वसंत सरवटेकेवळ फडणीस फॅमिलीतला न् शाखा नायक म्हणूनच शिवराम गल्लीतच्या मुलांचा म्होरक्या होता असं नाही. त्याच्यात खरोखरीच नेतेपणाचे गुण होते. त्या वेळी सुप्त असतील; पण होते यात शंका नाही..शिवराम फडणीसचा व माझा परिचय किती लहानपणापासूनचा आहे याची प्रचिती परवा अगदी मजेशीर रीतीनं मला आली.काही कामासाठी कोल्हापूरला गेलो होतो. नेहमीप्रमाणं मामींना भेटायला माझ्या मामाच्या वाड्यात गेलो. गॅलरीत उभा होतो. तिथला गॅलरीचा कठडा असेल तीन सव्वातीन फूट उंच. एकदम विचार आला, आपण प्रथम या घरात राह्यला आलो तेव्हा याच गॅलरीतून बाहेर खाली पाहायला पाय उंचावायला लागायचे! फडणीसांचं बिऱ्हाड या वाड्यात आम्ही येण्यापूर्वीपासून होतं. शिवरामची ओळख तेव्हापासूनची.या माझ्या मामाच्या वाड्यात त्या वेळी दोन बिऱ्हाडं : एक आमचं, दुसरं फडणीसांचं.फडणीसांचं कुटुंब बरंच मोठं. भाऊ, बहिणी, चुलत भावंडं मिळून आठ-दहा माणसं. उलट आमच्या कुटुंबात चार माणसं. पैकी दोन लहान मुलंः मी व माझा लहान भाऊ, त्यामुळं सबंध वाड्यात फडणीस मंडळींचीच वर्दळ मोठ्या प्रमाणात असायची.मुलांचे काका गावी असायचे. त्यामुळे घरात राज्य मुलांचंच. सर्वात थोरले भाऊ कॉलेजमध्ये इंटरला असावे. शिवरामचे सर्व वडीलभाऊ संघात जायचे. सर्वजण शाखेचे महत्त्वाचे घटक होते. शिवरामसुद्धा. त्यामुळे घरात कायम संघाचं वातावरण असायचं.उत्कृष्ट कमावलेली शरीरयष्टी दाखवणारी, हात, दंड, मांड्या, पायातील पिळदार स्नायू दाखवणारी सँडोची वेगवेगळ्या पोजमधली छायाचित्रं माडीवरील खोलीच्या भिंतींवर ओळीने लावलेली होती.पहाटे उठावं, तालमीत जावं, जोर-बैठका माराव्या, कुस्त्या खेळाव्या, सुट्टीत पोहायला जावं. थोडक्यात, सँडो बनावं न् संध्याकाळी न चुकता शाखेवर जावं; चहा पिणं, सिनेमा पाहणं, कथा-कादंबऱ्या वाचणं म्हणजे शरीराची नासाडी अशी एकंदरीत शिकवण.मला या गोष्टीत जराही स्वारस्य नव्हतं. संध्याकाळी एकटं किंवा दोन-तीन मित्रांबरोबर भटकायला जावं, रंकाळ्यावर जाऊन सूर्यास्ताची शोभा पाहावी, गोष्टी वाचाव्या, ड्रॉइंग काढत बसावं यात माझं मन रमायचं. पण बहुसंख्य फडणीसमंडळींपुढं माझं चालायचं नाही. ही मंडळी मला संघात ओढून न्यायची.शिवराम शाखानायक वगैरे काहीतरी होता. त्यामुळं गल्लीतल्या बरोबरीच्या मुलांना नेमानं संघावर आणणं त्याला कर्तव्य वगैरे वाटायचं. आपण आपल्या बाजूनं कायम तयारीत असलं पाहिजे. शत्रूचा हल्ला कोणत्याही क्षणी होईल (शत्रू म्हणजे त्या वेळी आमच्या मनात औरंगजेब व त्याचं मोगल सैन्य असंच असे) न् शत्रूशी मुकाबला करायचा तर आपलं शरीर तगडं असलं पाहिजे.