मिठाचे वाळवंट असणाऱ्या गुजरातमधील या जिल्ह्याची सफर..!

कोळ्यांसारखे कीटकसुद्धा वसाहत करून राहतात, ही नवीनच माहिती मिळाली
Gujrat, Kachh
Gujrat, KachhEsakal
Updated on

सुजाता लेले

यावेळेस वाळवंट बघायचे ठरवले होते, लिटल रण ऑफ कच्छ! तिथला निसर्ग काही वेगळाच असणार याची खात्री होती. प्रवासाची सुरुवात पुण्याहून मुंबईच्या दिशेने इनोव्हातून झाली. वाटेत लोणावळ्याला थांबायचेच असते; थांबलो नाही तर तो तिथल्या फूड मॉलचा अपमान ठरतो.

म्हणूनच आमच्या टीमने या मॉलचा मान राखला हे सांगायलाच नको. पुण्याहून विमानाच्या प्रवासाची वेळ जमत नव्हती, त्यादिवशी रेल्वेही नव्हती.

शेवटी मुंबईपासून रेल्वे प्रवास करायचा ठरले. मुंबईहून रेल्वे रात्री होती. पण आम्ही वेळेच्या खूप आधीच पोहोचलो, त्यामुळे रेस्ट रूममध्ये विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी अहमदाबादला पोहोचलो.

न्याहारी करून लगेच थोल वन्यजीव अभयारण्याकडे निघालो. थोल हा खरेतर एक तलाव आहे. अतिशय रम्य परिसर आहे. तिथे भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे पाणपक्षी खूप दिसले. भारतात तलाव, दलदलीच्या भागात हे पक्षी आढळतात.

इतर पक्षी न्याहाळत असताना लांबच्या झाडावर गरुड दिसला, खूप वेळ तो तिथेच होता. बहुधा जवळपास घरटे असावे, असा माझा अंदाज!

या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी थव्याने उडत होते. उडताना आवाज काढत होते. ते सुंदर दृश्य पाहून बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... या अजरामर गीताची आठवण नसती झाली तर मी स्वतःला माफ केले नसते. असो.

या परिसरात काळ्या तोंडाची वानरेपण खूप आहेत. एका झाडावर कापसाचा वापर करून तयार केलेली घरटी दिसली. ही घरटी कोणाची आहेत असे विचारल्यावर, ही घरटी नसून इथे असणाऱ्या जंगली कोळ्यांची वसाहत आहे, असे गाइडने सांगितले.

हे ऐकल्यावर आश्चर्य वाटले. कोळ्यांसारखे कीटकसुद्धा वसाहत करून राहतात, ही नवीनच माहिती मिळाली होती. निसर्गदेवतेने केवढा मोठा विचार करून सजीव-निर्जीव सृष्टी निर्माण केली आहे. निसर्गातील या विविधतेला दाद द्यावीशी वाटली. इतका रमणीय परिसर सोडावासा वाटत नव्हता.

खरेतर प्रवास करून दमणूक झाली होती, शिवाय इथेही चालतच होतो. पण स्वच्छ हवा, पक्ष्यांचे सुमधुर आवाज, वनातील शांतता ऐकत इथेच टाका तंबू... असे म्हणावेसे वाटत होते.

पण मुक्कामाचे ठिकाण लांब होते, त्यामुळे निघावेच लागले. तिथे साधारणपणे बाराच्या सुमारास पोहोचलो. जरा फ्रेश झालो, जेवलो आणि लगेचच तीनच्या सुमारास पुन्हा बाहेर पडलो.

Gujrat, Kachh
Womens Tour : मैत्रिणींनो, इथे फिरा,खा मज्जा करा, हे आहेत तुमच्यासाठी सर्वात सुरक्षीत देश!

त्या तीन दिवसांत अभयारण्यात सफारी जीपमधून खूप हिंडलो. त्यावेळी विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती बघितल्या. मी पक्षी अभ्यासक, निरीक्षक नाही, त्यामुळे ठरावीक पक्ष्यांचीच नावे लक्षात राहिली.

पण जेव्हा गाइडने इतर पक्ष्यांची नावे सांगितली (ती जवळपास शंभरएक नावे होती), ती लिहून घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आणखीही काही महत्त्वाचे पक्षी दिसण्याची वाट पाहत होतो.

आम्ही ज्या ठिकाणी पक्ष्यांना शोधत होतो, ते पाणी आहे असे आम्हाला वाटत होते... रणाच्या सभोवार पाणीच पाणी... पण ते होते चक्क मृगजळ! फसायला झाले.

