सदानंद मोरे सजीवांच्या अन्य प्रजाती, जाती आणि होमो सेपियन्समधील महत्त्वाचा फरक म्हणजे प्रकृती ही इतर प्राण्यांच्या उत्क्रांतीची मर्यादा ठरली. मानवाने मात्र प्रकृतीच्या पायावर संस्कृतीची इमारत उभी केली..पारंपरिक पद्धतीनुसार विचार केला तर व्याख्या (किंवा लक्षण) करताना ज्यास ‘व्यवच्छेदक’ म्हटले जाते अशा गुणधर्माच्या संदर्भाने केली जायची. ‘Differentiating Character’- व्यवच्छेदक लक्षण असा शब्दप्रयोग तत्त्वज्ञानात व तर्कशास्त्रात रूढ आहे. म्हणजे वस्तूतील असा गुणधर्म, की ज्याच्यामुळे त्या वस्तूला इतरांपेक्षा वेगळी म्हणून ओळखता येते; बाजूला काढता येते. तो त्या वस्तूचा अंगभूत गुण असतो. तो नसता किंवा त्याला बाजूला काढले तर त्या वस्तूची ‘ती वस्तू’ अशी ओळखच संपुष्टात येईल. उदाहरणार्थ, चंदनाच्या लाकडाचा सुवास. चंदनाला असा सुवास येणार नसेल तर त्याला कोणी चंदन म्हणेल काय? बौद्ध परंपरेतून आणखी एक शब्द मिळतो तो म्हणजे ‘स्वलक्षण’. अर्थ स्पष्ट आहे. केवळ त्या आणि त्या वस्तूमधीलच गुण, की ज्याच्यामुळे त्या वस्तूला तीच ती, दुसरी नव्हे असे म्हणता येईल.याचा अर्थ असा होतो, की वस्तूमध्ये एकच एक गुण नसतो. ती एक प्रकारचा गुणसमुच्चयच असते म्हणा ना. या गुणांपैकी काही गुण इतर वस्तूंमध्येही आढळतात. त्यामुळे त्यांना त्या वस्तूचे व्यवच्छेदक लक्षण, स्वलक्षण असे म्हणता येणार नाही. ज्याला असे म्हणता येईल असा गुणधर्म हा फक्त त्याच वस्तूत आढळतो, इतर नाही. इतर गुणधर्म या वस्तूप्रमाणे अन्य काही वस्तूंमध्ये असू शकतात..अगदी सर्वसामान्य, परिचयातील, व्यवहारातील व कवींना प्रिय असलेले उदाहरण एका संस्कृत श्लोकाच्या रूपाने देता येईल -काकः कृष्णः पीकः कृष्णः, को भेदः पीककाकयोः।वसंत समये प्राप्ते काकः काकः पीकः पीकः।।कावळ्याचा रंग जसा काळा असतो तसाच कोकिळेचाही रंग काळाच असतो. त्यामुळे काळा रंग हे त्यांच्यापैकी कोणाचेच व्यवच्छेदक लक्षण होऊ शकत नाही, की ज्याच्यामुळे एकाला दुसऱ्यापासून अलग करता येईल किंवा ओळखता येईल; परंतु वसंत ऋतूचे आगमन झाल्यावर मात्र कोकिळेचे व्यवच्छेदक लक्षण जणू प्रकट होते.विशिष्ट ध्वनीमुळे तिला ओळखता येते. ही कोकिळा. असा ध्वनी कावळ्याला निर्माण करता येत नाही.वसंत ऋतू वगळता कोकिळा इतर ऋतूंत गात नसते. मग त्यावेळी तिचे हे व्यवच्छेदक लक्षण गायब होते की काय? याचे उत्तर अर्थातच नकारार्थी द्यावे लागते. तशा प्रकारे ध्वनी उत्पन्न करण्याच्या क्षमतेच्या रूपात ते लक्षण तिच्यात तेव्हाही असतेच. कावळ्यात ते कधीही नसते.