किशोर पेटकर
सुवर्णपदके जिंकलेल्या क्रीडापटूंत महिला नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमीत अंतिल यांनी टोकियोनंतर पॅरिस पॅरालिंपिकमध्येही सोनेरी जिद्द प्रदर्शित केली.
पॅ रिस २०२४ ऑलिंपिकमध्ये भारतीयांनी कसोशीने प्रयत्न केले, परंतु पदकतक्यात सुवर्णपदक दिसले नाही. ही उणीव फ्रान्सच्या राजधानीतच झालेल्या पॅरालिंपिकमध्ये पॅरा अॅथलिट्सनी भरून काढली. भारतीय पॅरा अॅथलिट्सनी सोनेरी यशाला गवसणी घालताना देशवासीयांना जल्लोषाची संधी दिली.
पॅरालिंपिकच्या इतिहासात प्रथमच पदकतक्त्यातही भारताची कामगिरी संखात्मकदृष्ट्या सुधारली. देशातील दिव्यांग क्रीडापटूंच्या उपजत गुणवत्तेला धुमारे फुटत असून त्यांची जिगर स्पृहणीय आहे. पॅरालिंपिकमध्ये सहभागी प्रत्येक क्रीडापटूच्या वाटचालीस एक कारुण्याची किनार आहे.
आव्हाने झेलत, कष्ट उपसत त्यांनी नेटाने मार्गक्रमण केले, त्यामुळेच पॅरालिंपिक नगरीत भारताचे राष्ट्रगीत मोठ्या अभिमानाने वाजवले गेले आणि तिरंगा राष्ट्रध्वज डौलाने फडकताना दिसला. सुवर्णपदके जिंकलेल्या क्रीडापटूंत महिला नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमीत अंतिल यांनी टोकियोनंतर पॅरिस पॅरालिंपिकमध्येही सोनेरी जिद्द प्रदर्शित केली.