तिथे सकाळी खूप थंडी होती, तर दुपारी थंडीचे प्रमाण कमी पण ऊन खूप होते. ते ऊन अंगावर झेलताना, उन्हाळ्यात या वाळवंटात काय होत असेल? हा विचार मनात येऊनही गेला. लिटल रण ऑफ कच्छला पांढरी वाळवंटे म्हणजे मिठाची वाळवंटे बघितली.

तिथे बाभळीची झाडे जास्ती प्रमाणात बघायला मिळाली. दोन्ही दिवशी सूर्यास्ताचे फोटो घ्यायचे म्हणून अल्टिमेट जागा शोधत होतो, पण दोन्ही वेळेला सूर्यास्ताबरोबर जंगली गाढवांचे फोटो मिळाले. मुक्कामी परत जात असताना एका संध्याकाळी कोल्हेबुवांचे दर्शन झाले. राहण्याचे ठिकाण तसे लांब होते.

त्यातून थंडीचे दिवस असल्यामुळे अंधारही लवकर पडत होता. पण त्यामुळेच आम्हाला रातवा (नाईटजार) बघायला मिळाला, फोटोही छान काढता आले. त्याआधी संध्याकाळी वाळलेल्या गवताच्या जमिनीवर तशाच रंगाचे पक्षी दिसले.

दुर्बिणीतूनसुद्धा पटकन कळत नव्हते, पण त्यांनी जेव्हा थोडीशी हालचाल केली तेव्हा ते तिथे आहेत हे लक्षात आले. ही आणि अशा अनेक प्रकारची निसर्गाची किमया बघून भान हरपते.

आज एवढे शोध लावूनसुद्धा माणूस अजूनही निसर्गाला जिंकू शकलेला नाही; मानव जगातील मानवी युद्धे जिंकू शकेल, पण निसर्गाच्या आव्हानाशी अजूनही त्याला बरोबरी करता आलेली नाही. म्हणूनच तर जगण्यातील आशा टिकून आहे. असा विचार करत असतानाच त्या दिवशीचा दिवस संपला होता.

वृक्षांच्या सान्निध्यात राहत होतो. झोपडीवजा मातीच्या छोट्या खोल्या होत्या. खोलीमध्ये गेलो की सहा-सात पाली, मधमाश्या स्वागत करायला हजर असत. पण थोड्यावेळाने त्या आपोआप कौलातून बाहेर जात असाव्यात.

शहरात असे किडे आपल्या घरी दिसले की मात्र त्यांना कधी एकदा हुसकावून लावतोय असे होते. पण इथे इतके दमलेलो असायचो की त्यांच्याकडे दुर्लक्षच होत होते. इथे एका झोपडीवजा खोलीच्या मागे दोन झाडांच्या खोडाच्या बेचक्यात खोडाच्याच रंगाची दोन घुबडे दिसली.

ती फक्त दुर्बिणीतूनच दिसत होती. आकार छोटा होता. पण अभयारण्यात मात्र सहा-सात घुबडे दिसली होती. त्यांचे आकारमान यांच्यापेक्षा मोठे होते आणि प्रजातीही वेगळी होती.

राहण्याच्या ठिकाणीसुद्धा दिवसा वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे सुमधुर आवाज ऐकू यायचे. तर रात्री रातकिड्यांचे, घुबडांचे, पाली चुकचुकल्याचे आवाज भरपूर होते. पण ते आवाज वाहनांच्या हॉर्नसारखे त्रासदायक नक्कीच नव्हते, तिथे गोंगाट नव्हता. हा सुखद अनुभव हवाहवासा वाटत होता.

Gujrat, Kachh
Malaysia Tour : मलेशियाच्या पेनांगमध्ये भारतीय पर्यटकांसाठी पायघड्या

निघण्याच्या दिवशी पहाटे चार वाजता उठण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण जाता जाता नल सरोवर पाहायचे होते. थंडी आमच्यासवे होतीच. नल सरोवराला जाताना एका शेतातील पायवाटेने आम्ही गेलो.

तिथे चार-पाच सारस पक्ष्यांचे दर्शन झाले. ते पक्षी दुसऱ्या ठिकाणी असलेल्या इतर जातभाईंना साद देत होते, बहुधा आम्ही (म्हणजे माणसे) आलेलो आहोत, अशी सावधगिरीची सूचनाही असू शकते. ते काहीही असो, पण सकाळच्या वातावरणात त्यांची साद श्रवणीय होती हे मात्र खरे!

नल सरोवरामध्ये लहान बोटीतून प्रवास करताना पक्षी दिसत होते, पण बोट त्यांच्या जवळ गेली की उडून जात होते. आम्ही अधूनमधून बोटीतून जमिनीवर उतरून थोडे दूर असलेले पक्षी न्याहाळत होतो.

