Georges Pierre Seurat : ‘बिंदुवादी’ चित्रशैलीद्वारे जागतिक कलाविश्वावर स्वतंत्र ठसा उमटविणारा फ्रेंच चित्रकार

‘निओ-इम्प्रेशनिझम’ शैलीतील ही चित्रं दृष्टीभ्रमावर आधारित होती.
Georges Seurat
Georges SeuratESAKAL
Updated on

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस एका प्रदर्शनात जॉर्ज सराने ला ग्रँड जेत्त हे पेंटिंग सादर करून ‘निओ-इम्प्रेशनिझम’ची आणि ‘बिंदुवादा’ची मुहूर्तमेढ रोवली. ‘निओ-इम्प्रेशनिझम’ शैलीतील ही चित्रं दृष्टीभ्रमावर आधारित होती.

डॉ. सुहास भास्कर जोशी

सन १८८५च्या हिवाळ्यातील एक थंडगार रात्र. पॅरिसजवळच्या उपनगरातील एका घराच्या वरच्या मजल्यावरच्या काचेच्या तावदानातून मंद उजेड जाणवतोय. हा एका चित्रकाराचा स्टुडिओ आहे. अनेक रंगवलेले कॅनव्हास भिंतीला टेकवून ठेवलेत.

अनेक रंगांची भांडी टेबलावर ओळीने मांडून ठेवली आहेत. एक प्रचंड आकाराचा कॅनव्हास भिंतीला टेकून ठेवलाय. पाण्यात फिरणाऱ्या बोटी, काठावरच्या हिरवळीवर निवांत बसलेले, मजेत फिरणारे स्त्री-पुरुष दाखवणारे निसर्गदृश्य कॅनव्हासवर साकार होत आहे. गेले कित्येक दिवस आणि रात्री न थकता, अचूक, काळजीपूर्वकरितीने हे पेंटिंग साकारलं जातंय.

चित्रकार एका छोट्या शिडीवर चढून त्या प्रचंड मोठ्या कॅनव्हासवर काम करतोय. सर्वात लहान आकाराच्या ब्रशने तो रंग घेतो आणि कॅनव्हासवर उंच कोपऱ्यात अतिशय शांतपणे टिंबसदृश ठिपके काढतोय. टिंब. टिंब.. टिंब... टिंब.... शेकडो हजारो टिंबं.

गवत, पाणी, बोटी, झाडं, माणसं... सगळेच आकार छोट्या ठिपक्यांनी-टिंबांनी बनलेत. अमूर्तवादाकडे झुकलेले अस्पष्ट आकार. प्रकाशाच्या कणांनी गतिमान झालेली हवा. हालचाली कायमच्या थांबल्यात असं वाटावं असं गतिमान निसर्गाचं स्थिर निसर्गचित्र.

हे होतं ला ग्रॅंड जेत्त (La Grande Jette) या नावानं पुढं जगप्रसिद्ध झालेलं आणि ‘बिंदुवादा’चं (Pointillism) प्रतीक बनलेलं महान पेंटिंग. आणि हे साकारणारा थोर प्रतिभावंत होता फ्रेंच चित्रकार जॉर्ज सरा (Georges Seurat, १८५९-१८९१).

Georges Seurat
Korean Art Exhibition : पुणे विद्यापीठातील कोरियन कला प्रदर्शनाला सुरुवात

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चित्रकारांना रेषेपेक्षा रंगांचं महत्त्व अधिक वाटू लागलं. त्यातही अखेरच्या तीन दशकात दृकप्रत्ययवाद (Impressionism) आणि त्यापाठोपाठ आलेल्या उत्तर-दृकप्रत्ययवाद (post-Impressionism) आणि नव-दृकप्रत्ययवाद (Neo-Impressionism) या संकल्पनांनी कलाविश्वावर मोठा प्रभाव टाकला होता.

१८७० ते १८९० या काळातल्या इम्प्रेशनिस्ट चित्रकारांनी आपल्या चित्रांमध्ये दोन रंगाचं लेपन करून तिसऱ्या रंगाचा आभास निर्माण केला. १८८० ते १८९० या दरम्यान व्हॅन गॉगसारख्या काही ‘पोस्ट-इम्प्रेशनिस्ट’ चित्रकारांनी आपल्या चित्रांमधील ब्रशचे ‘स्ट्रोक्स’ किंवा फटकारे काहीसे आखूड करून त्यात गतीमानता आणली.

१८८६ साली एका प्रदर्शनात जॉर्ज सराने ला ग्रँड जेत्त हे पेंटिंग सादर करून ‘निओ-इम्प्रेशनिझम’ची आणि ‘बिंदुवादा’ची मुहूर्तमेढ रोवली.

