अरविंद परांजपेपुढे काय होईल हे कुणालाच सांगता येणार नाही, पण आपण जर खरंच बुद्धिवान असू तर आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवू आणि इतर संकटांतून आपण जसे बाहेर पडलो होतो तसेच भविष्यात येणाऱ्या संकटांतूनही आपण बाहेर पडू..गेल्या वर्षभरात आपण आपल्या सूर्यमालेबद्दल जेवढे काही वाचले, जी माहिती आपण मिळवली ती फक्त आपल्या बुद्धीच्या जोरावर. मग प्रश्न येतात, की आपण कोण? आपण आलो कसे? आपली निर्मिती कोणी केली?आज आपल्या माहितीप्रमाणे आपल्या सौरमालेत कुठेही सजीव अस्तित्वात नाहीत कारण कुठल्याही ग्रहावर सजीवांच्या उत्क्रांतीस पोषक असे वातावरण नाही.सजीवांच्या अस्तित्वाबद्दल ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी पॅनस्पर्मिया (पॅन म्हणजे सर्व आणि स्पर्मा म्हणजे बीज) हे गृहीत मांडले होते. त्यांच्या मते सजीवांचे बीज सर्वत्र आहे आणि जेव्हा अशा बीजाला पोषक वातावरण मिळते तेव्हा त्याची उत्क्रांती होते.गेल्या दीडदोनशे वर्षांपासून मानवाने या प्रश्नावर संपूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास आणि या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एका प्रयोगात शास्त्रज्ञांनी एका बंद कुपीत पृथ्वीच्या निर्मितीच्यावेळी जसे वातावरण होते तशी परिस्थिती निर्माण केली असता, त्यांना सजीवांना पोषक असे सेंद्रिय आणि स्निग्ध पदार्थ मिळाले. पण निर्जिवातून सजीव ही प्रक्रिया नेमकी कशी घडते याचे उत्तर मात्र मिळत नाही. पण एकदा का सजीवांच्या बीजांना उत्क्रांतीसाठी पोषक अशी जागा मिळाली, की तिथे सजीवांची उत्क्रांती होऊ शकते, हे मात्र खरे. कमीत कमी पृथ्वीच्याबाबतीत तरी आपण हेच बघतो. .विश्वात इतरत्र कुठे सजीव असतील का? आणि असे किती सजीव असतील याचा अंदाज आपण बांधू शकू का? असा काहीसा प्रश्न वैश्विक रेडिओ लहरींच्या माध्यमातून खगोल निरीक्षण करणाऱ्या फ्रँक ड्रेक यांना पडला होता. या प्रश्नाला उत्तर म्हणून त्यांनी एक समीकरण तयार केले. या समीकरणातील गुणोत्तरे काहीशी अशी होती - १) दरवर्षी ताऱ्यांच्या निर्मितीची सरासरी संख्या, २) ग्रह असलेल्या ताऱ्यांची संख्या, ३) ज्या ताऱ्यांच्या ग्रहांवर सजीवांसाठी पोषक वातावरण असेल अशा ताऱ्यांची संख्या, ४) ज्या ताऱ्यांच्या ग्रहांवर सजीवांची उत्पत्ती झाली असेल अशा ताऱ्यांची संख्या, ५) ज्या ताऱ्यांच्या ग्रहांवर बुद्धिमान सजीव असतील अशा ताऱ्यांची संख्या, ६) ज्या ताऱ्यांच्या ग्रहांवरच्या सजीवांना रेडिओ वापरून दळणवळणाचा शोध लागला असेल अशा ताऱ्यांची संख्या आणि शेवटचा सातवा मुद्दा म्हणजे असे ग्रह किती काळ टिकू शकतील?पहिल्या सहा मुद्द्यांच्या गुणोत्तरातून अशा ताऱ्यांची संख्या एक हजार ते एक कोटी असू शकेल. पण या समीकरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे शेवटचा -७वा. उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर येऊन ते सजीव आपला स्वतःचाच सर्वनाश करतील असा जर निसर्गाचा नियमच असेल, तर तो काळ किती असेल?