Menopause Hormone Therapy : रजोनिवृत्तीमध्ये हार्मोन थेरपी कितपत योग्य?

रजोनिवृत्तीच्या सर्वसामान्य लक्षणांवर उपचार करण्यासाठी ही हार्मोन थेरपी वापरली जाते.
menopause
menopauseesakal
Updated on

हार्मोन थेरपी सर्वथा चांगली नाही किंवा पूर्णपणे वाईटही नाही. हार्मोन थेरपी घ्यावी की नाही हे ठरवण्यासाठी वैयक्तिक लक्षणे आणि आरोग्यातील धोक्यांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

रजोनिवृत्तीच्या संपूर्ण काळात उद्‍भवणाऱ्या त्रासांसाठी डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घेणे आवश्यक असते.

डॉ. अविनाश भोंडवे

एकेकाळी रजोनिवृत्तीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी आणि स्त्रियांच्या आरोग्याचे दीर्घकाळ संरक्षण करण्यासाठी हार्मोन थेरपी नियमितपणे वापरली जात होती.

नंतर काही विस्तृत क्लिनिकल चाचण्यांमध्ये हार्मोन थेरपीतून निर्माण होणारे आरोग्य विषयक धोके दिसून आल्याने हार्मोन थेरपीचा वापर कमी झाला. मात्र आजकाल रजोनिवृत्त स्त्रियांसाठी हार्मोन थेरपी वापरली जाते.

त्यामुळे प्रत्येक स्त्रीला या उपचारांचे फायदे आणि तोटे माहिती असणे गरजेचे ठरते.

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही स्त्रियांचे विशेष हार्मोन असणारी औषधे असतात. रजोनिवृत्ती दरम्यान शरीरात इस्ट्रोजेनची निर्मिती होणे बंद होते. त्या नैसर्गिक इस्ट्रोजेनऐवजी कृत्रिमरित्या बनवले गेलेले इस्ट्रोजेन रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रियांना दिले जाते.

कानशिलांवर गरम झळा येणे (हॉट फ्लॅशेस) आणि योनीमार्गात अस्वस्थता वाटणे अशा रजोनिवृत्तीच्या सर्वसामान्य लक्षणांवर उपचार करण्यासाठी ही हार्मोन थेरपी वापरली जाते.

रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांची हाडे ठिसूळ बनत जातात आणि साध्या आघातानेसुद्धा त्यांना फ्रॅक्चर होऊ शकते. हाडांच्या बाबतीतला हा त्रास कमी करण्यासाठीदेखील थेरपीची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. परंतु, हार्मोन थेरपीमुळे स्त्रियांच्या आरोग्यात काही जोखीम उद्‍भवू शकते.

ही जोखीम हार्मोन थेरपीचा प्रकार, त्याचे डोस, ते औषध किती वेळा आणि किती काळ घ्यावे लागते यावर आणि थेरपी घेणाऱ्या स्त्रीच्या वैयक्तिक आरोग्यामधील इतर जोखमींवर अवलंबून असते. त्यामुळे सर्व स्त्रियांना एकाच पद्धतीची हार्मोन थेरपी वापरून चालत नाही.

आणि त्या उपचाराचे फायदे जोखमीपेक्षा जास्त आहेत याची खात्री करून घेण्यासाठी प्रत्येक वेळी त्या थेरपीचे पुनर्मूल्यांकन केले पाहिजे.

menopause
Menopause Mood : रजोनिवृत्तीमुळे येणारा चिडचिडेपणा कसा दूर कराल ?

हार्मोन थेरपीचे मूलभूत प्रकार

रजोनिवृत्तीनंतर शरीरात निर्माण होणाऱ्या इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी खूप कमी होते, ती कृत्रिमरित्या बनवलेल्या इस्ट्रोजेन औषधाने पुनर्स्थित केली जाते. इस्ट्रोजेन थेरपीचे दोन मुख्य प्रकार असतात-

सिस्टेमिक हार्मोन थेरपी ः यामध्ये गोळ्या, त्वचेवर लावण्याचे पॅच, रिंग, जेल, क्रीम किंवा स्प्रे स्वरूपात इस्ट्रोजेन हार्मोन वापरले जाते. यामध्ये इस्ट्रोजेनचा उच्च डोस असतो, आणि तो संपूर्ण शरीरात शोषला जातो. रजोनिवृत्तीदरम्यान उद्‍भवणाऱ्या कोणत्याही सामान्य लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरता येते.

