सुहास किर्लोस्कर
चित्रपटातील एखाद्या दृश्यात दिसणाऱ्या वस्तूंच्या रचनेवरून त्या दृश्यातील व्यक्तींचे स्वभावविशेष सांगण्याचा विचार चित्रपटाची प्रॉडक्शन डिझायनर टीम करीत असते.
द इक्वलायझर चित्रपटाच्या सुरुवातीला एका खिडकीमधून एक शहर दिसते. कॅमेरा खिडकीमधून आत येतो, एका कपाटावर ठेवलेल्या डिजिटल घड्याळामध्ये आपल्याला सकाळचे साडेसात वाजल्याचे दिसते.
कॅमेरा त्या खोलीमध्ये इतरत्र फिरतो त्यावेळी आरसा, हिटर दिसतो. सकाळी साडेसात वाजता बेड व्यवस्थित लावलेला दिसतो. याचा अर्थ इथे राहणारी व्यक्ती फारच व्यवस्थित आणि शिस्तप्रिय आहे.
कॅमेरा बेडरूममधून मागे येतो आणि आपल्याला दुसरी खोली दिसते त्यात एका स्टडी टेबलवर टेबल लॅम्प दिसतो. टेबलच्या मागे पुस्तकाचे रॅक दिसते ज्यामध्ये अनेक पुस्तके दिसतात. याचा अर्थ ही व्यक्ती अभ्यासू आहे.
कॅमेरा उजवीकडे वळतो आणि आपल्याला स्वयंपाकघर दिसते. ट्रिमरने शेव्हिंग, डोक्याचा चकोट करणाऱ्या व्यक्तीचा हात दिसतो. नंतर तो स्वच्छ ज्यूसमेकरमध्ये ज्यूस करतो.
याचा अर्थ उत्तम आहाराच्या बाबतीत हा माणूस फार विचार करणारा आहे. दात घासायच्या ब्रशने स्पोर्ट शूज साफ करणारा हा माणूस फारच काटेकोर आणि शिस्तबद्ध आहे, जे समजते. पुढील शॉटमध्ये हा माणूस (डेन्झेल वॉशिंग्टन) आपल्याला आरशासमोर तयार झालेला दिसतो.
अशा प्रकारे राहत्या घरातील, ऑफिस टेबलवरील वस्तू कशा ठेवल्या आहेत त्यावरून व्यक्तिविशेष सांगणे या बाबीचा विचार प्रॉडक्शन डिझायनर टीम करत असते.
शिंडलर्स लिस्ट चित्रपटाच्या सुरुवातीला रेल्वे स्टेशनवर ज्यू लोकांच्या नोंदी घेतल्या जात असतात त्याचवेळी एका टेबलवर उंची मद्य बाटलीमधून ग्लासमध्ये ओतले जाते, बेडवर ठेवलेल्या एका सूटवर चार प्रकारचे टाय मॅच करून बघितले जातात.
पांढऱ्या फूल शर्टला लावण्याची अनेक कफलिंक निवडताना आपण नायकाचे हात बघतो आणि नायकाचा चेहरा बघण्यापूर्वीच आपल्याला नायकाच्या आर्थिक स्तराची आणि राहणीमानाची कल्पना आलेली असते. (दिग्दर्शक- स्टीव्हन स्पीलबर्ग, प्रॉडक्शन डिझायनर – अॅलन स्टारस्की)
गली बॉय चित्रपटामध्ये धारावी झोपडपट्टीतील घरांमधील वस्तूंची मांडणी करणारे प्रॉडक्शन डिझायनर असतात आणि तेच कल्कीच्या आलिशान फ्लॅटमधील मोठ्या बाथरूमचे डिझाईन तयार करतात.
छोट्या खोलीत आयुष्य काढलेला नायक (रणबीर सिंग) चालता चालता कल्कीच्या घरातल्या आलिशान बाथरूमची लांबी-रुंदी मोजताना विचार करतो, आपण जेवढ्या जागेत राहतो तेवढी हिची बाथरूम आहे.