त्यासाठी प्रत्येकानं रोज तालमीत जायला पाहिजे; पोहायला शिकलं पाहिजे, असं तो गल्लीतल्या सर्व बालवीरांना पटवून देत असे. चहा पिण्याची, अर्थातच नेहमी टिंगल व्हायची, चहा पीत असताना हल्ला आला न् शत्रूनं पाठीवर लाथ मारली तर हातातली कपबशी किती लांब उडून पडेल याचं रसभरीत वर्णन व्हायचं.आजच्या वर जाऊ नका, खरंच सांगतो, पण त्यावेळी त्याची प्रकृतीही तशी गुटगुटीत होती (चहा पीत असूनही मी त्याच्याहून अधिक गुटगुटीत होतो, ते सोडा) शरीरानं चपळ होता, हुतूतू, खो खो वगैरे खेळांत इतर सर्वांपेक्षा कुशल होता, त्यामुळं सर्व बालवीर त्याच्या बाजूला असायचे. तो आमचा म्होरक्या होता. आताच्या भाषेत नेता.थोडक्यात, त्या वेळी तो आम्हा सर्वांना बाल शिवाजीच वाटायचा. उभा चेहरा, काहीसं वाजवीपेक्षा लांब नाक यामुळे दिसायलाही छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा (आम्हांला तरी त्या वेळी) वेगळा वाटत नसे! वयोमानाप्रमाणे अन् वेगळ्या तऱ्हेच्या आयुष्यक्रमामुळे त्याचं हे शिवरायांबरोबरचं शारीरिक साम्य आज मावळलं असलं, तरी त्याच्या भावंडांच्या कुटुंबातली पुढच्या पिढीतली मंडळी त्याला शिवबा म्हणून संबोधताना ऐकतो, तेव्हा लहानपणी आम्ही काही फार चुकत नव्हतो असा विचार मनात येऊन जातो!.शिवबा म्हणजे शिवरामभाऊ (किंवा शिवरामभावजी) याचं संक्षिप्तीकरण आहे असं त्यांच्यापैकी कोणीतरी स्पष्टीकरण करील. पण तो भाग, अर्थातच, वेगळा!ते काहीही असो, मला मात्र आजही वाटतं, की शिवराम संघात राहिला असता तर आज भाजपाचा महत्त्वाचा नेता, आमदार, खासदार काहीतरी नक्की झाला असता!पण तसं व्हायचं नव्हतं, कोल्हापुरातील संघनेत्यांत काहीतरी बेबनाव झाला न् सर्व फडणीस बंधू संघाबाहेर पडले. त्याबरोबर शिवरामही.केवळ फडणीस फॅमिलीतला न् शाखा नायक म्हणूनच शिवराम गल्लीतच्या मुलांचा म्होरक्या होता असं नाही. त्याच्यात खरोखरीच नेतेपणाचे गुण होते. त्या वेळी सुप्त असतील; पण होते यात शंका नाही.शिवरामचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखीही एका कारणासाठी त्या वेळी जोडलं गेलं होतं. दरवर्षी शिवजयंतीला आमच्या जैन गल्लीतली मुलं शिवजयंती उत्सव साजरा करायची. आमच्या वाड्यातली गॅलरी बरीच लांब व रुंदही होती.तिथं शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना व्हायची. किल्ल्याचा देखावा मांडला जायचा. आरास व्हायची. दोन दिवस मग करमणुकीचे कार्यक्रम व्हायचे. या सर्वात महत्त्वाचा भाग शिवरामचा असायचा. शिवाजी महाराजांचा शाडूचा पुतळा बनवायचं काम त्याच्याकडं असायचं. आधी आठवडा मेहनत घेऊन तो ते पुरं करायचा.