डॉ. भावार्थ रा. देखणे
‘अ’कार, ‘उ’कार आणि ‘म’कार मिळून ॐकार बनतो. गणपती ॐकार रूप आहे. म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा जन्मदाता ॐकार रूप गणरायच आहे. संत साहित्यात सकल संतांनी गणपतीची सुंदर वाङ्मय मूर्ती मांडली आहे. शब्दांमधून प्रकट होणारा गणपती हा मराठी सारस्वताचा एक अक्षय ठेवा आहे. हा ठेवा देवत्वाला, ज्ञानतत्त्वाशी सदैव जोडत आला आहे.
गणपती ही सारस्वतांची देवता. तत्त्ववेत्यांनी त्याचे तत्त्वदर्शन मांडले. ती देवता ॐकाररूप आहे. तोच अक्षय, अविनाशी आहे. तोच ब्रह्मरूप आहे. तोच ज्ञान-विज्ञानरूपदेखील आहे. तत्त्वबोधाने आनंदाची अनुभूती घडविणारा प्रबोधनरूपही तोच आहे.