आता ही क्षमता कोकिळेत कोठून आली? या प्रश्नाचे उत्तरही स्पष्ट आहे. ती तिची आनुवंशिक क्षमता आहे. तिच्या शरीररचनेचा तो भागच आहे. तिच्या पूर्वजांकडून ती क्षमता पुढील पिढीत संक्रमित होत होत (श्लोककर्त्याने पाहिलेल्या) कोकिळेपर्यंत पोहोचली आहे. ज्या यंत्रणेच्या माध्यमातून ती अशी संक्रमित झाली, तिच्या संदर्भात जनुक, डीएनए असे नंतरच्या संशोधनातून निष्पन्न झालेले शब्द प्राचीन काळातील हा श्लोक रचणाऱ्या कवीला उपलब्ध नसणार हे उघड आहे. पण या गोष्टीचा संबंध कोठे तरी कोकिळेच्या वंशाशी, कुळाशी आहे, हे त्याला नक्कीच माहीत असणार..प्राणिसृष्टीतील अशी अनेक उदाहरणे प्राचीन काळातील लेखकांनी वापरली व त्यांचा उपयोग माणसांच्या संदर्भात केला. पंचतंत्रातील अशाच एका गोष्टीत कोल्ह्याच्या एका पोरक्या पिल्लाला सिंहाच्या कळपात वाढवले जाते. ते पिलू कळपातील इतर छाव्यांसमवेत खेळत, बागडत लहानाचे मोठे होते.सिंहाची ती बछडीही त्याला आपल्यातलाच एक, खरेतर आपला मोठा भाऊ समजूनच त्याच्याशी व्यवहार करीत असत. त्याला दादा म्हणत, त्याचा आदर करत, त्याचे ऐकतसुद्धा.कुटुंबातील अन्य सदस्य शिकारीसाठी वगैरे बाहेर गेले असता कळपातील या बछड्यांना एक हत्ती दिसतो. हा प्राणी ते पहिल्यांदाच बघत असतात.त्याला पाहून त्या छाव्यांमधील वांशिक वारशातून प्राप्त झालेली हत्तीलाही शिकार समजून त्याच्यावर हल्ला करण्याची प्रवृत्ती किंवा क्षमता जागृत होते व तशी पावले उचलू लागतात. कोल्ह्याचे पिलू मात्र हत्तीला पाहून घाबरते.त्याच्यापुढे आपला निभाव लागणार नाही, असे त्याला वाटल्याने ते इतर बछड्यांना आपल्या अधिकारात त्यापासून परावृत्त करते. इतकेच नव्हे तर आईबाप परतून घरी आल्यावर त्यांच्यापुढे आपल्या धाकट्या भावंडांची तक्रारही करते. सिंह काय समजायचे ते समजतो. त्या पिल्लाला कोल्ह्यांच्या कळपात सोडायची वेळ आली आहे, असे समजून तो कोल्ह्याच्या पिलाला तसे सूचित करतो. त्यावर ते पिलू माझ्यात काय कमी आहे, असा प्रतिप्रश्न करू लागते. त्यावर सिंह उत्तरतो, तू जरी रूपगुणसंपन्न असलास तरी ‘यस्मिन्कुले त्वमुत्पन्नः गजस्तत्र न हन्यते’..थोडक्यात सांगायचे झाल्यास एकूणच सृष्टीत वनस्पती असोत, प्राणी असोत किंवा माणसे असोत त्यांना त्यांचे व्यक्तित्व, ओळख देणारे असे काहीतरी असते, की ज्यांच्यावर त्यांचे एकमेवत्व, निजात्मता (Identity) अवलंबून असते. हे एकमेवत्व त्यांना त्यांच्या वांशिक वारशातून म्हणजेच जेनेटिकली प्राप्त होते. याचा अर्थ असा नव्हे, की ते त्यांच्याकडे त्यांच्या अगदी पहिल्या पिढीतच- पहिल्या पिढीपासूनच असेल. तेसुद्धा उत्क्रांतीच्या प्रक्रियेत विकसित झालेले असेल व एका टप्प्यावर हा विकास पुरेसा वाटल्याने ते त्याच स्वरूपात- स्थिर समजले जावे इतके- पुढील पिढ्यांत संक्रमित होत आले असेल.माणसाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास आजच्या मानवाला होमो सेपियन्स असे म्हटले जाते हे सर्वांना ठाऊकच आहे. हा शब्दप्रयोग आपल्या चर्चेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे. या संकल्पनेचा संबंध उत्क्रांतीच्या सिद्धांताशी आहे.