त्या शॉटचे श्रेय दिग्दर्शक झोया अख्तरप्रमाणेच सुझान मेरवानजी या प्रॉडक्शन डिझायनरला जाते. हैदर चित्रपटात दिसणारे काश्मीर (सुब्रता चक्रवर्ती, अमित रे), गुरु चित्रपटातील तेव्हाची गिरणी कामगारांची मुंबई, तेव्हाचे शेअर मार्केट, खेडेगावातील घर (समीर चंदा) बघताना जाणते-अजाणतेपणे चित्रपटाचा माहोल आपण बघत असतो; त्याचे श्रेय त्या कलादिग्दर्शकाला, ज्याला आता प्रॉडक्शन डिझायनर म्हणतात, त्या टीमला जाते.
अर्थात प्रॉडक्शन डिझाईन करताना चित्रपटाच्या बजेटचाही विचार करावा लागतो. परिंदा चित्रपटासाठी विधू विनोद चोप्रा कमीत कमी पैशात मिळणारी पायऱ्या असणारी जागा शोधत होते आणि एक जागा पसंत पडली, परंतु त्याकरिता सहा हजार रुपये देणे त्यांना शक्य नव्हते.
मुंबईमध्ये फिरता फिरता त्यांना अँटॉप हिलवर एक टँक दिसला. त्याचे अवघे २५० रुपये भाडे देऊन दिग्दर्शक विधू आणि सिनेमॅटोग्राफर बिंदू प्रधान यांनी चित्रपटाच्या सुरुवातीचा शॉट परिणामकारक बनवला आहे.
ते लोकेशन ज्या पद्धतीचे होते त्याला अनुसरून तसे डायलॉग लिहिण्यात आले. शेवट भव्य करण्यासाठी ३१ डिसेंबरला गेट वे ऑफ इंडियासमोर असलेल्या गर्दीचा चपखल वापर करण्यात आला.
लगान चित्रपटासाठी नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शक या नात्याने भूजमध्ये वसवलेल्या गावातील उपलब्ध जागेचा वापर करताना रुपाली गट्टी यांनी एन्व्हॉयर्नमेंट डिझायनरच्या रोलमध्ये प्रॉप्स, दोन व्यक्तींच्या सभोवती दिसणारी जागा भरताना वस्तू दाखवून त्यामधून वातावरण निर्मिती केली आहे.
एक व्यक्ती कुंभार आहे, दुसरी व्यक्ती चांभार आहे, तिसरी व्यक्ती कोंबड्या पाळते (आणि पकडते), चौथी व्यक्ती बाजेवर पडून आहे. रुपाली यांच्याशी संवाद साधून प्रॉडक्शन डिझायनरच्या कामाचे स्वरूप जाणून घेतले.
बाहुबली चित्रपटामध्ये त्या काळात महाल कसा असेल, गाव कसे असेल, राजवाडा कसा असेल, जंगलातील फाइट सीन दाखवताना जंगल कसे असेल, आदिवासी भाग कसा दाखवावा लागेल यावर रिसर्च केला आणि राजवाडा आणि राजवाड्याचा भवताल दाखविणाऱ्या मिनिएचर म्हणजेच लहान प्रतिकृती तयार केल्या.
अभ्यास करून असे छोट्या स्वरूपातील भव्य दृश्य साकारण्यासाठी किमान सहा महिन्यांचा वेळ द्यावा लागतो. द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल बाहेरून गुलाबी रंगाचे दिसते, ते खरे तर १३ फूट लांब आणि ९ फूट उंच असलेले मिनिएचर मॉडेल होते.
तसे हॉटेल तयार करून पडद्यावर भव्य स्वरूपात दाखवणे हे कला कौशल्य आहे. इंडिपेंडन्स डेमध्ये (१९९६) ‘उडवलेले’ व्हाइट हाऊस मिनिएचर स्वरूपात करून त्याचा छोट्या स्वरूपात स्फोट केला आहे. बॅटमॅन बिगिन्स चित्रपटातील गोथम शहर खरे तर मिनिएचर मॉडेल आहे.
तुंबाड चित्रपटात कला विभाग सांभाळणाऱ्या रुपाली गट्टी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून कला दिग्दर्शनाबद्दल अधिक माहिती घेतली. त्यांनी सांगितले, की जागतिकीकरण झाल्यानंतर तंत्र आणि तंत्राचे आदान-प्रदान वाढल्यानंतर प्रॉडक्शन डिझायनरच्या कामाची व्याप्ती वेगाने वाढली आहे.