अगदी प्राथमिक अवस्थेपासून आजच्या मानवापर्यंतचा सजीवांच्या इतिहासाचा प्रवास सुमारे साडेतीन अब्ज वर्षांचा आहे.हा सर्व इतिहास अब्ज आणि कोटी वर्षांच्या भाषेत सांगायचा, तर कदाचित त्याचे सहज आकलन होणार नाही. कारण अशा संख्या आपल्या रोजच्या वापरात नसतात. पण वर्षाचे कॅलेंडर आपल्या चांगल्याच परिचयाचे आहे. आता कल्पना करू या, की एखाद्या वर्षाच्या अगदी सुरुवातीला १ जानेवारी रोजी -म्हणजे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री आपण जेव्हा नवीन वर्षात पदार्पण करतो तेव्हाच पृथ्वीची निर्मिती झाली आणि आजचा दिवस म्हणजे पुन्हा डिसेंबर महिन्याच्या ३१ तारखेची मध्यरात्र आहे. आता पृथ्वीवर सजीवांची उत्क्रांती कशी झाली ते या कॅलेंडरवर बघू या.जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात पृथ्वी एक तप्त गोळा होती आणि ती फक्त थंड होत होती. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पृथ्वीवर समुद्र तयार होऊ लागला. मार्च महिन्याच्या शेवटच्या किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केव्हातरी अगदी प्राथमिक अवस्थेतील सजीव सर्वप्रथम पृथ्वीवर आले. पण त्यानंतर जवळजवळ नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पृथ्वीवर विशेष मोठे असे काहीच घडले नाही. समुद्रात थोडीफार उत्क्रांती होत होती. भूतलावर फक्त जमीन आणि डोंगरच होते. मग २८ नोव्हेंबर या दिवशी सर्वप्रथम सजीव पाण्यातून बाहेर येऊन भूतलावर अवतरले. कालांतराने जमिनीवर झाडे उगवली आणि सरपटणारे सजीव वावरू लागले. .डायनोसॉर पृथ्वीवर १२ डिसेंबर रोजी वावरताना दिसू लागले. भूपृष्ठावर आणि आकाशात त्यावेळी त्यांचेच राज्य होते आणि त्यांनी इतर सजीवांना उत्क्रांत होऊ दिले नाही. पण त्यांचे असे हे अस्तित्व ख्रिसमस किंवा नाताळाच्या दिवसांपर्यंतच होते. मग त्यांचा सर्वनाश झाला. त्यांचा असा अचानक सर्वनाश का झाला, हे एक कोडे होते. पण आज जवळजवळ सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेल्या मतानुसार पृथ्वीला एका मोठ्या अशनीची धडक बसली, हे या विनाशाचे कारण होते. या धडकेमुळे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली तसेच पृथ्वीच्या वातावरणात इतक्या मोठ्या प्रमाणात धूलीकण मिसळले गेले, की त्यावर एक प्रकारचे कवच तयार झाले. सूर्यकिरणांना हे कवच भेदणे शक्य झाले नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती नष्ट झाल्या. त्यामुळे शाकाहारी असणारे डायनोसॉर नष्ट झाले, आणि मग खाद्य नसल्यामुळे मांसाहारी डायनोसॉरांचेही अस्तित्व संपुष्टात आले.