किल्ल्याच्या आराशीसाठी इतर मुलांकडून त्याच्या मार्गदर्शनाखाली कामं करून घेतली जायची. शिवाय करमणुकीचे कार्यक्रम बसवून घ्यायचं काम त्याच्याकडे असायचं. तो स्वतः उत्तम नकला करी. या नकलांना मुलांप्रमाणं वडील मंडळींकडूनही वाहवा मिळे.शिवरामच्या ह्या हरहुन्नरीमुळे त्याची संगत सर्व मुलांना हवीहवीशी वाटे.म्हणून तालमीत जाण्यासाठी म्हणून पहाटे उठवायला यायचा किंवा पोहायला शिकवायला म्हणून बळेबळे कोटीतीर्थावर ओढून न्यायचा तेव्हा, मला तो कटकट वाटायचा, मनात राग यायचा; संघाच्या विषयावर बोलायला लागला की कंटाळा यायचा, तरी सुद्धा त्याच्या गमत्या स्वभावामुळं अन् त्यालाही असलेल्या ड्रॉइंगच्या आवडीमुळं त्याच्याशी माझं चांगलं जुळत असे.शिवराम माझ्याबरोबरीचा असला तरी आम्ही एका वर्गात कधीच नव्हतो. त्याचं लहानपण खेड्यात गेल्यामुळं तो व्हर्नाक्युलर फायनल होऊन इंग्रजी शाळेत आल्यामुळे माझ्या एक वर्ष मागं होता. आमच्या शाळाही बरीच वर्षे वेगवेगळ्या होत्या. पण ड्रॉइंगच्या नादानं आम्ही नेहमी बरोबर असायचो. आम्हा दोघाहीसमोर आर्टिस्ट व्हायचं स्वप्न होतं. आमच्या डोळ्यांपुढं आदर्श होते त्या वेळी कोल्हापुरात असलेले कलामहर्षी बाबुराव पेंटर.शिवरामच्या आधी एक वर्ष मी मॅट्रिक झालो. आर्टिस्ट होऊन पोटाला काय खाणार या घरच्यांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यानं मी राजाराम कॉलेजमध्ये सायन्स साईडला नाव घातलं. पुढं पुण्याला येऊन इंजिनिअर झालो. शिवराम माझ्यामागून एक वर्ष मॅट्रिक झाला.आर्टिस्ट व्हायचं म्हणजे एक बाबुराव पेंटरांसारखं पोर्ट्रेट रंगवून श्रीमंतांच्या लहरीवर जगायचं किंवा दुसरं साइनबोर्ड पेंटर होऊन दुकानाच्या पाट्या रंगवायच्या ही दोनच टोकं आहेत असं नाही, त्याशिवायही इतर सन्मान्य पर्याय उपलब्ध आहेत हे त्याला त्याच्या घरच्यांना पटवणं शक्य झाल्यानं तो मुंबईला जे.जे. स्कूलमध्ये गेला, तेथून त्यानं कमर्शिअल डिप्लोमा घेतला.खरं म्हणजे इथं आमचे मार्ग भिन्न झाले होते. त्याच सुमारास त्याचं बिऱ्हाडही आमच्या वाड्यातून दुसरीकडे गेलं होतं. आमची कार्यक्षेत्रं वेगळी होती. मुंबईतलं शिक्षण पुरं झाल्यावर तो व्हाया कोल्हापूर पुण्याला येऊन स्थिर झाला.मी मुंबईत. त्यामुळं नियमित भेट होण्याची शक्यता अजिबात नव्हती. मी माझ्या इंजिनिअरिंगच्या नोकरीत संपूर्णपणे गुंतून पडलो असतो तर एक लहानपणीचा खूप जवळ आलेला मित्र, ज्याची केव्हा केव्हा आठवण येते एवढेच त्याचं माझ्या मनातलं अस्तित्व राहिलं असतं.पण चित्रकार होण्याचं माझ्या मनातलं लहानपणीचं स्वप्न पूर्णपणे पुसलं गेलं नव्हतं. चरितार्थासाठी सिमेंट, वाळू, खडी इ. हाताळाव्या लागत होत्या तरी मी हातातून रेषा निसटू दिली नाही. ह्या रेषेनंच आम्हा दोघांना आजतागायत एकत्र बांधून ठेवलं आहे.