संवाद-सेतू : जागतिक आरोग्य संघटनेनं किशोरवयीन मुलांसाठी सांगितलेली दहा जीवनकौशल्यं कोणती?

आयुष्याच्या एका अर्धवट टप्प्यावर पोहोचलेल्या अपरिपक्व किशोरवयात तर ही कौशल्यं फार महत्त्वाची ठरतात.
teenager require communication skill
teenager require communication skill esaklal
Updated on

डॉ. वैशाली देशमुख

आजच्या किशोरांना संवाद कौशल्याचं महत्त्व आणि तंत्र आपल्याला शिकवायला लागणार, ते टाळता येणार नाही.

आणि त्यांच्याशी योग्य संवाद साधता येण्यासाठी, काही गोष्टींची त्यांना जाणीव करून देण्यासाठी प्रौढांनासुद्धा हे कौशल्य आत्मसात करण्याशिवाय गत्यंतर नाही.

आपण सगळे जगण्यासाठी, अर्थार्जनासाठी एखादं कौशल्य शिकतो आणि त्याचा वापर करून एखादा व्यवसाय निवडतो.

मग कुणी खरेदी-विक्री करतात, कुणी वकिली करतात, कुणी नृत्य-संगीतात करिअर करतात. कुणी डॉक्टर-इंजिनिअर होतात, तर कुणी शिक्षक. पण या सगळ्या कामांच्या पलीकडेही जगताना पावलोपावली कितीतरी कौशल्यांची आपल्याला आवश्यकता असते.

रोजच्या जीवनात कधी अडचणी येतात, कधी दुःखाचे प्रसंग येतात, कधी प्रश्न पडतात. अगदी आनंदाचे क्षणही पेलवत नाहीत एखाद्याला. एखाद्या वेळी समोरचा रस्ता बंद झाल्यासारखा वाटतो, कधी समोर अंधार पसरलाय असं वाटतं.

कधी इतरांचं वागणं, बोलणं कोड्यात टाकतं. या दैनंदिन समस्या किंवा घटना योग्यरित्या हाताळण्यासाठी जी कौशल्यं लागतात, त्यांना जीवनकौशल्यं म्हणतात. आयुष्याच्या एका अर्धवट टप्प्यावर पोहोचलेल्या अपरिपक्व किशोरवयात तर ही कौशल्यं फार महत्त्वाची ठरतात.

त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं खास किशोरांसाठी दहा जीवनकौशल्यं अधोरेखित केली आहेत. ती आहेत- स्व-ओळख, आस्था, संवाद कौशल्य, नातेसंबंध, समस्या निवारण, निर्णयक्षमता, कल्पक विचार, विवेकी विचार, भावना नियोजन, आणि तणाव नियोजन.

teenager require communication skill
Job Skills : 2024 मध्ये नोकरी शोधताय? ‘ही’ पाच कौशल्ये तुमच्याकडे असणं आवश्यक

या लेखमालेमध्ये आपण या कौशल्यांविषयी बोलणार आहोत; त्यांचा नक्की अर्थ काय? ती कशी वापरायची? कशी अंगी बाणवायची? आणि किशोरवयात त्यांचं स्थान काय?

यावेळी बोलूयात संवाद कौशल्याविषयी.

‘जा गं तू, बोलू नकोस माझ्याशी.’

‘अगं पण झालंय तरी काय? तू सांगितल्याशिवाय कसं कळणार मला?’

‘सगळं मीच सांगायचं का तुला? आई आहेस ना माझी? मुलीला काय होतंय एवढं पण कळत नाही का?’

‘आशू, असं कोड्यात नको बाई बोलूस. नीट सांग बघू.’

पण आशू काही बोलेचना पुढे, नुसती चिडचिड करत बसली. आई हतबुद्ध होऊन पाहत राहिली फक्त. आशू खरंतर खूप गोंधळली होती. थोडीशी घाबरलीसुद्धा होती.

आज शाळेतून येताना ती एकटीच होती. रोज तिच्याबरोबर येणारी तिची मैत्रीण गावाला गेली होती. दुपारची वेळ असल्यानं रस्ता पेंगुळला होता, दुकानं सुस्तावली होती. ‘शुक शुक’ कुणीतरी हाक मारली.