व्याख्या आणि वर्गीकरण हा माणसाच्या ज्ञानाचा व चर्चेचा विषय अगदी ग्रीक काळापासूनचा आहे. त्यात ‘जिनस’ (Genus) आणि ‘स्पिसिज’ (Species) हे शब्द आढळून येतात. त्यांचा अर्थ अनुक्रमे प्रजाती व जाती असा करण्यात येतो. प्रजाती हा एक व्यापक वर्ग असतो व जाती या वर्गाच्या अंतर्गत येणारा, त्यात समाविष्ट होणारा कमी व्याप्तीचा वर्ग असतो. प्रजातीमध्ये अशा अनेक जातींचा समावेश होतो. उदाहरणार्थ मार्जार (Cat) ही प्रजाती आणि तिच्यात समाविष्ट करण्यात येणाऱ्या वाघ, सिंह, चित्ता, मांजर या जाती होत. अशा या सर्व विविध जातींमध्ये काही एक समान घटक असणार, की ज्यामुळे त्यांना मार्जार जातीच्या म्हणून ओळखता येते. .पण त्याचबरोबर त्या त्या प्रत्येक जातीतील सर्व व्यक्तींमध्ये (उदाहरणार्थ, विशिष्ट वाघ) असा समान घटक असणार, की त्या व्यक्तींना त्याच जातीच्या व्यक्ती किंवा सदस्य म्हणून ओळखले जाणार. त्यांचा समावेश त्या जातीत होणार.प्रजाती व जाती यांच्यासाठी महाकुल आणि कुल असे शब्दही वापरायला हरकत नसावी.जेव्हा मानवेतर प्राण्यांच्या चर्चेत त्यांच्या प्रजातींचा मुद्दा निघतो तेव्हा असे दिसते, की बहुतेक ठिकाणी एका प्रजातीच्या अनेक जाती अस्तित्वात आहेत. (मार्जार प्रजातीचेच उदाहरण पुरेसे ठरावे.उत्क्रांतीच्या प्रक्रियेत त्या नेमक्या केव्हा व कोणत्या परिवर्तनामुळे वेगवेगळ्या झाल्या असतील हा विषय उत्क्रांती विज्ञानाच्या तज्ज्ञांकडे सोपविता येतो.) पण जेव्हा आपण ‘होमो’ (Homo) आणि ‘सेपियन्स’ (Sapience) या प्रजाती- जातींच्या- मानव आणि शहाणा मानव असा विचार करतो तेव्हा ‘होमो’ किंवा मानव या प्रजातीची एकच जाती अस्तित्वात असल्याचे आढळते. पण हा शब्दप्रयोगच सूचित करतो, की मानव (होमो) प्रजातीच्या एकापेक्षा अधिक जाती केव्हा ना केव्हा अस्तित्वात असणार आणि त्यातील आपण आज जी पाहतो ती म्हणजे ‘सेपियन्स’ची जाती होय.उरलेल्या जातींचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होतो? त्याची दोन उत्तरे संभवतात. पहिले म्हणजे उत्क्रांती प्रक्रियेमध्ये अनुस्यूत असलेल्या ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ (रगेल तो तगेल) आणि ‘नॅचरल सिलेक्शन’ (नैसर्गिक निवड) या तत्त्वांनुसार अस्तित्वाच्या संघर्षात त्या नामशेष झाल्या असतील. हा संघर्ष मानवेतर प्राण्यांशी झाला असेल किंवा कदाचित मानवाच्या अन्य जातींशी झाला असेल. ज्यात ‘सेपियन्स’चाही समावेश असणार. हीच गोष्ट दुसऱ्या पद्धतीने सांगायची झाल्यास ‘सेपियन्स’ मानव इतर प्राण्यांच्याबरोबर झालेल्या स्पर्धा संघर्षात त्यांच्यावर मात करून टिकला असणार किंवा त्याचा इतर मानव जातींशी संघर्ष होऊन त्यांच्यावर मात करून टिकला असणार. (उदाहरणार्थ, होमो इरेक्टस वगैरे.)