'माणुसकी हाच माणसाचा खरा धर्म. आणि माणूस हीच खरी जात. जो माणुसकीला जपेल त्याच्यावर गजाननाची कृपा नक्कीच होईल.'
-एकनाथ आव्हाड
Ganesh Chaturthi 2023 : “आजोबा, गणेशोत्सवात हारतुरे, नारळ, मोदक, मिठाईच्या ऐवजी मिळालेल्या वह्या, पेनं आम्ही वात्सल्य ट्रस्टमधील शाळेत जाणाऱ्या निराधार मुलांना भेट म्हणून देणार आहोत. त्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी तेवढाच आमचा हा खारीचा वाटा. या गणेशोत्सवातला आमचा हा उपक्रम.”
गेले चार दिवस आईनं घराची साफसफाई करणं चांगलंच मनावर घेतलं होतं आणि बाबांनी सोसायटीतल्या रहिवाशांसोबत सगळी सोसायटी व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीमच उघडली होती. घरी आईच्या मदतीला अधूनमधून बाळू, शमी सोबत असायचे. बाबांनी जेव्हा बाळू, शमीला तोंडाला रुमाल लावून घरातली साफसफाई करताना पाहिलं तेव्हा ते मुलांवर खूश होऊन जोशात म्हणाले “बच्चे लोग, होशियार....!
घरात जाळीजळमटं, धुळीची पुटं यांचं नामोनिशाण ठेवायचं नाही बरं. तुम्ही सारं घर चकाचक करा. मी सोसायटीतल्या मंडळींच्या मदतीने आपली अख्खी सोसायटी एकदम स्वच्छ, सुंदर करून टाकतो.” बाबांच्या यावेळच्या स्वच्छता अभियानामागचं कारणही तसंच होतं म्हणा. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोजून चारच दिवस बाकी होते. या वर्षी प्रथमच श्रीगणरायाचं घरी आगमन होणार होतं. आणि याच वर्षापासून त्यांच्या विघ्नहर्ता सोसायटीतही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार होता. दुग्धशर्करा योगच जणू जुळून आला होता.
बाळू, शमीचा आनंद आता या गणपतीच्या सुट्टीत द्विगुणित होणार होता, हे तर नक्कीच होते; कारण खास गणपतीसाठी आजोळहून आजी-आजोबा येणार होते, घरात पाहुण्यारावळ्यांची वर्दळ वाढणार होती. घर कसं आनंदाने गजबजून, फुलून जाणार होतं.
घराची साफसफाई झाल्यावर आईनं स्वतः विणलेलं तोरण दारावर लावलं. आख्खं घरच पर्यावरणपूरक विचारांचा आग्रह धरणारं असल्याने गणपतीच्या मखरासाठी थर्माकोलचा वापर न करता रंगीत क्रेप पेपरच्या कागदांचा वापर करून मखर तयार केलं. शमीने पिसारा फुलवलेल्या मोरांची एकसारखी दोन सुंदर, रंगीत चित्रं काढली. बाळूने ती चित्रं मखराच्या दोन्ही बाजूला छानपैकी चिकटवली. आता दोन्ही मोर जणू पिसारा फुलवून स्वागतालाच उभे आहेत, असं पाहणाऱ्यांना वाटत होतं.
घराचं रुपडंच पालटल्यासारखं झालं. आजी-आजोबा एक दिवस आधीच गावावरून आले होते. त्यांच्या येण्यानं घरात आता खऱ्या अर्थाने उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. बाळू, शमी तर दिवसभर आजी आजोबांना चिकटून असायचे. अखेर गणरायाच्या आगमनाचा दिवस उजाडला. नवीन कपडे परिधान करून गणरायाला वाजत गाजत घरी आणण्यात आलं. शाडूच्या मातीने बनवलेलीच गणपतीची छोटी, सुबक मूर्ती मखरात बसवल्यावर ती अधिकच सुंदर दिसू लागली.
आरतीची वेळ झाली. शेजारीपाजारी सोबतीला होतेच. बाळू, शमीच्या साऱ्या आरत्या तोंडपाठ. आरत्यांच्या वेळी बाबांनी मृदुंग वाजवला, लयबद्ध टाळ वाजवून आईने बाबांच्या मृदुंगाला मनमोहक साथ दिली. आरत्या म्हणताना बाळू, शमीची चढाओढ पाहण्यासारखी होती. टाळ, मृदुंगाच्या साथीने आरत्यांनी अवघे घर दुमदुमलं होतं. आरत्या झाल्यावर....
‘मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे ।
अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी ।।’
प्रार्थनेचा स्वर घरात सुगंधासारखा छान पसरला. पूजाअर्चा झाली. मोदकांचा प्रसाद हातावर ठेवला गेला. ‘संध्याकाळच्या आरतीला येतो’, असं सांगून शेजारी गेले. घरातली वर्दळ हळूहळू कमी झाली. पाहुण्यांची पांगापांग झाली.