राजमौली यांच्यासारख्या दिग्दर्शकाचे व्हिजन समजून घेऊन रुपाली यांनी त्यानुसार बाहुबली चित्रपटासाठी एन्व्हॉयर्नमेंट डिझायनर या नात्याने चित्रे काढली, काढलेल्या चित्रांना दृश्य स्वरूप देण्याचे काम प्रॉडक्शन डिझायनर टीमने केले.
याला प्री-प्रॉडक्शन म्हणतात. पूर्वीच्या चित्रपटात एखादी कार रस्त्यावरून जाते हे दाखवण्यासाठी स्टुडिओमध्ये एकाच ठिकाणी कार स्थिर ठेवायचे आणि त्यामागील पडद्यावर मागे-पुढे जाणारा रस्ता दाखवायचे.
आजचा सिनेमा सत्याच्या जवळ जाणारा आहे. आजच्या प्रेक्षकांच्या डोळ्यांत धूळफेक करता येत नाही. प्रेक्षक विविध देशांतील चित्रपट बघितल्यामुळे सुजाण झाला आहे.
व्हीएफएक्सचा अतिरेक टाळून सत्याच्या जवळपास जाणारे चित्र उभे करण्याचे प्रयत्न अजूनही होत आहेत.
ब्रुस ऑलमाईटी चित्रपटामध्ये जिम केरीला मॉर्गन फ्रिमन दिसतो त्याची वेशभूषा पांढरी आहे, त्या दृश्याचा भवताल पांढऱ्या रंगाचा आहे, ड्रॉवर पांढरे आहेत आणि त्यामधील फाइल पांढऱ्या रंगाच्याच आहेत. या वातावरणनिर्मितीमुळे त्या दृश्याचा वेगळा प्रभाव पडतो.
या चित्रपटावर आधारित गॉड तुस्सी ग्रेट हो या हिंदी चित्रपटातील हाच प्रसंग सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झाला आहे. हा प्रसंग मूळ चित्रपटाप्रमाणे परिणामकारक होऊ शकला नाही, कारण हिंदी चित्रपटातील प्रॉडक्शन डिझाईन फारच भडक केले आहे.
अर्थात सलमान-अमिताभ दोघेही जिम केरी-मॉर्गन फ्रिमन होऊ शकत नाहीत त्याचप्रमाणे दिग्दर्शकाची व्हिजन आणि सौंदर्य दृष्टी तितकी उंची गाठू शकली नाही हेसुद्धा एक कारण आहे.
ओम शांती ओम चित्रपट १९७०चे दशक आणि २००७ साल असे दोन काळ दाखवतो. १९४२ अ लव्ह स्टोरी चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळ, पद्मावत चित्रपटात सतरावे शतक दाखवण्यासाठी किती बारकाईने काम करावे लागले असेल याची कल्पना करता येईल.
मुघल-ए-आझम चित्रपटात एम. के. सय्यद यांनी उभे केलेले सेट, बेल्जियम ग्लासचा आरसे महाल, मुघल राजवाड्याची प्रतिकृती चित्रपटातील कलाकारांइतकीच महत्त्वाची भूमिका बजावतात.
पाकिजा चित्रपटात कला दिग्दर्शक एन. बी. कुलकर्णी यांनी उभे केलेले हवेलीचे सेट चलते चलतेसारख्या गाण्यांना चार चाँद लावतात.
कला दिग्दर्शकाचे महत्त्व अधोरेखित करताना हे आवर्जून नमूद करावेसे वाटते, की दिग्दर्शकाचे ‘व्हीजन’ सत्यात उतरवण्याचे काम कलादिग्दर्शक करतात.
भालजी पेंढारकर यांनी साकारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ ‘व्हीएफएक्स’च्या जमान्यात उभा करणे आव्हानात्मक आहे, कारण त्यांनी तो काळ साकारताना अभ्यासपूर्वक प्रयत्न केले होते आणि त्यामध्ये सिनेमॅटिक ड्रामा करण्याचे टाळले होते.
स्टोरी बोर्ड
प्रॉडक्शन डिझायनर दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून त्यांच्या व्हीजननुसार स्टोरी बोर्ड तयार करतात. स्टोरी बोर्ड म्हणजे पटकथेमधील शॉट दृश्य स्वरूपात कागदावर उतरवणे, दिग्दर्शकाच्या मनातील दृश्यांची सिक्वेन्सनुसार चित्रे काढणे.