ज्यांना उत्क्रांतीमधील अशी हिंसक तत्त्वे निदान मानवासाठी मान्य नसतील त्यांच्यासाठीही दुसऱ्या उत्तराचा पर्याय उपलब्ध आहे. त्यानुसार आजची होमो सेपियन्स ही जाती त्यापूर्वीच्या ‘होमो’ पासूनच काही परिवर्तने होऊन उत्क्रांत झाली असणार आणि ती परिवर्तने पूर्वीच्या ‘होमो’मध्ये झाली असणार. .अशा परिवर्तनाची आवश्यकता जीवनकाळातील इतर प्राण्यांशी झालेल्या संघर्षातून किंवा थेट सृष्टीमधील काही भौतिक दबावातून निर्माण झाली असावी. एकदा या प्रकारच्या परिवर्तनांमुळे होमो सेपियन्स निर्माण झाला, मात्र ‘होमो’ या प्रजातींची उत्क्रांती तेथेच थांबली. ‘सेपियन्स’ला अशा कोणत्याही संघर्षाला तोंड द्यावे लागले नाही, की ज्यामुळे त्याच्यात आणखी काही परिवर्तने होत ‘सेपियन्स’च्या पुढील विकासाचा टप्पा गाठणे त्याला भाग पडले.याचा अर्थ असा घ्यायचा का, की एकदा होमो सेपियन्सच्या रूपात अवतीर्ण झाल्यानंतर मानवात काही फेरफार, बदल, परिवर्तन झाले नाही?अर्थातच नाही. बदल झाले. परिवर्तने झाली पण त्याचे स्वरूप शारीरिक वा जैविक नव्हते. त्यामुळे ते बदल झालेल्या पिढीकडून ते बदल पुढच्या पिढ्यांकडे जनुकांच्या मार्फत संक्रमित होण्याचा प्रश्नच नव्हता.वेगळा शब्द वापरून सांगायचे झाल्यास असे म्हणावे लागते, की होमो सेपियन्सच्या या अवस्थेपर्यंत मानवात जे बदल झाले ते प्राकृतिक (Natural) होते. त्यानंतर त्याच्यात झालेल्या बदलांसाठी ‘प्राकृतिक’ हा शब्द वापरता येत नाही.मग कोणता शब्द वापरावा?.सांस्कृतिक...सजीवांच्या अन्य प्रजाती, जाती आणि होमो सेपियन्समधील महत्त्वाचा फरक हा आहे, की प्रकृती ही इतर प्राण्यांच्या उत्क्रांतीची मर्यादा ठरली. मानवाच्या बाबतीत असे घडले, की प्रकृतीच्या पायावर त्याने संस्कृतीची इमारत उभी केली.पण त्यामुळे तिला उत्क्रांती प्रक्रियेचाच भाग मानायचे का? आणि मुख्य म्हणजे तिला काहीही माना, पण अशा प्रकारे माणूस त्याच्या प्रकृतीपासून किती दूर जाऊ शकणार आहे? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न इतक्या दूर जाणे त्याला पेलणार, परवडणार आहे का? म्हणजेच जेवढे दूर जाणे शक्य आहे तेवढे जाणे इष्ट ठरणार आहे का? ते इष्ट ठरणार नसेल, तर त्या शक्यतेवर माणसाने आपले आपणच निर्बंध घालणे योग्य होईल का? असे निर्बंध कोण घालणार? ते खरोखर पाळले जातील का?‘विश्वाचे आर्त’ आहे ते नेमके हेच! होमो सेपियन्सपर्यंतच्या मानव जातीच्या प्रत्येक टप्प्याला ‘होमो’, मानव, असेच म्हटले जाते. आणि मुद्दा केवळ म्हटले जाण्याचा नाही तर वैज्ञानिक वर्गीकरणाचा आहे. हे टप्पे ‘मानव’ या नावाने ओळखल्या जात असलेल्या जातींमध्ये समाविष्ट होण्यात त्यांच्यात असलेल्या भेदाची अडचण येत नाही.आता होमो सेपियन्सने आपल्यात आजपर्यंत जे बदल घडवले ते जमेस धरूनही ‘होमो’ हा ‘होमो’च राहिला.