त्या काळी गोऱ्या कातडीच्या युरोपियनांनी जगावर अधिराज्य गाजवलं होतं. अनेक छोट्या मोठ्या युरोपीय देशांनी जगाच्या इतर खंडांमधील देशांना आपलं अंकित बनवून तिथल्या नागरिकांना जवळजवळ गुलाम केलं होतं.
त्यापायीच मग गोरी कातडी सर्वश्रेष्ठ आणि इतर काळे लोक कनिष्ठ गुणधर्म धारण करणारे, असाच समज प्रसृत केला जात होता. या काळ्या-सावळ्या त्वचा धारण करणाऱ्या प्रजातींना उत्क्रांतीनं गुंगारा दिला आहे.
मानवजातीचा उदय नेमका कुठं झाला, याविषयी मतमतांतरं होती. चार्ल्स डार्विननं आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या ग्रंथात, द डिसेन्ट ऑफ मॅनमध्ये, याविषयी चिंतन केलं आहे. त्या काळी गोऱ्या कातडीच्या युरोपियनांनी जगावर अधिराज्य गाजवलं होतं.
अनेक छोट्या मोठ्या युरोपीय देशांनी जगाच्या इतर खंडांमधील देशांना आपलं अंकित बनवून तिथल्या नागरिकांना जवळजवळ गुलाम केलं होतं. त्यापायीच मग गोरी कातडी सर्वश्रेष्ठ आणि इतर काळे लोक कनिष्ठ गुणधर्म धारण करणारे, असाच समज प्रसृत केला जात होता. या काळ्या-सावळ्या त्वचा धारण करणाऱ्या प्रजातींना उत्क्रांतीनं गुंगारा दिला आहे, असा सिद्धांत मांडून ते कमअस्सल असल्याचं सर्वांच्याच मनावर बिंबवण्यात येत होतं.
त्या काळी जर कोणी म्हटलं असतं की आपण सारे मानव आफ्रिकन वंशाचे आहोत, तर त्याला वेड्यातच काढलं गेलं असतं. त्याची जाहीर निर्भर्त्सना केली गेली असती. पण डार्विननं नेमका हाच मुद्दा आपल्या ग्रंथात मांडलेला होता.
कारण त्यानं म्हटलं होतं, की उत्क्रांतीच्या प्रवाहातले आपले सर्वात जवळचे नातेवाईक असलेले चिम्पान्झी आणि गोरिला हे वानर म्हणजेच प्रायमेट हे आफ्रिकेचेच मूळ रहिवासी होते. आणि म्हणूनच आपण, म्हणजेच होमो सेपियन म्हणवणारे मानवप्राणीही त्याच जातकुळीतले असावेत या सिद्धांताला बळकटी मिळते.
डार्विनला भविष्यवेत्ता किंवा दूरदर्शी म्हणायचं ते यासाठीच. कारण तोवर त्याच्या सिद्धांताचा थेट पुरावा मिळाला नव्हता. पण पुढच्या अर्धशतकात जीवाश्मांचे अनेक नमुने मिळू लागले, आणि ते सर्व आपण आफ्रिकेतच उगम पावलो असं ओरडून सांगू लागले.
आणि जनुकीय वारशांच्या अध्ययनानंतर तर त्यात कोणताही संशयच राहिलेला नाही. जगात ठिकठिकाणी पसरलेल्या मानवांच्या डीएनएचं परीक्षण केल्यानंतर वरवर अतिशय वेगळे दिसणारे आपण मुळात अतिशय निकटच्या नात्यात असल्याचंच दिसून येतं.
तसंच पाहिलं तर चिम्पान्झी आणि मानव यांच्या जनुकसंचयातला फरक एक टक्क्याहूनही कमी असल्याचा ठोस पुरावा मिळाला आहे. आणि आज जगात असलेल्या जवळजवळ आठ अब्ज मनुष्यप्राण्यांमधला फरक तर त्याहूनही कमी आहे.
