ऋचा थत्ते
पुण्यात गणपती पाहायला जाण्यात विलक्षण आनंद असतो. मानाचे पाच गणपती आवर्जून पाहणं आणि पेपरमधील वर्णन वाचून विशिष्ट देखावा पाहायला जाणं, हा आनंदोत्सव असायचा. हलत्या देखाव्यातून ऐतिहासिक पौराणिक कथा पाहताना मजा वाटायची. यातून प्रबोधनही होतंच. आता वेळेची मर्यादा असते, मात्र एकेकाळी रात्रभर रस्ते गर्दीनं फुलून जायचे.
‘अहो, दुर्वा मिळाल्या का हो?’, ‘पूजेची भांडी घासायला देतेस ना?’, ‘काय सुंदर मूर्ती मिळाली हो! आता दरवर्षी इथूनच घेऊ!’, ‘तुमच्याकडे किती दिवस असतो?’, ‘तुमच्याकडे गौरी खड्याच्या की कशा?’, ‘सवाष्ण मिळाली का हो?’, ‘मोदक तळणीचा की उकडीचा?’, ‘काय मग मुलांनो, ढोल-ताशांची प्रॅक्टिस आणि नाटकाची तालीम जोरात ना?’, ‘यावेळी वर्गणी चांगली जमली!’, ‘थांब गं बाळा सई, बाप्पाला नैवेद्य दाखवला ना, की पहिला मोदक तुलाच देणार हो...’ असे संवाद ऐकू येऊ लागले, की समजावं, बाप्पा आगमनासाठी सज्ज झालेत!