लोडोस व्हजायनल प्रॉडक्ट ः यामध्ये इस्ट्रोजेन कमी प्रमाणात असलेले उपचार योनीमार्गाद्वारे दिले जातात. ही औषधे क्रीम, गोळ्या किंवा रिंग स्वरूपात असतात. यामध्ये शरीरात इस्ट्रोजेन कमी प्रमाणात शोषले जाते. त्यामुळे ही कमी मात्रेची औषधे, रजोनिवृत्ती नंतर उद्‍भवणाऱ्या योनी आणि लघवीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात.

रजोनिवृत्त स्त्रीचे गर्भाशय काढले नसल्यास, इस्ट्रोजेन देताना ते प्रोजेस्टेरॉन किंवा प्रोजेस्टिनसोबत दिले जाते. कारण प्रोजेस्टेरॉन न देता केवळ इस्ट्रोजेन दिल्यास गर्भाशयाच्या अस्तरांची वाढ होत राहते आणि त्यातून एंडोमेट्रियल कर्करोगाचा धोका वाढतो.

जर स्त्रीचे गर्भाशय काढलेले असेल (हिस्टेरेक्टमी झाली असेल) तर प्रोजेस्टिन घेण्याची गरज नसते.

menopause
Early Menopause : कमी वयात मासिक पाळी बंद का होते ? काय आहेत कारणे आणि परिणाम ?

हार्मोन थेरपीमधील धोके

आजवर झालेल्या सर्वात मोठ्या क्लिनिकल ट्रायलमध्ये, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी एस्ट्रोजेन-प्रोजेस्टिन एकत्र असलेल्या गोळ्या देऊन केली गेली. यात काही गंभीर आजारांचा धोका वाढतो, असे सिद्ध झाले. यात-

असे गंभीर आजार समाविष्ट आहेत.

या क्लिनिकल ट्रायलनंतर झालेल्या संशोधनांमध्ये हे धोके खालील गोष्टींवर अवलंबून असतात असे स्पष्ट झाले -

वय ः ज्या स्त्रिया ६० वर्षे वयानंतर किंवा रजोनिवृत्ती सुरू झाल्यापासून १० वर्षांनंतर हार्मोन थेरपी सुरू करतात त्यांना वरील आजारांचा धोका जास्त असतो. परंतु जर हार्मोन थेरपी वयाच्या ६० वर्षापूर्वी किंवा रजोनिवृत्तीनंतर दहा वर्षांच्या आत सुरू केली, तर तिच्यामुळे उद्‍भवणाऱ्या धोक्यांपेक्षा होणारे फायदे जास्त असतात.

हार्मोन थेरपीचा प्रकार ः हार्मोन थेरपी केवळ इस्ट्रोजेनच वापरून दिली, की प्रोजेस्टिनसोबत दिली? इस्ट्रोजेनचे डोस काय दिले होते? इस्ट्रोजेन देण्याचा कोणता प्रकार वापरला? यावर हार्मोन थेरपीमुळे होणारे आजार अवलंबून असतात.

आरोग्य इतिहास ः इस्ट्रोजेन घेणाऱ्या स्त्रीचा वैयक्तिक वैद्यकीय इतिहास आणि कौटुंबिक आरोग्य इतिहास यावरून आणि तिला कर्करोग, हृदयरोग, स्ट्रोक, रक्ताच्या गुठळ्या, यकृत रोग, ऑस्टिओपोरोसिस असे आजार होण्याचा धोका कितपत आहे याचा सारासार विचार करून हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी तिच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवले जाते.

हार्मोन थेरपीचा फायदा कोणाला होऊ शकतो?

