Ganesh Chaturthi 2024 Muhurta Puja Vidhi Mantra Information In Marathi
ओंकार दाते
आपल्याकडे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशपूजनाने होते. जो स्वतःच एक सुमुहूर्त आहे, त्याच्या स्थापना आणि पूजनासाठी कोणतीही वेळ शुभमुहूर्तच ठरते. यावर्षी ब्राह्ममुहूर्तापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी गणेशाची स्थापना व पूजा करता येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकते.
दरवर्षी गणेश चतुर्थी कधी साजरी केली जाते?
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते. भारतात आणि विशेषत्वाने महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेकजण संकष्टीचे व्रत करतात, विनायकाची पूजा करतात.