Stress Management: कुणी ताण देता का ताण?

तुम्हीही विनाकारण काळजी करत बसता का?
Stress management
Stress managementsakal
Updated on

वेगवेगळ्या फ्रंटवर लढावे लागते प्रत्येकाला. जो तो वेगवेगळ्या दिशांनी ओढल्या जाणाऱ्या दोरांनी बंदिस्त... त्यातून सुटण्याची केविलवाणी धडपड! अशी एकूण परिस्थिती!!

डॉ. विजय पांढरीपांडे

नटसम्राट नाटकात घर देता का घर असे एक स्वगत आहे. त्या तालावर आजच्या पिढीसाठी ताण देता का ताण असे स्वगत असेल! कारण अवतीभवती आज प्रत्येकजण तणावात दिसतो.

काही ताण नैसर्गिक, काही दैविक तर काही निमंत्रित अशी वास्तविक परिस्थिती असते. अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. नियंत्रणात नसतात.

पण वास्तव हे, की अनेकांना ताण ओढवून घ्यायची सवय असते. म्हणजे विनाकारण काळजी करण्याची हौस असते. हे जरा विचित्र वाटेल. पण ते खरे आहे.

ताण कुठे नसतात? कुटुंबात असतात. नवराबायकोच्या संसारात असतात. मग मुलं झाली की त्यांच्या भविष्याची, करिअरची चिंता! खरेतर तुम्ही चिंता केल्याने परिस्थिती फारशी बदलत नाही. त्यात सुधारणा होत नाही.

पण हे माहिती असूनही आपण मनाला घोर लावून काळजी करीत बसतो. कामाच्या ठिकाणचे ताण वेगळे. त्याला ‘वर्क प्रेशर’ असे एक गोंडस नाव आहे. आजकाल प्रत्येकाला दिलेले टार्गेट ठरल्या वेळेत पूर्ण करायचे असते.

कामाच्या ठिकाणी वैयक्तिक जबाबदारी तर असतेच, शिवाय सामूहिक जबाबदारीदेखील असते. तिथे सगळे एकमेकांवर अवलंबून असतात.

आपण जे करू त्यावर दुसऱ्याचे काम अवलंबून असते. आपणदेखील कुणावर तरी अवलंबून असतो. टीम स्पिरीट नावाचा प्रकार असतो. त्यात एकाची चूक, एकाचा निष्काळजीपणा दुसऱ्याला भोवतो. त्यातून संघर्ष निर्माण होतात.

तिथे बॉस असतो. ज्येष्ठकनिष्ठ अशा पातळ्या असतात. त्यातले ताणतणाव वेगळेच... लिंगभेद, जाती भेद आहेतच. एकमेकांना समजून घेणे, सांभाळून घेणे फार कमी... द्वेष, तिरस्कार, स्पर्धा, स्वार्थ याचेच प्रमाण जास्त. समजूतदारपणा नसेल तर त्रास होणारच. ताण वाढणारच.

Stress management
Stress Management : ताण-तणावाचे करा व्यवस्थापन; मानसिक विकारांपासून होईल रक्षण

लहान मुले, वयात येणारी; आलेली मुले यांच्या पालकांसाठीच्या समस्या आजकाल वेगळ्याच. एकतर अवतीभवतीच्या स्पर्धेचे प्रेशर... सोशल मीडिया, नवे तंत्रज्ञान, इथून आलेला नको त्या माहितीचा महापूर; हे सगळे आहेच.

ते टाळता येणे अशक्य... आपण किती, कुठे लक्ष ठेवणार मुलांवर? चोवीस तास पहारा लावून बसणार थोडेच? शिवाय नव्या पिढीला मोठ्यांच्या शिस्तीचा जाच नको असतो. आईवडिलांचे सारखे बोलणे, रागावणे म्हणजे त्यांना कटकट वाटते.

त्यांना त्यांचे स्वातंत्र्य हवे आहे. आम्ही आमचे निर्णय घ्यायला समर्थ आहोत, ही त्यांची भूमिका आहे. त्यांना सकाळसंध्याकाळ उपदेशाचे डोस नको आहेत पालकांकडून. त्यांना त्यांचे निर्णय घ्यायचे आहेत. त्यांच्याकडे तेव्हढी हुषारी आहे अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्यावर घरच्यांपेक्षा बाहेरचा प्रभाव जास्त आहे.

आता बहुतेक घरांत नवराबायको दोघेही कमावते आहेत. आधी कामाची निश्चित विभागणी होती. आता घरचे अन बाहेरचे दोन्ही सांभाळायचे म्हणजे गृहिणीवर ताण पडणारच. अनेक पुरुष हल्ली घरातही हातभार लावत असतात. शेअरिंग केअरिंग मिळून करतात

. पण कुठे न कुठे मतभेद होतातच. ठिणगी पडते. भडका उडतो. संघर्ष वाढतो. प्रत्येकाचा इगो आड येतो. इथेही तडजोडीची तयारी नाही. मेरे मुर्गी की एकही टांग अशी हेकेखोर वृत्ती आहे. मुलं आणि आईवडील एकत्र राहत असतील तर मग परिस्थिती काहीवेळा आणखी गंभीर होते.

वृद्ध मंडळींना सांभाळणे हे कर्तव्य न राहता काहींसाठी ते एक नकोसे ओझे झाले आहे. ज्यांची मुलं कामानिमित्त परदेशी गेली, तिकडेच स्थिरावली त्यांच्या समस्या, त्यांचे ताणतणाव वेगळेच. काही घरांत तुम्ही तिकडे गेलात तरी टेन्शन, ते इकडे आले तरी टेन्शन.