रजोनिवृत्त झालेली स्त्री जर पूर्ण निरोगी असेल, तर खालील लक्षणांचे नियंत्रण होऊ शकते-

मध्यम ते तीव्र हॉट फ्लशेस ः रजोनिवृत्तीमध्ये उद्‍भवणाऱ्या गरम झळा, कानशिले तप्त होणे, रात्रीचा खूप घाम येणे अशा लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी सिस्टेमिक इस्ट्रोजेन थेरपी ही सर्वात प्रभावी उपचार ठरते.

रजोनिवृत्तीची इतर लक्षणे ः योनीमार्गात शुष्कपणा जाणवणे, खाज सुटणे, जळजळ होणे आणि शरीरसंबंधात अस्वस्थ वाटणे अशी रजोनिवृत्तीदरम्यान स्त्रियांमध्ये उद्‍भवणारी त्रासदायक लक्षणे कमी होऊ शकतात.

हाडांचे नुकसान किंवा फ्रॅक्चर टाळण्यासाठी आवश्यक आहे. ऑस्टियोपोरोसिस या हाडे ठिसूळ होण्याच्या विकारापासून संरक्षण करण्यास सिस्टेमिक इस्ट्रोजेन थेरपी उपयुक्त ठरते.

ऑस्टियोपोरोसिसवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी बिस्फोस्फोनेट्स नावाची औषधे रुग्णाला सहन होत नसल्यास किंवा इतर तत्सम हार्मोनल उपचार घेत नसल्यास इस्ट्रोजेन थेरपीचा उपयोग होतो.

अकाली रजोनिवृत्ती ः स्त्रीच्या वयाच्या ४५व्या वर्षापूर्वी शस्त्रक्रियेने अंडाशय (ओव्हरी) काढून टाकले असल्यास, किंवा वयाच्या ४५ वर्षांआधीच मासिक पाळी अकाली थांबली असेल किंवा वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी अंडाशय निकामी झाले असल्यास (प्रायमरी ओव्हरियन इनसफिशियन्सी), त्या स्त्रीच्या शरीरामध्ये आधीपासूनच इस्ट्रोजेन कमी असते त्यामुळे वेगवेगळे संसर्ग होतात; तसेच ऑस्टिओपोरोसिस, हृदयरोग, स्ट्रोक, स्मृतिभ्रंश आणि मूडस्विंग्जसारख्या काही विकारांचा धोका कमी करण्यासाठी इस्ट्रोजेन थेरपीची मदत होऊ शकते.

menopause
Post Menopause Care : रजोनिवृत्तीनंतर होणारी हाडांची झिज कशी भरून काढाल ?

हार्मोन थेरपी घेणाऱ्या स्त्रियांनी घेण्याची काळजी

सर्वोत्तम उत्पादन आणि वितरण पद्धत शोधा ः तोंडावाटे घेण्याच्या इस्ट्रोजेनच्या गोळ्या, त्वचेवर लावण्याचे पॅच त्याचप्रमाणे योनीमार्गात वापरण्यासाठी असलेले जेल, व्हजायनल क्रीम, स्लो-रिलीझिंग सपोझिटरी किंवा रिंग अशापैकी एखाद्या स्वरूपात हार्मोन थेरपी घेता येऊ शकते.

जर रजोनिवृत्तीशी संबंधित फक्त योनीमार्गाची लक्षणे जाणवत असतील, तर कमी डोसच्या व्हजायनल क्रीम टॅब्लेट किंवा रिंगमधील इस्ट्रोजेन हे उपचार तोंडावाटे घ्यायच्या गोळ्यांपेक्षा किंवा त्वचेच्या पॅचपेक्षा अधिक चांगली निवड ठरते.

औषधांचे प्रमाण कमी करा ः दिसत असलेल्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या, कमीत कमी वेळेसाठी, कमी प्रमाणात असलेला सर्वात प्रभावी डोस वापरा. वय ४५ वर्षांपेक्षा कमी असल्यास, इस्ट्रोजेनच्या कमतरतेच्या दीर्घकालीन आरोग्यावरील परिणामांपासून संरक्षण देण्यासाठी पुरेसे इस्ट्रोजेन आवश्यक असते.