‘निओ-इम्प्रेशनिझम’ शैलीतील ही चित्रं दृष्टीभ्रमावर आधारित होती. निओ-इम्प्रेशनिस्ट चित्रकार पॅलेटवर रंग मिसळत नसत, कारण त्यामुळे रंग निस्तेज (Dull) होतात असे त्यांचे म्हणणे होते. याउलट हे चित्रकार दोन शुद्ध (त्यातही विरुद्ध) रंगांचे लहान लहान ‘पॅचेस’ किंवा ठिपके अथवा बिंदू थेट कॅनव्हासवर एकमेकांजवळ ठेवत.

एका विशिष्ट अंतरावरून पाहिले असता आपल्या डोळ्यात दोन रंग एकमेकात मिसळून, तिसराच उजळ, तेजस्वी, गतिमान रंग दिसल्याचा भास होई. उदाहरणार्थ शुद्ध निळ्या आणि पिवळ्या रंगांचे ठिपके शेजारी आले की झगझगीत हिरव्या रंगाचा भास होई.

निओ-इम्प्रेशनिस्ट चित्रकार सरा हजारो-लाखों बिंदूसदृश ठिपक्यांच्या साहाय्याने चित्रातील आकार बाह्यरेषा न दाखवता रेखीवपणे स्पष्ट स्वरूपात दाखवत असे, आणि छायाप्रकाशाचा योग्य परिणामही साधत असे.

आपल्या चित्रांमध्ये लाल आणि हिरवा, नारिंगी आणि निळा, पिवळा आणि जांभळा अशा विविध जोड्यांच्या बिंदूंचा प्रभावी वापर करून सरा चित्रामध्ये गडद आणि फिक्या रंगांचा आभास निर्माण करे. भव्य आकाराच्या कॅनव्हासवर अतिशय शांतपणे तो लाखो छोटे छोटे बिंदू रंगवत पेंटिंग साकारत असे.

त्याच्या या शैलीला ‘पॉइंटीलिझम’ (Pointillism) किंवा ‘बिंदुवाद’ असे म्हटले गेले. चित्रामधील अचूक रंगसंगती आणि विविध रंगछटा यामागे सराचा निश्चित असा विचार असे, आणि या सगळ्याचं शास्त्रशुद्ध विवेचन करायलाही त्याला आवडे. सराच्या शैलीमागे कलेइतकेच शास्त्र किंवा विज्ञानही महत्त्वाचे आहे.

सराच्या सर्व पेंटिंग आणि ड्रॉईंगमध्ये ठाम स्वरूपाचा अचूक नेमकेपणा जाणवतो. चित्रकृतीचं अंतिम रूप डोक्यात नेमकं स्पष्ट झाल्याशिवाय तो चित्र सुरूच करत नसे. सरा नेहमी म्हणायचा, “लोकांना माझ्या चित्रांमध्ये कविता दिसते, पण मला मात्र त्यात फक्त विज्ञानच दिसतं!”

Georges Seurat
Career Options for Arts Stream: कला शाखेचे विद्यार्थी या क्षेत्रात करू शकतात करिअर, दरमहा होईल लाखोंची कमाई

अवघं एकतीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या जॉर्ज सराने आपल्या कलाकृतींद्वारे आणि ‘बिंदुवादी’ चित्रशैलीद्वारे जागतिक कलाविश्वावर स्वतंत्र अमिट असा ठसा उमटवला. अल्पायुषी सराने आपल्या कलेद्वारे नवचित्रकलेला नवीन दिशा तर दिलीच, पण ‘बिंदुवादा’चा प्रणेता या नात्याने आधुनिक चित्रकलेचे तो प्रतीक बनला.

जाण आल्यापासूनच्या आयुष्यात सतत रेषेचा आणि विशेष करून रंगांचा विचार करणारा सरा हा कायमच शांत, अंतर्मुख आणि गंभीर प्रवृत्तीचा कलाकार होता. लाजाळू-संकोची स्वभावाचा सरा दिसायला मात्र देखणा, उंचनिंच आणि बळकट शरीरयष्टीचा होता.

धूम्रपान, मद्यपान, इष्कबाजी अशा गोष्टींपेक्षा त्याला पुस्तकं वाचणं आणि चित्रं रंगवणं या दोनच गोष्टी मनापासून प्रिय होत्या. तर्कशुद्ध विचारसरणी आणि गणिती सूत्रांनुसार चित्रकृतीतील रंगांची मांडणी यावर विश्वास असणारा सरा म्हणजे एक शास्त्रज्ञ कलावंत होता.

स्वतःभोवती खासगीपणाचा कोश उभारून, मित्र-कुटुंबीयांपासून स्वतःला दूर ठेवणारा ‘वर्कोहोलिक’ सरा दिवसरात्र फक्त आणि फक्त चित्रं रंगवत असायचा.