आजपावेतो हाती लागलेल्या आदिमानवाच्या जीवाश्मांचं मूळ आफ्रिकेत असल्याविषयी कोणताही संदेह राहिलेला नाही. डोनाल्ड जॉन्सन यांना इथियोपियामध्ये ‘लूसी’ हा जीवाश्म मिळाला.
ऑस्ट्रॅलोपिथेकस अफॅरेन्सिस या प्रजातीच्या त्या जिवाच्या डीएनएच्या सखोल परीक्षणानंतर चिम्पान्झी आणि मानवप्राणी यांची वंशवेल एकमेकांपासून वेगळी झाली ती सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडच्या प्रदेशात. हे तर स्पष्टच झालं.
त्यानंतर होमो इरेक्टस आणि निअँडर्थल हे मानवाचे पूर्वसूरी अवतरले. त्यांनी आफ्रिकेतून दूर जात जगाच्या इतर प्रदेशांमध्ये वस्ती करायला सुरुवात केली. आधुनिक मानवाचा उदय साधारण एक लाख साठ हजार वर्षांपूर्वी झाला.
त्या आधीच या दोन पूर्वसूरींनी आपलं बस्तान जगभर बसवलं होतं. त्या प्रजातींचा उगम कसा झाला आणि त्यांचं व आपलं नातं नेमकं काय आहे याविषयी मुख्यत्वे दोन कल्पना लढवल्या गेल्या आहेत.
यापैकी एक कल्पना असं सुचवते, की मानवजातीची उत्क्रांती एकदाच आणि एकाच ठिकाणी म्हणजेच आफ्रिकेत झाली. त्यानंतर तिनं स्थलांतर करत जगाच्या उर्वरित भागातल्या इतर प्रजातींची जागा घ्यायला सुरुवात केली. त्यापायी त्या प्रजाती नष्ट झाल्या आणि जगभर केवळ होमो सेपियनचीच वस्ती झाली.
दुसरी कल्पना याला छेद देत सांगते, की नाही, आदिमानव आधी आफ्रिकेतून इतरत्र प्रयाण करता झाला. त्या प्रत्येक ठिकाणी तो उत्क्रांत होत गेला आणि होमो सेपियनचे वेगवेगळे गट निरनिराळ्या ठिकाणी कब्जा करून राहू लागले.
पण जीवाश्मांचं अध्ययन यापैकी पहिल्या कल्पनेला म्हणजे ‘आफ्रिकेतून जगाकडे’ या विवेचनाची पुष्टी करत होतं. त्याला आत जनुकीय वारशाच्या अध्ययनानं पाठिंबाच दिला आहे. वैज्ञानिक परिभाषेत ज्याला कन्फर्मेटरी एव्हिडन्स, निर्विवाद पुरावा, म्हणतात तो जनुकीय वारशानंच पुरवला आहे.
या अभ्यासापायी एक नवाच वाद उफाळून आला होता. निअँडर्थल ही प्रजाती आधुनिक मानवजातीच्या आधी उदयाला आली होती. त्यामुळं आफ्रिकेत काय किंवा इतरत्र काय, एकाच वेळी दोन्हीही प्रजाती अस्तित्वात होत्या.
त्यापैकी निअँडर्थलांच्या पूर्वजांचा मानवाच्या पूर्वजांपुढं निभाव लागला नाही आणि ते हळूहळू नामशेष झाले, असं एका गटाचं म्हणणं होतं. तर दुसऱ्या गटाचा दावा होता की त्यांच्याशी तसं सौहार्दाचंच वातावरण राहिलं आणि त्यांचा मानवजातीशी काही प्रमाणात संकर होत त्यांचे काही गुणधर्म मानवानं अंगिकारले.
