महेश भागवत
अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याला सरकारी नोकरीचे, वर्दीचे आकर्षण आहे. हे आकर्षण आणखीनच वाढण्यास कित्येक सिनेमे, वेबसिरीज, प्रेरणादायी भाषणांचा हातभार लागला आहे. प्रशासनात करिअर करावे हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न उराशी घेऊन कित्येकजण पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन तयारी करतात. प्रशासकीय सेवा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय असते.
प्रशासकीय सेवा हे समाजापर्यंत पोहोचण्यासाठीचे, त्यांच्या जीवनमानात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठीचे, आणि एकप्रकारे देशसेवेसाठीचे एक उत्तम माध्यम निश्चितच आहे; मात्र हे अग्निदिव्य पार करण्यासाठी बऱ्याच गोष्टी जुळूनदेखील याव्या लागतात. प्रशासकीय करिअर म्हणजे काय, प्रशासनात करिअर कसे करावे, त्यासाठी येणाऱ्या विविध आव्हानांचा सामना कसा करावा, अपयश जरी आले तरी त्यातून मार्ग कसा काढावा, यांसारख्या विविध गोष्टींचा हा एक आढावा...