जॉर्ज सराचा जन्म २ डिसेंबर १८५९ रोजी पॅरिसमधील एका श्रीमंत घरात झाला. निवृत्त सरकारी अधिकारी असणाऱ्या त्याच्या वडिलांनी जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात भरपूर पैसा कमावला होता. मात्र एकलकोंड्या स्वभावाच्या त्याच्या वडिलांनी कायमच घर, कुटुंबीय यांच्यापासून अंतर राखून स्वतंत्र एकाकी आयुष्य घालवलं.

आठवड्यातून फक्त एक दिवस दर मंगळवारी संध्याकाळी ते कुटुंबीयांबरोबर एकत्र जेवण घेत आणि पुन्हा उपनगरातील आपल्या घरी एकटेच परत जात. एकट्याने आपल्या स्टुडिओत राहणाऱ्या जॉर्जमध्ये वडिलांचा हाच स्वभावविशेष उतरला होता.

आपल्या आयुष्याचं खासगीपण जपण्याची वृत्ती सरामध्ये इतकी टोकाला गेली होती, की सराच्या मृत्यूच्या दोन दिवस आधीपर्यंत त्याच्या आईला आणि जवळच्या मित्रांनासुद्धा त्याला मॅडेलिन नॉबलॉक नावाची बायको आणि एक लहान मुलगा आहे हे ठाऊक नव्हतं!

लहानपणापासून सराला चित्रकलेची आवड होती. पण तो कधीच हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात नव्हता. १८७८ साली वयाच्या अठराव्या वर्षी त्याला पॅरिसमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘एकोल दे बो ऑफ आर्ट’ (Ecole des Beaux-Arts) या चित्रशाळेत प्रवेश मिळाला.

पण सराच्या मते इथल्या शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धती कालबाह्य होत्या, आणि त्यांचे रंगांच्या वापराबद्दलचे विचारही जुनाट होते.

त्यात पुन्हा इम्प्रेशनिस्ट चित्रकारांचे प्रदर्शन पाहिल्यानंतर सराला स्वतःची स्वतंत्र वाट धुंडाळावी असं वाटू लागलं, आणि त्याने या चित्रशाळेला रामराम ठोकला.

ही स्वतंत्र वाट म्हणजे रेषेचा आणि विशेषतः रंगांचा सजगपणे वापर. सराच्या मते चित्रकृतीच्या विविध आकारातील रेषा निरनिराळ्या भावना दर्शवतात. वर जाणाऱ्या रेषा आनंद, आडव्या समांतर रेषा शांत तटस्थपणा, आणि खाली जाणाऱ्या रेषा दुःख किंवा खेद भावना दाखवतात.

रंगाबाबत तर तो वयाच्या सतराव्या वर्षापासून चिंतन करत होता. रंगांमधून मानवी भावना व्यक्त करता येतात. उजळ रंगांमधून आनंदी, तर गडद रंगांमधून दुःखाच्या भावना व्यक्त होतात.

मात्र रंग पॅलेटवर एकमेकात मिसळून ते ‘डल’ करण्याऐवजी, विरुद्ध (Contrasting) किंवा साहाय्यकारी (Complimentary) रंगांचे छोटे छोटे ठिपके शेजारी शेजारी ठेवण्याने ते एकमेकात मिसळून नवा रंगानुभव तर देतातच, पण तेजस्वी, उजळ व झगझगीत रंग असलेली चित्रकृती दर्शकांना पाहायला मिळते.

Georges Seurat
Jahangir Art Gallery : जहाँगीर आर्ट गॅलरीत जिविधल; खानदेशातील चित्रकारांचे समूह चित्रप्रदर्शन

सराच्या कला शिक्षणात एक वर्षाच्या सैनिकी सेवेमुळे काहीसा खंड पडला, पण त्याकाळातही फावल्या वेळात तो स्केचेस काढत बसे. समकालीन चित्रकार व्हॅन गॉग, पॉल गोगॅं, तुळूज लोत्रेक यांच्याशी सराची काही प्रमाणात मैत्री होती.

पण खरं तर सराला त्यांच्याबरोबर फालतू गप्पात वेळ घालवण्यापेक्षा वाचनात अथवा चित्रांविषयी चिंतन करण्यात वेळ घालवावासा वाटे. मात्र त्यांच्याप्रमाणेच सराला निसर्गदृश्यं, समुद्रदृश्यं, पॅरिसमधील नाईटलाईफ, सर्कसमधील कसरतपटू व विदूषक वगैरे विषयांचं आकर्षण होतं, परंतु इम्प्रेशनिस्ट चित्रकारांप्रमाणे घराबाहेर पडून आणि प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन प्रकाशाचा खेळ दर्शविणारी चित्रं वेगाने काढण्यात सराला रस नव्हता.