तिनं वळून पहिलं तर एका बंद दुकानासमोर बसलेला एक अनोळखी माणूस तिला बोलावत होता. त्याची नजर पाहून तिला कसंतरी झालं.

समोर बघून ती भराभरा चालायला, नव्हे पळायलाच लागली. कशीबशी धापा टाकत घरी पोहोचली, तर समोर आई! आशूचा चेहरा बघून ती काळजीनं हजार प्रश्न विचारायला लागली. आणि त्याची परिणती या वरच्या संवादात झाली.

खरंतर संवाद म्हणायचं का याला? त्यातल्या दोन्ही घटकांना जे हवं होतं ते साध्य झालं का त्यातून? त्यासाठी संवादाविषयी थोडी माहिती घेऊया.

आपल्या सगळ्यांनाच मान्य असेल की ‘संवाद’ हे एक कौशल्य आहे. आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवता येणं सगळ्यांनाच जमतं असं नाही.

कारण ते दिसतं तितकं साधं सरळ कुठे असतं? त्यामागे असतात खूप साऱ्या भावना, असंख्य गुंतागुंतीचे विचार, त्याच्या कारणांची आणि परिणामांची कारणमीमांसा, आणि सामाजिक बंधनं.

या गुंत्यामधून वाट काढून हवे ते शब्द शोधणं आणि त्यांचा वापर करून आपलं म्हणणं मांडणं ही सर्कसच आहे एक. आशू आणि तिची आई या दोघींमधला संवाद घ्या.

काय घडलं हे आशूला का बरं आईला थेट सांगता आलं नाही? एकतर त्या घटनेतून उद्‍भवलेली किळस ते भीतीपर्यंत असंख्य भावनांनी तिच्या मेंदूला गोंधळवून टाकलं. आपल्या मनातली ही उलघाल नक्की कोणत्या शब्दांत आईपर्यंत पोहोचेल हे तिला कळेना.

त्यावर आईची प्रतिक्रिया काय असेल? ती त्यासाठी आपल्याला जबाबदार धरेल का? त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर गदा येईल का? असे कितीतरी प्रश्न तिच्या विचारप्रक्रियेत अडथळे आणत होते.

त्यातून आई तिच्यावर प्रश्नांचा जो भडिमार करत होती, तो काळजीपोटी असला तरी आशूच्या गोंधळात भर घालणारा होता.

teenager require communication skill
यशस्वी करिअरसाठी Communication skills गरजेचे

सुदैवानं व्यक्त होण्यासाठी माणसाला भाषेची देणगी मिळाली आहे. पण आपल्याला जर वाटत असेल, की चपखल शब्द सुचले की जमला संवाद, तर पुन्हा विचार करा.

संवादात शब्द हे एक महत्त्वाचं साधन असतं, त्यांचा सुयोग्य वापर आवश्यक असतो आणि संवाद सुलभ करायला शब्दांची गरज असते हे खरंय.

पण त्यापलीकडे कितीतरी गोष्टी असतात. देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव, आवाजाची पट्टी आणि त्यातले चढ-उतार यातून शब्दांच्या अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही.

उदाहरणादाखल ‘काय’ हा शब्द वेगवेगळ्या प्रकारात म्हणून बघा- आनंदानं, आश्चर्यानं, रागानं, किळस दाखवून, गमतीत, अविश्वासानं, कंटाळून, कुतूहलानं वगैरे.

आजच्या संवादाच्या समाजमाध्यमी तऱ्हेमध्ये कसे दाखवायचे हे तपशील? कशी दर्शवायची काळजी-आस्था, आणि राग-अनुराग? तुम्ही म्हणाल, मग व्हॉइस मेसेज वापरायचा.

ठीक आहे, त्यातून आवाजी बारकावे ऐकवता येतील. मग देहबोलीचं काय? तुमच्या नजरेतून, हातवाऱ्यांतून जे जाणवतं, ते कसं जाणवणार? आपण म्हणू की मग त्यासाठी व्हिडिओचं माध्यम वापरलं तर? पण असं बघा, व्हिडिओमधून आपल्याला पाठीवर थोपटता येतं? खांद्यावर हात ठेवून जवळ घेता येतं? अश्रू पुसता येतात? केवळ आस्तित्वानं येणारा धीर मिळतो? संवादातला पंचेंद्रियांचा हा वापर इथे शक्यच नाही.

