प्रशांत जयानंद मठकर
ग्रँड कॅनियन पार्कमध्ये प्रवेश करून आम्ही सदर्न रीम ट्रेल चालायला सुरुवात केली. दोन एक मिनिटं चालल्यावर ग्रँड कॅनियनचं नजरेच्या टप्प्यातही न मावणारं, ‘ग्रँड’ विशेषण अगदी सार्थ ठरवणारं विशाल रूप सामोरं आलं... अगदी अविश्वसनीय वाटणारं लँडस्केप... जणू कोलोरॅडो नदीची छिन्नी वापरून निसर्गानं कोरलेली ती अद्भुत शिल्पाकृतीच!
अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यातलं ग्रँड कॅनियन म्हणजे जगातल्या सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक. आजवर निसर्गाची ही अलौकिक कलाकृती कॅलेंडर्स, मासिक, यूट्यूब व्हिडीओमधून पाहिली होती.
माझ्या गेल्या वर्षीच्या अमेरिका वारीमध्ये याला सर्वात वरचं स्थान असलं, तरी माझ्या अमेरिकेतील वास्तव्याच्या तीनही ठिकाणांपासूनचं त्याचं अंतर आणि अॅरिझोना वाळवंटातल्या कडक उन्हाळ्याचा विचार करता तिथं जाण्याविषयी मनात थोडी साशंकता होतीच.