रजोनिवृत्तीची लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास स्त्रियांच्या जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या खराब होऊ शकते, त्यासाठी दीर्घकालीन उपचार घ्यावेत.

नियमित फॉलोअप ः हार्मोन थेरपीचे फायदे जोखमींपेक्षा जास्त आहेत याची खात्री करण्यासाठी, तसेच स्तनांच्या कर्करोगाचे स्क्रीनिंग करणाऱ्या मॅमोग्रामसाठी आणि पेल्विक तपासणीसारख्या चाचण्यांसाठी नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्या.

निरोगी जीवनशैली ः दैनंदिन दिनचर्येमध्ये शारीरिक हालचाली आणि व्यायामाचा समावेश करा. समतोल आहार घ्या, शरीराचे वजन योग्य ठेवा, धूम्रपान करू नका, मर्यादित मद्यसेवन करा, ताणतणावांचे नियोजन करा, उच्च कोलेस्टेरॉल पातळी किंवा उच्च रक्तदाब अशांसारखे दीर्घकालीन आजार नियंत्रणात राखा.

हिस्टरेक्टॉमी न झालेल्या स्त्रिया जर सिस्टीमिक इस्ट्रोजेन थेरपी घेऊ इच्छित असतील, तर त्यांना प्रोजेस्टिनचीदेखील आवश्यकता असते. यासाठी कमीत कमी जोखीम व खर्च असणारी आणि जास्तीत जास्त फायदे व सुविधा असतील अशी हार्मोन थेरपी घेण्याची पद्धत शोधावी.

menopause
Male menopause : महिलांची रजोनिवृत्ती आणि पुरुषांचा एंड्रोपॉज यांतील फरक काय ?

हार्मोन थेरपी घेऊ न शकणाऱ्यांसाठी

मेनोपॉजल हॉट फ्लॅशेसचे नियंत्रण, निरोगी जीवनशैलीचे आचरण करून व्यवस्थित पध्दतीने नियंत्रित करता येतात.

यात घरातील वातावरण थंड ठेवणे, कॅफिनयुक्त पेये आणि मद्यप्राशन मर्यादित करणे, रिलॅक्स होऊन आरामशीर श्वास घेणे, इतर विश्रांती तंत्रांचा सराव करणे असे बाह्य उपचार असतात. अनेक नॉन-हार्मोन प्रिस्क्रिप्शन औषधेदेखील हॉट फ्लशेसपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात.

योनीमार्गात जाणवणारा शुष्कपणा, वेदनादायक संभोग अशा समस्यांसाठी, योनीमार्गातील मॉइश्चरायझर किंवा ल्युब्रीकंट आराम देऊ शकतात. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑस्पीमिफेन हे वेदनादायक संभोगाबाबत असलेले औषध घेऊ शकता.

हार्मोन थेरपी सर्वथा चांगली नाही किंवा पूर्णपणे वाईटही नाही. हार्मोन थेरपी घ्यावी की नाही हे ठरवण्यासाठी वैयक्तिक लक्षणे आणि आरोग्यातील धोक्यांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रजोनिवृत्तीच्या संपूर्ण काळात उद्‍भवणाऱ्या त्रासांसाठी डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घेणे आवश्यक असते.

हार्मोनथेरपी आणि इतर रजोनिवृत्ती उपचारांबद्दल आणखी संशोधने होत आहेत. नवे उपचार किंवा जुन्या उपचारांचे नवे संदर्भ सिद्ध झाल्यास, आज दिलेल्या शिफारशी डॉक्टर बदलूही शकतात.

त्रासदायक रजोनिवृत्तीची लक्षणे कायम राहिल्यास, नियमितपणे उपचारातील पर्यायांचे पुनरावलोकन करणे गरजेचे असते.

--------------------

menopause
Menopause Care : रजोनिवृत्तीचा काळ सोपा करण्यासाठी रुजुता दिवेकरच्या टीप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()