फक्त कॅमेऱ्यातूनच फोटो काढता येत होते, मोबाईलमधून काढता येत नव्हते. परतीचा प्रवास होता, त्यामुळे कॅमेरा बॅगेत ठेवला होता. म्हणून आम्ही दुर्बिणीतूनच पक्षी बघून आनंद घेतला. बाराचे ऊन खूपच कडक जाणवत होते, पण पाण्याचा गारवाही जाणवत होता... थोडक्यात मिश्र हवामानाचा अनुभव घेत होतो.

वनात जाऊन नेहमीच विविध प्राणी-पक्ष्यांचा अनुभव घेत असते. यावेळी रण अनुभवत होतो. इथे जंगली गाढवे कमी प्रमाणात दिसली.

पण त्या वाळवंटात कातरवेळी एकदाच कोल्ह्याचे दर्शन झाले आणि परतीच्या प्रवासात एका शेतात सकाळी कोल्हा दिसला. बाकी पक्षी संमेलनच भरले होते. स्थलांतरित आणि देशी पक्षी बघितले. मन भरून पावले.

पण असेही मनात आले की एकदा फोटो घेतले, की नंतर पुन्हा पुन्हा त्यांचे हवे तसे फोटो मिळवण्यासाठी त्यांच्या मागेमागे जाऊ नये, कारण ते एका ठिकाणी थोडावेळ बसले असतील तर आपल्या येण्याने त्यांना उडून जावे लागते. त्यांच्या अधिवासात त्यांना शांतपणे बघावे, पण त्यांना डिस्टर्ब करू नये.

जंगलातील प्राण्यांच्या बाबतीतसुद्धा माझे हेच मत आहे. फोटो चांगला मिळावा या हौशीपोटी आमच्यासारख्या हौशी पर्यटकांनी त्यांच्या मागे जाऊ नये. हे मत फक्त हौशी पर्यटकांसाठीचे आहे, पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक यांच्यासाठी नक्कीच नाही.

ही मंडळी योग्य ती काळजी घेत असणारच, तरी कृपया गैरसमज नसावा! हे प्राणी-पक्षी त्यांच्या अधिवासात आपल्याला त्रास देत नाहीत.

पण काही वेळा त्यांना पाहण्यासाठी किंवा फोटो घेण्यासाठी हौशी पर्यटक गर्दी करतात, त्यामुळे विश्रांती घेत असलेल्या त्या मुक्या जिवांना तिथून उठून जाऊन दुसरीकडे जावे लागते. तिथेही हौशी पर्यटक भराभर सफारी जीपमधून जातात.

अशावेळी ह्या जीवांना त्रास होत असेल का, याचा विचार केला जातो का? केला जात नसेल तर याचा विचार जरूर करावा.

Gujrat, Kachh
National Tourism Day : पर्यटकांची पावले शहरात थांबणार कधी? धोरण ठरतेय ‘२० साल बाद!’

तितर, बार हेडेड गूज, चक्रवाक, रेड मुनिया, स्ट्रॉबेरी फिंच, इंडियन सिल्व्हर बील, कापशी, गप्पीदास, सारस, स्टॉलीक बुशचॅट, स्पॉट बील्ड डक, युरेशियन व्हिजन, नॉर्मन शॉवेलर, तलवार बदक, कॉमन टील, लिटल ग्रीब, पेंटेड स्टॉर्क, एशियन ओपन बील, वूली नेकेड स्टॉर्क, लेसर फ्लेमिंगो, आयबीस, पर्पल हेरॉन, कॅटल, व्हाइट पेलिकन, कापशी, ऑस्प्रे, वारकरी, सारस, जसाना, शेकाट्या, टिबुकली, सॅंडग्राऊज, स्टॉक्स आऊल, स्पॉटेड आऊटलेट हे आणि इतरही खूप पक्षी बघितले. यातील खूपशी नावे गाइडने सांगितली.

गुजरातमध्ये जाऊन गुजराथी थाळीचा आस्वाद घेतला नाही, तर तो त्या चविष्ट थाळीचा अपमान केल्यासारखे दिसले असते. ते चविष्ट भोजन झाल्यानंतर अडालज विहीर बघितली. तिथे खूपच सुंदर कोरीवकाम केले आहे.

इतके सुंदर बांधकाम आणि नक्षीकाम केलेल्या कारागिरांना शतशः प्रणाम! सहलीची सुरुवात निसर्गातील पक्ष्यांच्या पाणवठ्यांपासून झाली, तर शेवट माणसांनी केलेल्या अपार कष्टांना आणि स्थापत्यशास्त्रज्ञांना दाद देत पार पडली.

--------------------

Gujrat, Kachh
Vibrant Gujrat: "गुजराती उद्योजकांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करावी"; शहांची 'व्हायब्रंट गुजरात'मध्ये थेट ऑफर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()