व्यक्तींमधल्या देवाणघेवाणीतला तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे श्रवण! यांत्रिक संवादांमध्ये आपण ‘ऐकून घेतोय’ हे कसं दाखवायचं? उत्तर न देता गप्प बसणं उद्धटपणा समजला जातो म्हणे.

मग त्यासाठी पुन्हा भाराभर शब्दच वापरायला लागणार. लिखित स्वरूपात संवाद साधता येतच नाही असं नाही, पण त्याला या अशा मर्यादा असतात.

म्हणजे समोरासमोर, प्रत्यक्ष केलेल्या संवादाला पर्याय नाही. आजच्या किशोरांना संवाद कौशल्याचं महत्त्व आणि तंत्र आपल्याला शिकवायला लागणार, ते टाळता येणार नाही.

आणि त्यांच्याशी योग्य संवाद साधता येण्यासाठी, काही गोष्टींची त्यांना जाणीव करून देण्यासाठी प्रौढांनासुद्धा हे कौशल्य आत्मसात करण्याशिवाय गत्यंतर नाही.

teenager require communication skill
Communication Skills: विकास संवादकौशल्याचा

सुरुवातीला आपण जो संवाद पाहिला तो वाहता राहणं आवश्यक होतं. कारण तो केल्यानंतरच आशूच्या मनातल्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळाली असती; पुन्हा असं घडलं तर काय करता येईल, याचा अंदाज आला असता.

मनातली खळबळ शांत होऊन पुढे जाता आलं असतं. आईचं आणि तिचं नातं घट्ट झालं असतं. संवाद करण्याचं हे कौशल्य म्हणजे भविष्यात तिला तिच्या नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये, अभ्यासात, व्यवसायात, व्यक्तिमत्त्व विकासासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी आणि सामाजिक देवाणघेवाणीत आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे.

अशा संवादासाठी कुठल्या गोष्टी पूरक ठरल्या असत्या बरं? त्यातल्या काही गोष्टी पाहू:

आशू आणि आई यांच्यात अशा विषयांवर पूर्वी काही बोलणं झालं असेल, तर विषय काढणं आशूला जरा सोपं गेलं असतं.

घरी आल्यावर तिला आपल्याला काय म्हणायचं आहे त्यावर विचार करायला थोडी उसंत मिळाली असती, तर त्यासाठी लागणारे शब्द तिला शोधता आले असते.

किशोरवयात होणारे बदल, त्यांच्याकडे बघण्याचा इतरांचा बदललेला दृष्टिकोन याविषयी आशूला माहिती असती, तर इतकं भांबावून न जाता या घटनेकडे तिनं थोड्या वेगळ्या नजरेनं पहिलं असतं.

आपल्या भावना ओळखून त्या योग्य शब्दांत मांडण्याचं कसब आशूकडे असतं, तर ती आईशी नीट बोलली असती.

अशा संवादांमध्ये पालकांची भूमिका काय?

पालकांना मुलांची काळजी वाटणं साहजिक आहे. ती काळजी मुलांची मनःस्थिती लक्षात घेऊन योग्य प्रकारे व्यक्त करणं.

त्यासाठी थोडा धीर धरणं. मुलांना शांत व्हायला वेळ देणं.

त्याही आधी आपल्या भावनांवर ताबा मिळवणं.

प्रतिक्रिया देण्याची घाई न करता शांतपणे ऐकून घेणं.

योग्य, उत्पादक संवाद कसा करायचा याचा नमुना मुलांसामोर ठेवणं.

या घटनांचा उपयोग करून आवश्यक ती खबरदारीची जाणीव मुलांमध्ये जागवणं.

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा हे बालगीत तुम्ही ऐकलंय का? त्यात ते प्राणी ठरवतात की आपल्या शेपटीचा काहीतरी वापर करत राहायला हवा, नाहीतर ‘दोन पायांच्या माणसागत आपली शेपूट उडून जाईल!’ तसंच आपल्याला मिळालेल्या संवाद कौशल्याच्या देणगीचा वापर आपण करत राहायला हवा, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा, नाहीतर तो नि:शब्द होऊन जाईल.

-----------------------

teenager require communication skill
Communication Skill : बोलताना या चुका दाखवतात तुमचा Low Confidence

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.