(Historical tourist places, temples in Goa marathi article)
डॉ. पांडुरंग फळदेसाई
परमुलुखातून आलेल्या कोणाही व्यक्तीला गोव्यातला निसर्ग, समुद्रकिनारे, अंगावर येणारी गूढ शांतता अनुभवताना हिरव्या वनश्रीतून डोकावणारे मंदिरांचे घुमट, दीपस्तंभ आणि चर्चचे मनोरे खुणवतात. गोव्यातील मंदिरे आणि चर्च म्हणजे स्थापत्यकलेचा मनमोहक नमुना होय.
सप्तकोकणातील ‘गोमन्तक’ अथवा गोवा प्रदेश म्हणजे मंदिर संस्कृती जोपासलेली देवभूमी. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील निसर्गसंपन्न भूमी. पुरातन काळापासून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र म्हणून ख्याती असलेला हा प्रदेश. हिंदू, ख्रिस्ती आणि मुस्लिम ज्या भूमीत सदैव एकोप्याने राहतात, परस्परांच्या धार्मिक भावनांचा आदर करतात आणि त्याचबरोबर आपली परमेश्वरावरील दृढ श्रद्धा आणि पवित्र धार्मिक परंपरांचे भान मनीमानसी बाळगून स्वान्तसुखाची अनुभूती घेतात, अशी ही विलक्षण भूमी.
म्हणूनच प्राचीन काळापासून दर्यावर्दी व्यापारी आणि आध्यात्मिक विभूतींना या भूमीचे सदैव आकर्षण राहिले आहे. जागतिक स्तरावर आजही हे आकर्षण टिकून राहिलेले दिसते.
गोव्यातील मंदिरे दक्षिण भारतातील भव्य-दिव्य मंदिरांसारखी नसली, तरी त्यांची स्वतःची अशी एक खास स्थापत्यशैली आहे. गोव्यातील बहुतेक सर्व मंदिरांमध्ये संस्कृती आणि भक्तांची धार्मिक भावना यांचा सांगोपांग विचार केलेली खास स्थापत्यशैली आढळते.
ज्या दैवताचे मंदिर असेल त्या दैवतासाठी गर्भगृह आणि मूर्ती, त्याभोवती आतील प्रदक्षिणामार्ग, बाह्य प्रदक्षिणा मार्ग, तीर्थमंडप, चौक, सरवली, बायणो अथवा सोपा, सभामंडप, प्रसादखांब, तुळशी वृंदावन, दीपस्तंभ, तळी, अग्रशाळा, कोठी, रथाचे घर, प्राकार, प्राकारात दैवतांच्या घुमट्या अशी सर्वसामान्य रचना पाहायला मिळते. गोव्यातील काही मंदिरे भव्य तर काही छोटी, टुमदार आहेत.