त्याचाच निवाडा करण्यासाठी निअँडर्थलच्या जीवाश्मांच्या जनुकांचा सखोल वेध घेण्यात आला, तेव्हा आधुनिक मानवामध्ये निअँडर्थलच्या डीएनएचा कोणताही अंश नसल्याचंच दिसून आलं. जर समजा काही होमो सेपियनचा आणि निअँडर्थलचा समागम झालाच असला, तर त्यातून जन्माला आलेली पिढी अल्पजीवीच ठरली.
ती टिकून राहिली नाही. वयात येण्यापूर्वीच अशा संकरित जीवांचं निधन झालं. त्यामुळं असे मिश्र डीएनए पुढच्या पिढ्यांमध्ये अवतरण्याचा प्रश्नच उरला नाही.
तरीही या संशोधनातून एक गमतीची माहिती मिळाली. FOXP2 या नावानं ओळखलं जाणारं एक जनुक मानवप्राण्यात आहे. सर्वच वंशांच्या मानवांमध्ये ते आढळतं. त्याच्या प्रभावापोटीच मानवामध्ये भाषेचा उगम आणि विकास झाला आहे.
याच जनुकाचा अवतार निअँडर्थलमध्येही असल्याचा पुरावा मिळाला आहे. याचा अर्थ त्यांनीही भाषेचा वापर संवादासाठी करायला सुरुवात केली होती असा होतो. ते अगदीच गावंढळ किंवा वानरांसारखे रानटीच होते, असं जे त्यांचं वर्णन केलं जातं, ते चुकीचं असल्याचंच या संशोधनानं दाखवून दिलं आहे.
जनुकीय परीक्षणावरून मानवजातीचा इतिहास समजून घेण्यात केवळ पुरुषांमध्ये असणारं वाय गुणसूत्र आणि पेशीतील मायटोकॉन्ड्रिया हे उपांग यांचा फार मोठा सहभाग आहे. कारण वाय गुणसूत्र केवळ पुरुष संततीलाच दिलं जातं.
म्हणजे वडिलांकडून मुलग्याकडे. त्यामुळं पैत्रिक वंशाचा इतिहास समजण्यात मदत होते. तसंच मायटोकॉन्ड्रियामध्येही डीएनए असतं. आणि ते केवळ मातेकडूनच आपल्या संततीला दिलं जातं. त्यामुळं मातृकुळाची वंशवेल निर्धारित करता येते.
याशिवाय या दोन्ही डीएनएमध्ये क्वचितच उत्परिवर्तन होतं. ते जसंच्या तसंच पुढील पिढीकडे सुपूर्द केलं जातं. त्याच्या सखोल अभ्यासातूनही मानवजातीचा उदय आफ्रिकेमध्येच झाल्याचं सिद्ध झालं आहे.
अशा तऱ्हेनं मानवजातीचा उदय उत्क्रांतीच्या प्रक्रियेमधूनच झाला असेल आणि ती प्रक्रिया निरंतर चालू राहणारी असेल, तर मग आजच्या मानवजातीचीही उत्क्रांती होत एखाद्या नव्याच प्रजातीचा उदय होणार आहे की काय? की मानवजातीची उत्क्रांती थांबली आहे? हे प्रश्न विचारवंतांना सतावत आहेत.
आपण आरोग्यव्यवस्थेत केलेल्या सुधारणांपायी उत्क्रांतीच्या प्रक्रियेला काही प्रमाणात खीळ बसत असली तरी तो प्रवाह कुंठित झालेला नाही, असं मानववंशशास्त्रज्ञांना दिसून आलं आहे. जगभरच्या निरनिराळ्या समाजगटांमधील जनुकीय फरक गेल्या दहा हजार वर्षांमध्ये अधिक रुंदावले असल्याचं त्यांना आढळलं आहे.
ते तसेच होत राहिले तर भविष्यात एक नाही तर दोन निरनिराळ्या प्रजाती अस्तित्वात येण्याची शक्यता असल्याचं भाकित त्यांनी वर्तवलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.