केतन पुरी
गणेश किंवा गणपती म्हणजे गणांचा अधिपती, गणांचा प्रमुख... या देवतेविषयी काही पौराणिक, काही ग्रांथिक, तर काही शिल्पशास्त्रातून आढळणाऱ्या ऐतिहासिक संदर्भांचा एक मागोवा...
हिंदू देवतांमधील सर्वांत लोकप्रिय देवांपैकी एक म्हणजे गणपती. पंचायतन समूहातील पाच देवतांपैकी एक म्हणजे गणेश. फक्त भारतातच नव्हे, तर अनेक दक्षिण आशियाई देशांमध्येही गणपती बाप्पाला लोकप्रिय देवतेचा दर्जा प्राप्त झाला आहे. तो इतक्या प्रतिष्ठित पदावर विराजमान आहे, की कोणतेही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक किंवा व्यावसायिक कार्य असो, ते सुरू होण्यापूर्वी त्याची पूजा केली जाते.
गणपतीला बुद्धीची आणि समृद्धीची देवता म्हणून ओळखले जाते. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांच्या अनुयायांनी गणरायाला आदराचे स्थान दिले आहे. गणपतीचे भक्त त्याला विघ्नेश (अडथळ्यांचा स्वामी), विघ्नहर्ता (संकट दूर करणारा), मंगलदाता (कल्याण करणारा आणि शुभ गोष्टी देणारा), सिद्धिदाता (यशाचा दाता), परब्रह्म (सर्वोच्च) बुद्धिविधाता (ज्ञानाचा देव) म्हणून पूजतात. गणेश किंवा गणपती म्हणजे गणांचा अधिपती, गणांचा प्रमुख...