तो तिथं स्केचेस अथवा अभ्यासचित्रं काढून स्टुडिओमध्ये शांतपणे चित्रं रंगवत असे. त्याने रंगवलेल्या चित्रकृतींमध्ये बेदर्स अॅट अस्नीअर्स, बोट्स अॅट ग्रँडकॅम्प, ला परेड आणि द सर्कस या विशेष उल्लेखनीय आहेत.

यापैकी बेदर्स अॅट अस्नीअर्स हे १८८३-८४ साली काढलेले बिंदुवादी शैलीतील पेंटिंग ७९” बाय ११८” या आकाराचे निसर्गदृश्य असून, यामध्ये नदीमध्ये डुंबणारे आणि काठावर हिरवळीत निवांत बसलेले पुरुष दिसतात.

त्यांच्या स्थिर, स्तब्ध बसण्यातून संपूर्ण वातावरणात शांत, निवांत, विश्रांत अवस्था व्यक्त होत आहे. ला परेड आणि द सर्कस ही दोन्ही बिंदुवादी शैलीतीलच पेंटिंग असली तरी त्यांचा विषय पॅरिसमधील नाईटलाईफ -विशेषतः सर्कशीतील वातावरण दाखवणे आहे.

यांच्याशिवाय सराने काही समुद्रदृश्यं रंगवली असली तरी सराची खरी ओळख ही ला ग्रँड जेत्तचा निर्माता अशीच आहे.

१८८४-८६ या काळात रंगवलेले ला ग्रँड जेत्त हे बिंदुवादी शैलीत रंगवलेले पेंटिंग ८१” बाय १२०” म्हणजे पावणे सात फूट बाय दहा फूट इतक्या भव्य आकाराचे आहे.

अतिशय सुनियोजित व काळजीपूर्वकरित्या बनवलेल्या या पेंटिंगसाठी सराने तैलरंगातील सुमारे ३० अभ्यासचित्रे, २८ रेखाटने, आणि तीन मोठे तैलरंगातील कॅनव्हास केले होते.

ग्रँड जेत्त हे पॅरिसच्या सीन नदीच्या काठावरचे एक छोटे बेट आहे. त्या काळात पॅरिसमधील अनेक उच्चभ्रू स्त्री-पुरुष, कामगार वर्ग आणि कुटुंबीय मौजमजेसाठी आणि फिरण्यासाठी या बेटावर जात असत.

या निसर्गदृश्यात पाण्यात वल्हवल्या जाणाऱ्या बोटी, मासे पकडण्यासाठी गळ टाकून उभ्या स्त्रिया, हिरवळीत आरामात पडलेले पुरुष, बिगुल वाजवणारा तरुण, खेळणारी मुलं, याशिवाय छत्री घेऊन पाळीव माकडाला फिरवणाऱ्या फॅशनेबल स्त्रिया अशा अनेक व्यक्तिरेखा दिसतात.

मात्र असं असलं तरी वातावरण सगळं शांत, स्तब्ध, स्थिर, गोठल्याप्रमाणे भासत आहे. दर्शक हे पेंटिंग पाहताना त्या निसर्गदृष्यात सहभागी होत नाहीत, तर चकित होऊन लांबून अलिप्तपणे पाहात राहतात.

अर्थात या पेंटिंगमधील व्यक्तिरेखा आणि त्यामागचा प्रतिकात्मक अर्थ महत्त्वाचा नाही, तर चित्राची भौमितिक सुसंगत संरचना आणि बिंदुसदृश ठिपक्यांचा अद्‌भुत रंगाविष्कार या गोष्टी विशेष उल्लेखनीय आहेत.

दर्शकांनी जशा प्रकारे हे रंग पाहावेत, असं सराला वाटत होतं, अगदी तसंच त्याने हे पेंटिंग सादर केलं होतं. एक अर्थाने हे पेंटिंग म्हणजे सराचा ‘बिंदुवादी’ चित्रशैलीचा जाहीरनामा होता.

महान प्रतिभावंत जॉर्ज सराचा अवघ्या एकतिसाव्या वर्षी मार्च १८९१ मध्ये मॅनेंजायटीस या विकाराने मृत्यू झाला. पण आपल्या छोट्याशा आयुष्यातील जबरदस्त कामगिरीने सराने नवचित्रकलेला अशी दिशा दिली की विसाव्या शतकातील चित्रकारांवरदेखील मोठा प्रभाव पडला.

--------------

Georges Seurat
Google Search : गुगल सर्चची पंचविशी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.