दिग्दर्शक सत्यजित राय स्वतः उत्तम चित्रकार असल्यामुळे त्यांच्या मनातील दृश्ये स्टोरी बोर्ड स्वरूपात कागदावर उतरवत असत. ज्युरासिक पार्क चित्रपटामध्ये डायनासॉर कसे दाखवायचे, त्याचे शॉट कसे चित्रित केले जाणार आहेत याबद्दल स्टीव्हन स्पीलबर्गबरोबर चर्चा करून तशी चित्रे डेव्हिड लॉरी यांनी काढली आणि त्यानंतर चित्रपटातील दृश्ये त्यानुसार उभी करण्यात आली.
इन्सेप्शन चित्रपटामध्ये स्वप्नातील दृश्यामध्ये जमिनीप्रमाणे भिंतीवर हाणामारी कशी दाखवण्यात यावी याबद्दल दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या कल्पनेनुसार गॅब्रियल हार्डमन यांनी चित्रे काढली.
ग्लॅडिएटर चित्रपटातील दिग्दर्शक रिडले स्कॉट यांच्या मनातील भव्य दृश्य कागदावर स्टोरी बोर्ड स्वरूपात काढल्यावरच तसा सेट लावला जातो आणि वाघाबरोबरचे दृश्य त्या कोनातून चित्रित केले जाते.
स्टोरी बोर्ड तयार झाल्यानंतर त्यानुसार सेट लावले जातात. स्टोरी बोर्ड अधिक तपशिलामध्ये काढले असतील तर त्याचा उपयोग सिनेमॅटोग्राफरला कॅमेरा अँगल ठरवण्यासाठी होत असतो.
चित्रपट तयार करणे किंवा चित्रपटातील कलाकार हाच चित्रपटांचा विषय असलेले लक बाय चान्स, हरिश्चंद्राची फॅक्टरी असे चित्रपट बघितल्यास सेट, प्रॉडक्शन डिझाईन यासंबंधी थोडीफार कल्पना करता येईल.
शिंडलर्स लिस्ट, अमेड्यूअस, टायटॅनिक, ह्यूगो, गांधी, क्लिओपात्रा, बेन हर, स्पार्टाकस, ऑन द वॉटरफ्रंट अशा अनेक चित्रपटांना प्रॉडक्शन डिझाईन विभागामध्ये ऑस्कर मिळाले आहे.
चाची ४२० चित्रपटामध्ये चित्रपटांकरिताच नृत्य दिग्दर्शन करणाऱ्या नायकाचे (कमल हसन) लग्न स्टुडिओमध्येच एका सेटवर होते. दोघे देवळात असतात, त्याचवेळी नायक म्हणतो, “आँखे बंद करके भगवान से आशीर्वाद मांग लो, साउंड इफेक्ट्स के साथ।” त्याचवेळी देवळाचा सेट आणि मूर्ती हलवली जाते.
नायिका (तब्बू) डोळे उघडते आणि म्हणते, “भगवान नही है।” नायक म्हणतो, “चूप नास्तिक, दूध पीने चले गये होंगे।” (संवाद लेखक – गुलजार) सेटवरून मूर्ती हलविणाऱ्यांना नायक विचारतो, “भगवान को कहां लेके जा रहे हो?” सेट लावणारे म्हणतात, “आज इसका शूटिंग है, सात नंबर में...”
चित्रपटातील पात्रांचे स्वभाव ज्याप्रमाणे त्यांच्या संवादातून ऐकू येतात त्याप्रमाणेच त्यांच्या वेशभूषेमधून त्यांचे स्वभाव दिसतात, तसेच त्यांचे एकमेकातील संबंध कसे आहेत हेसुद्धा दिसते.
चाची ४२० चित्रपटातील कोर्ट सीनमध्ये नायक आणि नायिका घटस्फोट घेत असले तरीही त्यांची मने जुळलेली आहेत हे दाखवण्यासाठी दोघांच्या वेशभूषेचा रंग पांढरा आहे. वेशभूषा कला दिग्दर्शनामधील एक महत्त्वाचे अंग आहे, त्याबद्दल पुढील लेखामध्ये.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.