजूबाजूला धावताना, उडताना, ट्यूबमधून जाताना नक्की दिसणार आहेत.
फ्युचरीस्टीक कार म्हणजे?
सोप्या भाषेत सांगायचं तर सध्या प्रचलीत असलेले तंत्रज्ञान न वापरता, किंवा सध्या सामान्यांच्या आवाक्यात नसलेले, वापरात नसलेले तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक, अधिक आरामदायी, अधिक सुरक्षित, अत्यंत वेगवान, मानवावर अजिबात अवलंबून नसलेली म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स वापरून केवळ आज्ञावली (कमांड) स्वीकारून काम करणारी वाहने म्हणजे फ्युचर कार किंवा व्हेईकल.
वाहन उत्पादित करणाऱ्या अनेक कंपन्या सध्या या तंत्रज्ञानावर काम करत असून कन्सेप्टच्या पातळीवर किंवा प्रायोगिक तत्त्वावर अशा प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कार, फ्लाइंग कार, अॅडव्हान्स ईव्ही, हायपरलूप ट्रान्स्पोर्ट, पीआरटी सिस्टीम ही त्यांची विविध उदाहरणे म्हणता येतील.
सेल्फ ड्रायव्हिंग कार
विमानांमध्ये एका ठरावीक वेळेनंतर ऑटो पायलट मोड ऑन करून पायलट त्यांची इतर कामे करतात. त्याचप्रमाणे येत्या काही वर्षात आपल्याला रस्त्यांवरचे सेन्सर, रडार, कॅमेऱ्यांद्वारे हा अनुभव घेता येणार आहे. ही टेक्नॉलॉजी सध्याच्या काही कारमध्ये अगदी लिमिटेड स्वरूपात उपलब्ध आहे.
त्यालाच अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) म्हणूनही ओळखले जाते. पण त्याच्याही खूप पुढे जाऊन सेल्फ ड्राईव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता गाड्या आपल्या आज्ञांनुसार आपल्याला इच्छित स्थळी घेऊ जाऊ शकणार आहेत. भविष्यात येऊ घातलेल्या अत्यंत अपेक्षित अशा तंत्रज्ञांनापैकी एक म्हणून सेल्फ-ड्रायव्हिंग कारकडे बघावं लागणार आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वतः स्वतःला ड्राईव्ह करण्यास या गाड्या सक्षम असतील.
गुगल, टेस्ला आणि उबेरसह अनेक कंपन्या सध्या सेल्फ-ड्रायव्हिंग कार विकसित करत आहेत. यापैकी काही कंपन्यांनी सार्वजनिक रस्त्यावर त्यांच्या कारची चाचणी सुरू केली आहे. त्याच्या बातम्याही कदाचित आपल्या वाचनात आल्या असतील. नजीकच्या भविष्यात मात्र हे तंत्र फक्त प्रायोगिक तत्त्वावर राहणार नसून दैनंदिन जीवनाचा भाग बनणार आहेत.
फ्लाइंग कार
आपण उडत्या तबकड्या किंवा एलियन्सच्या यूएफओचे किस्से अनेकदा ऐकले आहेत. अगदी हॉलिवूडच्या साय-फाय चित्रपटांत उडणाऱ्या गाड्या बघितल्याही आहेत. येत्या काही वर्षांत आपल्या आजूबाजूलाही तशाच आकाशात उडणाऱ्या गाड्या दिसू शकतील.
टेराफुगिया, किट्टी हॉक आणि एहँग यासह अनेक कंपन्या सध्या फ्लाइंग कार विकसित करत आहेत. यापैकी काही कंपन्यांनी त्यांच्या वाहनांचे प्रोटोटाइप आधीच तयार करून याबाबतची चाचपणी केलेली आहे. या क्षेत्रातील तंत्रज्ञान अत्यंत वेगाने विकसित होत असल्याने येत्या दशकभरात यापैकी काही कंपन्यांच्या कार आपल्याला उडताना तरी दिसतील किंवा आपल्या पार्किंगमध्ये अशा प्रकारची फ्लाइंग कार उभी राहिलेली असेल.
हायपरलूप
हायपरलूप ही वाहतुकीच्या क्षेत्रातील एक क्रांतिकारी संकल्पना आहे. हायपरलूप प्रणालीमध्ये हवेचा दाब कमी असलेल्या ट्यूबमधून पॉड (तबकड्या) चालवले जातात. त्यामुळे हवेचा ड्रॅग लक्षणीयरित्या कमी होतो. पारंपारिक चाकांऐवजी, हायपरलूप पॉड ट्रॅकवरून उचलण्यासाठी आणि घर्षणाशिवाय पुढे जाण्यासाठी चुंबकीय उत्सर्जन (मॅगलेव्ह) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
त्यामुळे सुरळीत आणि कार्यक्षम हालचाल होऊ शकते. या पॉडला वेग देण्यासाठी इंडक्शन मोटर वापरल्या जातात. या मोटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करतात. त्यामुळे प्रवासाच्या दिशेनुसार पॉडला ट्यूबच्या बाजूने ढकलतात किंवा खेचून घेतात.