आजी-आजोबा विश्रांतीसाठी आतल्या खोलीकडे वळले. बाळू, शमीही त्यांच्यामागोमाग गेले. बाळू आजोबांना म्हणाला, “आजोबा, आपल्या सोसायटीतही यावर्षी सार्वजनिक गणपती उत्सव साजरा होणार आहे बरं. आम्ही मुलांनीच मोठ्यांच्या मदतीने सारं डेकोरेशन केलंय. उत्सवात आम्हा मुलांच्या खूप स्पर्धा आहेत. चित्रकला, गायन, वक्तृत्त्व, निबंधलेखन, कवितावाचन आणि परवा तर शमीचं गाणं आणि माझा ‘दिवाकरांच्या नाट्यछटा’ सादरीकरणाचा कार्यक्रमसुद्धा आहे. आणि आजी, शमीने काढलेल्या चित्रांचं दालनही खाली उभारलं आहे.
स्वच्छता अभियानावर तिने खूप सुरेख आणि बोलकी चित्रं काढलीय. अनंत चतुर्दशीपर्यंत रोज खुलं असेल हे चित्रांचं दालन. आमच्यासाठी गणराय धमाल, मजा, मस्ती घेऊन आलेत असंच आम्हा मुलांना वाटतंय. आमच्यासाठी जणू आनंदाची पर्वणीच. आजोबा, आपण सारेच सोसायटीच्या गणपतीच्या दर्शनाला संध्याकाळी जाऊया हं,” आजोबा म्हणाले, “अरे, नक्की जाऊया आणि रोज संध्याकाळी सोसायटीतल्या मुलांचे कार्यक्रमही पाहूया. आमच्यासाठीसुद्धा ही मोठी मेजवानीच.”
बाळू म्हणाला, “आजी, मला सांग, तुम्ही मागच्या वेळी अष्टविनायक यात्रेला गेला होतात तेव्हा काय काय पाहिलं?” आजी म्हणाली, “अरे, आम्ही महाराष्ट्रातले आठ ठिकाणच्या गणपतींचे दर्शन घेतले. प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव वेगळं. मोरगावचा मोरेश्वर, पालीचा श्रीबल्लाळेश्वर, सिद्धटेकचा श्रीसिद्धिविनायक, महाडचा श्रीवरदविनायक, थेऊरचा श्रीचिंतामणी, लेण्याद्रीचा श्रीगिरिजात्मज, ओझरचा श्रीविघ्नेश्वर आणि रांजणगावचा श्रीमहागणपती..
गणरायाच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं. समाधानाने भरून पावलं. मुलांनो, गणपतीच्या मूर्तीकडे नीट निरखून पाहिल्यावर तर तुमच्या लक्षात येईल की त्याचे बारीक डोळे सांगतात सूक्ष्म निरीक्षण करा. त्याचं लंबोदर सांगतं अनेकांचे अपराध पोटात घालून क्षमा करा. त्याचे सुपासारखे कान सांगतात दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या. तर त्याचे चिमुकले पाय सांगतात उतावीळपणे कशाच्याही मागे धावू नका.”
शमी म्हणाली , “आजी, किती छान सांगितलंस गं. बाळू, अरे तुझी ती ‘बाप्पाची कृपा’ ही नवीन कविता आजी आजोबांना ऐकव ना!” बाळूनेही पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच कपाटातली त्याची कवितेची वही काढली. आणि कविता वाचायला सुरुवात केली....
बाप्पाच्या स्वागताचा, केवढा मोठा थाट
बाप्पा घरी येणार म्हणून, सारेच आनंदात..
वाजतगाजत घरी, बाप्पा जेव्हा येतो
घरोघरी चैतन्याचे, कारंजे फुलवितो..
बाप्पासाठी मखराची, शोभिवंत आरास
समईच्या प्रकाशाने, उजळे सारा निवास..
बाप्पाच्या आरतीला, आम्हीच होतो भाट
उत्साहाने घर अवघे, भरे काठोकाठ..
बाप्पाच्या सेवेत, लगबग साऱ्यांची
प्रत्येकाच्या ओठांवर, गोडी मोदकांची..
सत्य, सुंदर, मांगल्याचा जो जो घेईल ध्यास
त्याच्यावरी बाप्पाची, कृपा होईल खास..
“खूपच छान कविता. खरंच आहे, माणुसकी हाच माणसाचा खरा धर्म. आणि माणूस हीच खरी जात. जो माणुसकीला जपेल त्याच्यावर गजाननाची कृपा नक्कीच होईल,” आजी म्हणाली. “आणि आजी, यावेळी आम्ही मुलांनी काय केलंय ठाऊक आहे? अगं, आम्ही सोसायटीत घरोघरी जाऊन सांगितलंय, की दर्शनाला येताना हारतुरे, नारळ, मोदक, मिठाई न आणता फक्त एक वही आणि एक पेन आणा,” बाळूनं माहिती दिली. आजोबांनी आश्चर्याने विचारलं, “गणपतीला वही आणि पेन? अरे, मग त्यांचं करणार काय?”
बाळू म्हणाला, “आजोबा, आम्ही त्या वह्या, पेनं वात्सल्य ट्रस्टमधील शाळेत जाणाऱ्या निराधार मुलांना भेट म्हणून देणार आहोत. त्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी तेवढाच आमचा हा खारीचा वाटा. या गणेशोत्सवातला आमचा हा उपक्रम.” बाळूचं बोलणं ऐकून आजीने बाळूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. का कुणास ठाऊक आजोबांचे डोळेही पाणावले आणि शमीला तर आपल्या दादाचा खूप खूप अभिमान वाटला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.