उरते ते नात्यात नैसर्गिक मोकळेपणा राहिला नाही, हे कटू सत्य. राहातो तो नाटकी उपचार. कसेतरी निभावून नेण्याचा कोरडा उपचार! आणखी काही ठिकाणी मुलीवर तिच्या माहेरचा प्रभाव. मुलावर घरच्या थोरामोठ्यांचे दडपण.

शिवाय नोकरीचे, कामाचे टेन्शन, तिथल्या डेडलाईनचे, टार्गेट पूर्ण करण्याचे टेन्शन वेगळेच... वेगवेगळ्या फ्रंटवर लढावे लागते प्रत्येकाला. जो तो वेगवेगळ्या दिशांनी ओढल्या जाणाऱ्या दोरांनी बंदिस्त... त्यातून सुटण्याची केविलवाणी धडपड! अशी एकूण परिस्थिती!!

Stress management
Stress Relieving Plants: ही रोपं घरी लावा अन् आजारपण,तणाव टाळा! वाढेल सकारात्मक उर्जा

आपण शरीराला काही झाले तर पटकन डॉक्टरकडे जातो, ट्रीटमेंट घेतो. पण मनाचे ताणतणाव आतल्या आत सहन करतो. त्यासाठी उपचार, समुपदेशन घेण्याची आपल्याला गरजच वाटत नाही. मग हे मनाचे आजार कळत-नकळत वाढतच जातात.

अशी वेळ येते, की सारे सहनशक्तीच्यापलीकडे जाते. एकतर समस्या आहे हेच बऱ्याचदा आपल्याला मान्य नसते. कबूल करायची तयारी नसते. मग समस्या सोडविणे राहिले दूर! पालक-पाल्य, नवरा-बायको यांच्या समस्या सोडविण्यासाठी तज्ज्ञ आहेत, मानस शास्त्रज्ञ आहेत.

पण अशा एक्स्पर्टची मदत घेण्याची गरजच वाटत नाही बऱ्याचजणांना. एकतर मीच बरोबर हा अहंकार. तडजोड करायची तर ती दुसऱ्याने हा हट्ट. सारखे तू तू मैं मैं चाललेले... यात घरी वाढती मुलं असतील तर त्यांच्यासमोरच भांडणे, एकमेकावर ओरडणे... कसले संस्कार नी कसले काय.

ना पोटच्या पोरांची चिंता ना नातेवाईक, समाज यांची काळजी. फक्त स्वार्थी, आत्मकेंद्रित विचार. समस्या सोडविण्यात रस नाही. जखम चिघळत ठेवण्यात आनंद! शिवाय वर दुःखाचे प्रदर्शन... आपल्यावरच केवढे आकाश कोसळले याचा ढिंडोरा पिटण्यातच आनंद! फुकटची सहानुभूती मिळविण्याची केविलवाणी धडपड!

नवरा-बायकोमधले हे संघर्ष मग कधीकधी थेट घटस्फोटापर्यंत विकोपाला जातात. कुणीही तडजोड करायला, समजून घ्यायला तयार नाही. आईवडील एकतर आगीत तेल घालणार किंवा हात झटकून स्वस्थ बसणार! समाजालादेखील कसले काही देणेघेणे नाही. सगळे आपापल्या छोट्याशा त्रिज्येच्या वर्तुळात व्यग्र!

Stress management
Children Mental Health : मुलांनाही असतो Stress अन् Tension;  असे बनवा त्यांना मानसिकदृष्ट्या Strong

ताण फक्त घरातच नाहीत. आजूबाजूलाही आहेत. देशादेशांमधले सत्तासंघर्ष टोकाला पोहोचलेत. भीषण युद्धापर्यंत... इथे माणुसकीला काळिमा फासणारी कृत्ये, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या घटना रोज कानावर येतात. हे संघर्ष आजचे नाहीत.

वर्षानुवर्षे हेच चालले आहे. ते थांबावेत, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे साधे शहाणपण कुणालाच कसे मान्य होत नाही? याचेच आश्चर्य वाटते. पहिले पाऊल कुणी मागे घ्यायचे यातच जो तो फसलेला!

माघार म्हणजे अपयश, दुबळेपणा अशी समजूत झालीय. इथेही आडवा येतो ज्याचा-त्याचा अहंकार! इथेही ताण वाढविण्यातच रस. ताण कमी करण्यासाठी पुढाकार कुणीच घेताना दिसत नाही.

अशावेळी प्रश्न पडतो. आपले वेद, पुराणे, आपली संस्कारसंपदा कुठे लुप्त झालीय? आपल्याकडे बुवा, महाराज, स्वामी, संतमहंत यांची कधीच वानवा नव्हती... अजूनही नाही. मौलिक ग्रंथसंपदा आहे. गीता, महाभारत, रामायण, वेद, उपनिषदे सारे आहे.

पण ते वाचायला, बघायला, अभ्यासायला कुणाला वेळ नाही. ढोंगी मंडळींचा बाजार मात्र वाढला आहे. चांगले उपाय असले तरी अमलात आणायचे नाहीत.

आम्हाला ताण प्रिय आहेत. आम्हाला आपले दुःख गोंजारण्यातच रस आहे, आजारग्रस्त म्हणूनच जगायचे आहे.

म्हणूनच कदाचित जो तो ओरडतो आहे, “कुणी ताण देता का ताण?”

-----------------

Stress management
Stress : तरुणाईने शोधलंय मानसिक ताणावरील उत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()