वैष्णवी वैद्य-मराठे
दिवाळीत, थंडीच्या दिवसांत भुकेचं प्रमाण वाढलेलं असतं. अशावेळी तळलेले पदार्थ थोडेसे खाऊनही ऊर्जा मिळू शकते. फराळाच्या पदार्थांत असणारं ऊर्जेचं प्रमाण लक्षात घेता दिवसभराचा आहार त्यानुसार करणं आवश्यक आहे. हेच फराळाचे पदार्थ उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात खाल्ले जात असतील, तर आहारातला ऊर्जेचा समतोल बिघडू शकतो.
फराळ या शब्दाला संस्कृतीचा, समृद्ध परंपरेचा, अनेक पिढ्यांचा इतिहास आहे. या शब्दाशी अनेकविध भावना जोडलेल्या आहेत. प्रांतागणिक ते पदार्थ बदलत जातात, पण कुठेही गेलात तरी फराळाशिवाय दिवाळी साजरी होऊच शकत नाही. दिवाळी आणि फराळाचा अभ्यास करायचा म्हटलं, तर तो आपल्याला पुराणकाळाच्याही मागे घेऊन जाईल. उपनिषदकाळापासून वेगवेगळ्या रूपांत आणि नावांनी फराळाचा उल्लेख केलेला आढळतो.