डॉ. आशुतोष जावडेकर
सुरुवातीला थोडासा विनोदाचा अभ्यास करायला लागला तरी चालेल; पण एकदा का इंग्रजी विनोद तुम्हाला आकळला, की तो वाचताना जणू तुम्ही स्वतः दुसरी व्यक्ती होता! विनोदाची अगदी वेगळी बाजू आपल्या नकळत लक्षात येते. अखेर प्रत्येक भाषा प्रत्येक संकेताला आपलं एक स्वतःचं स्वरूप प्राप्त करून देत असते. विनोद हा त्याला अपवाद नाही.
विलायती वाचताना सदराच्या मागच्या लेखात (भारतीय इंग्रजी लेखिका, ता. २१ सप्टेंबर) आपण एकंदर इंग्रजी साहित्यामधील विनोद आणि भारतीय इंग्रजी लेखिकांचे विनोदी षटकार बघितले होते. पण साहित्यामध्ये जेव्हा आपण अस्सल ब्रिटिश विनोद पहिल्यांदा वाचायला जातो, तेव्हा क्षणभर गांगरायला होतं.
माझी स्वतःची आठवण सांगतो. मी अगदी इंग्रजी वाचन ताजं सुरू केलं होतं. पु.ल. देशपांडे यांचा इंग्रजीतील प्रख्यात विनोदी लेखक पी.जी. वूडहाऊस याच्यावरचा बेहतरीन लेख मी नुकताच वाचला होता. ते दिवस गुगलचे नव्हते.
अर्थात पु.ल. देशपांडे यांनी ज्या मार्मिकपणे वूडहाऊस समजावून सांगितला तसा गुगल आजही समजावून सांगत नाही! तर तो लेख वाचून मी उत्साहात ब्रिटिश लायब्ररीमधून साहेबांचं पुस्तक आणलं. तत्कालीन उच्चभ्रू ब्रिटिश समाजातील तो उमदा, पण काहीसा वेंधळा युवक बर्टी वूस्टर आणि त्याचा अत्यंत कार्यतत्पर आणि विनम्रतेच्या आवरणाखाली चलाखी झाकणारा तो जीव्ह्ज नावाचा साहाय्यक!
मी पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पुष्कळ वेळ झाला तरी मला हसूच आलं नाही. मग वाटलं की प्रकरणाच्या शेवटी बराच विनोद असेल. पण अनेक प्रकरणं संपली तरी आपण विनोदी साहित्य वाचत आहोत अशी खात्री वाटेना! काही विनोद कळले, बरेचसे डोक्यावरून गेले आहेत हेही लक्षात आलं! पण तेव्हा जे कळलं नाही ते आता स्वच्छ कळतं.