हवेचा प्रतिकार नसल्याने पॉडचा स्पीड लक्षणीय असतो. साधारण ताशी १,१०० किलोमीटर या वेगाने हे पॉड कार्यरत राहू शकतात. यात सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर असल्याने ही टेक्नॉलॉजी अत्यंत पर्यावरणपूरक आहे.
ही कल्पना सर्वप्रथम स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ‘हायपरलूप अल्फा’ या नावाने २०१३मध्ये मांडली होती. आता सध्याही आपले रस्ते, वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या वाहतूक समस्येविषयीच्या भाषणांमधून हायपरलूप तंत्रज्ञानाविषयी ऐकण्यात येत आहे. त्यासंदर्भातील चाचपणीही सुरू असल्याचे संकेत याद्वारे दिले जात आहे.
पर्सनल रॅपिड ट्रान्झिट
पर्सनल रॅपिड ट्रान्झिट म्हणजेच पीआरटी सेवा ही सध्या काही प्रमाणात प्रचलीत असलेली पण भविष्यातील अत्यंत आश्वासक सेवा म्हणून ओळखली जाणार आहे. शहरी भागात कार्यक्षम, पॉइंट-टू-पॉइंट गतिशीलतेसाठी डिझाईन केलेली आहे.
लहान, ऑटोमेटेड आणि चारएक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी डिझाईन केलेल्या पॉडद्वारे सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवास याद्वारे होतो. ठरवून दिलेल्या मार्गाने हे पॉड प्रवास करत राहतात त्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही, वेळेची बचत होते.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत आश्वासक पर्याय म्हणून याकडे बघता येऊ शकते. सध्या मॉर्गनटाउन (वेस्ट व्हर्जिनिया), हिथ्रो विमानतळ (लंडन), सनचीयेन (दक्षिण कोरिया), मस्दार (अबू धाबी) या ठिकाणी अशा प्रकारची फर्स्ट जनरेशन पीआरटी सेवा दिली जात आहे.
सध्या अनेक वाहन उत्पादक कंपन्या फ्युचरीस्टीक कार आणि अन्य प्रकारच्या वाहननिर्मितीवर अब्जावधी रुपये खर्च करीत आहेत. काहींचे प्रोटोटाइपही तयार आहेत, अनेक प्रयोग यशस्वीही झालेले आहेत तर काही वाहने सध्या, प्रत्यक्षात रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी प्रातिनिधिक उदाहरणे:
टेस्ला सायबर ट्रक: टेस्ला सायबरट्रक हा फ्युचरीस्टीक इलेक्ट्रिक पिकअप ट्रक आहे. येत्या वर्षभरात हा रस्त्यावर दिसण्याची शक्यता आहे. साय-फाय चित्रपटात दाखवतात त्यानुसार या ट्रकची रचना असून त्यातील फीचर पण फ्युचरीस्टीक आहेत.
ऑडी एआय : ही इलेक्ट्रिक सेल्फ ड्रायव्हिंग एसयूव्ही कार आहे. ऑफ रोड आणि अत्यंत खडतर मार्गांवर ही गाडी ऑटोमॅटिकली चालावी, अशी टेक्नॉलॉजी तिच्यामध्ये आहे. ड्रोन आणि रडार वापरून ही गाडी रस्ता शोधून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्वतःच ड्रायव्हिंग करते.
ह्युंदाई एलिव्हेट कन्सेप्ट कार : ही खऱ्या अर्थाने फ्युचरीस्टीक कार आहे. ट्रान्सफॉर्मर मूव्हीमध्ये दाखवल्याप्रमाणे या कारला चाकांसोबतच रोबोटिक पाय आहेत. त्यामुळे अडथळ्यांवर सहज चढून जाता येणार आहे. खडतर भूभागावरही प्रवास करता येणार आहे.
भारतीय बनावटीच्या टाटा, महिंद्रा अशा कंपन्याही आता फ्युचरीस्टीक कार तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. टाटा अविन्या, महिंद्रा बीई सीरिजच्या माध्यमातून लवकरच त्या आपल्या भेटीला येणार आहेत.
फ्युचरीस्टीक कारमधील फीचर्स
स्पेस शिपसारखी बसण्याची व्यवस्था
१८० अंशांमध्ये टायर वळण्याची सोय
आर्टिफिशियल एक्झॉस्ट साउंड
मोठे स्क्रीन डिस्प्ले
३६० अंशात फिरणाऱ्या सीट
विमानांसारखे स्टेअरिंगचे डिझाईन
आकर्षक लायटिंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.