मुद्दा या नंतरच्या- भविष्यकाळातल्या -मानवात होणाऱ्या बदलांना सामावून घेता येईल इतकी ‘होमो’ ही संकल्पना सक्षम, समर्थ आणि पुरेशी व्यापक आहे का? यानंतरचे बदल इतके मूलभूत असतील का, की ज्यांना सामावून घेण्यात, न्याय देण्यात ‘मानव’ कल्पना कोलमडून पडेल?.समजा तसे झालेच, म्हणजे ‘मानव’ या नावाने होमो सेपियन्ससह अगोदर होऊन गेलेल्या ‘होमों’च्या प्रजातीत या नव्याने अस्तित्वात येऊ पाहणाऱ्यांचा समावेश त्या प्रजातीची एक जाती या संबंधाने करता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचे?हे नवे जे जीव असतील त्यांना मानव प्रजातीची उत्क्रांत जाती समजून ‘होमो अमुकतमुक’ म्हणायचे झाले तर आजच्या मानवामध्ये व त्यांच्यामध्ये समान असा महत्त्वाचा गुणधर्म असावा लागेल. असे असेल तर वेगळ्या गुणवैशिष्ट्याला न्याय देऊनही त्यांचे हे वैशिष्ट्य जपूनही त्यांना ‘होमो’, मानव, म्हणता येईल.अर्थात असे झाले तर खूप कालावधीनंतर मानव प्रजातीच्या दोन जाती एकाच वेळा अस्तित्वात असल्याची परिस्थिती उद्भवेल. ‘होमो’ आणि ‘होमो अमुकतमुक’ या दोन जातींचे परस्परसंबंध कसे राहतील इत्यादी प्रश्न उद्भवल्याशिवाय राहणार नाही.पण तरीही ती एक तात्पुरती अवस्था असेल. शेवटी ‘सेपियन्स’ मानव नामशेष होत जाऊन विश्वात पृथ्वीतलासह खरेतर अन्य ग्रहांवरही ‘अमुकतमुक’ मानव पसरेल. होमो सेपियन्स, उदाहरणार्थ होमो इरेक्टससारखा उत्क्रांतीच्या इतिहासाच्या अभ्यासाचा विषय होईल. त्याचे नमुने संग्रहालयात ठेवले जातील.आणि जोपर्यंत या नव्या मानवातून आणखी पुढचा टप्पा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत या नव्या जिवाबरोबर दुसऱ्या एखाद्या प्रजातीची; त्याच्याशी काही साम्य, काही भेद असलेली जातीच नसल्याने ती एकमेव जाती असेल.तूर्तास या नव्या जातीचे नामकरण नीट होऊ न शकल्याने तिला ‘पोस्ट ह्यूमन’ मानवोत्तर म्हटले जाते. आणि आत्ता तरी त्याचा अर्थ मानवोत्तर ‘मानव’ असाच घेतला जातो..कदाचित हा मानवोत्तर ‘मानव’ आजच्या मानवाचीच उत्क्रांती किंवा निर्मिती असल्यामुळे त्याच्याशी आपले नाते निदान शाब्दिक किंवा सांकल्पनिक स्तरावर तरी राखले जावे म्हणून त्याचे असे नामकरण केले गेले की काय कोण जाणे?होमो इरेक्टसला आजच्या म्हणजे ‘सेपियन्स’ मानवासारखी भाषा वगैरे असती आणि त्याला या ‘सेपियन्स’ची चाहूल लागली असती तर त्याने आपले, अर्थात होमो सेपियन्सचे, नामकरण ‘पोस्ट इरेक्टस’ असे काहीसे केले असते का?असाच काहीसा प्रश्न ‘सेपियन्स’पूर्व कोणत्याही जातीच्या मानवाबद्दल विचारता येईल.(डॉ. सदानंद मोरे इतिहास व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि संशोधक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत.)------------------------------------.Loksabha Election Result : मोदी व राहुलही मतदारांना नापसंत !.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.