कालांतराने वातावरणातील धूळ खाली बसली आणि आता पृथ्वीवर सस्तन प्राणी आणि पक्ष्यांची उत्क्रांती वेगाने होऊ लागली. मानवसदृश सजीव ३१ डिसेंबर रोजी पृथ्वीवर फिरू लागले. या प्राण्यांनी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत दगडांची हत्यारे करण्याची कला अवगत केली. त्याच रात्री सुमारे पावणे बाराच्या सुमारास पृथ्वीवर मानवी संस्कृतीची चिन्हे दिसू लागली. हे मानव गुहेत राहात होते. त्यांनी गुहेतील भिंतीवर काढलेली चित्रे आपल्याला बघायला मिळतात. पण त्यांना गावे आणि मग शहरे निर्माण करण्यास आणखी १० मिनिटे लागली. आता वेळ आहे; ३१ डिसेंबर, रात्रीचे ११ वाजून ५४ मिनिटे.आणि आता सामोरी येणारी महत्त्वाची बाब म्हणजे या कॅलेंडरवर सध्याच्या प्रगत मानवाचा इतिहास फक्त ६ सेकंदांचा आहे. यातून काही बोध होतोय का बघा... .पृथ्वीच्या इतिहासात वेगवेगळ्या टप्प्यांवर महाविनाश झाला आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण या विनाशानंतर नवीन आणि चांगल्या प्रतीच्या सजीवांची उत्क्रांती झाली आहे. कदाचित निसर्गाचा असा नियम असेल, की प्रत्येक सजीव त्यांच्या उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर आले की त्यांचा सर्वनाश करायचा; आणि मग त्यातून नवीन आणि जास्त चांगल्या प्रकारच्या सजीवांची निर्मिती करायची. हे या विनाशाचे कारण असेल. ड्रेकच्या समीकरणाचा शेवटचा घटक हेच सांगतो. पण निसर्गाने आपले काम करण्यापूर्वीच काही सजीवांनी आपला विनाश करण्याचे ठरवले तर?या उत्क्रांतीच्या शेवटच्या सहा सेकंदाच्या अगदी शेवटच्या भागात म्हणजे गेल्या सुमारे फक्त ५० वर्षांच्या कालावधीत आपण आपल्या सर्वनाशाच्या उंबरठ्यावर येऊन उभे आहोत की काय हा विचार नक्कीच डोकावून जातो. आइनस्टाइन म्हणाला होता, जर तिसरे महायुद्ध झाले तर चौथ्या महायुद्धासाठी आपल्याकडे दगड आणि विटाच उरतील. आज परिस्थिती अशी आहे, की जर असे युद्ध झालेच तर काहीच उरणार नाही. पण सर्वनाशासाठी फक्त अणुयुद्धच हवे असे नाही. सुमारे २५ वर्षांपूर्वी एड्स या रोगाची इतकी प्रचंड भीती निर्माण झाली होती, की २०२४मधला आजचा दिवस आपल्याला बघायला मिळेल किंवा नाही याबद्दल साशंकता होती. जागतिक तापमानवाढीची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. नुकतेच आपण एका महासाथीच्या जागतिक भयातून बाहेर पडलो आहोत किंवा पडत आहोत. जमिनीवरच्या युद्धाचे सावट तर अजूनही आहेच. पण त्याच बरोबर सायबर -कॉम्प्युटरच्या मदतीने होणाऱ्या युद्धाचे सावट फणा वर काढत आहे.पुढे काय होईल हे कुणालाच सांगता येणार नाही, पण आपण जर खरेच बुद्धिवान असू तर आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवू आणि इतर संकटांतून आपण जसे बाहेर पडलो होतो तसेच भविष्यात येणाऱ्या संकटांतूनही आपण बाहेर पडू. फक्त या सुरुंगाची वात मात्र आता खूप लहान झाली आहे, जर कोणी ती पेटवलीच तर पेटलेली ती वात विझवता येईल इतका वेळ कदाचित आपल्या हातात नसेल!(या लेखाबरोबरच सूर्यमालेचा शोध हे सदर समाप्त होत आहे.)--------------------.Artificial Sweetener : त्या मुलीच्या मृत्यूच्या कारणाचा केकमधील 'आर्टिफिशियल स्वीटनर' शी संबंध?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.