लहान असताना शरीर सुदृढ करण्यासाठी त्यानं मला शिस्त लावण्यासाठी केलेला आटापिटा हा आजचा आमचा कायमचा चेष्टेचा विषय झाला आहे. आजच्या आमच्या शरीरयष्टी पाहून कोण कुणाला शिस्त लावायला पाहत होतं असा पाहणाऱ्याला प्रश्न पडेल!.मुंबईत शिवराम शिकत होता ते महायुद्धाचे दिवस होते. जागेची प्रचंड अडचण, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा. राहायचं एके ठिकाणी, जेवायचं दुसरीकडे, कॉलेज तिसरीकडे यामुळे जी दगदग करावी लागे त्यामुळे त्याची प्रकृती खालावली ती काही पूर्ववत झाली नाही. पोटाची तक्रार कायम मागं लागली. एकवेळ जेवण घ्यायचं. त्यामुळं शरीराची यष्टीच झाली यात नवल काय?आता शरीराचा बारीकपणा काही सुधारणं शक्य नाही. त्याचा वचपा म्हणून आपल्या चित्रात तो जाड रेषा वापरतो का? असा प्रश्न त्याला इतर विचारू शकतील. मी नाही. कारण मग माझ्या चित्रातील बारीक रेषेचं काय असा प्रश्न माझ्या शरीरयष्टीकडे पाहून तो मला विचारू शकेल!चित्रातील रेषेच्या बारीक जाडपणाशी चित्रकाराच्या स्वतःच्या शरीरसंपदेचा कितपत संबंध आहे मला माहीत नाही. कदाचित एखादा मानसोपचारतज्ज्ञ त्यासाठी फ्रॉईडियन स्पष्टीकरण देईलही. पण चित्रांचे विषय, ते मांडण्याची शैली ह्यांचा मात्र निश्चित संबंध चित्रकाराच्या व्यक्तिमत्त्वाशी आहे असं मी म्हणतो तेव्हा आजपर्यंत कुणाला न समजलेले सत्य मी सांगतो आहे, असं मुळीच नाही. पण शिवरामच्या बाबतीत तो अधिक नितळ आणि पारदर्शक आहे हे मात्र नक्की.शिवरामचं एक चित्र आहे. एक गृहस्थ रेडिओवर (आपल्या स्वतःच्या घरातील!) क्रिकेटच्या बॅटनं त्वेषानं प्रहार करतो आहे. कारण रेडिओवर चाललेलं शास्त्रोक्त संगीत एवढं भिकार आहे की त्यानं त्याचं डोकंच गेलं आहे.या प्रहारामुळं रेडिओ दुभंगला आहे न् त्यातून गाणाऱ्या बुवांची प्रतिमा बाहेर पडून उर्ध्व दिशेने (स्वर्गाच्या?) चालली आहे. हेच ते गाणारे बुवा कशावरून? कारण पहा ना, त्यांच्या डोक्यावर टेंगुळ आहे!हेच चित्र मला का आठवलं? कारण या चित्राची जात शिवरामच्या इतर चित्रांपेक्षा वेगळी आहे. कदाचित या प्रकारचं हे त्याचं एकुलतं एकच चित्र असेल. या चित्रात दिसणारा हिंसाचार त्याच्या चित्रांतून जवळजवळ कधीच नसतो.या चित्रातसुद्धा जो दाखवला आहे तोही खोटाखोटाच (Mock) आहे. हे चित्रातल्या गृहस्थाकडे पाहिल्यावर जाणवतं. गृहस्थ बालसदृश्य आहे. त्याचा रागही लहान बालकाला यावा तसाच आहे. त्यामुळे त्याचं रेडिओवर प्रहार करणं हिंसक वाटण्याऐवजी गमतीदार वाटतं.खरं म्हणजे, असा बालसदृश्य हिंसाचारसुद्धा शिवरामच्या चित्रातून कधी असत नाही. चित्रात असतो खोडकरपणा, सौम्य टवाळी; सुखवस्तू, सुसंस्कृत, मध्यमवर्गीय कुटुंबीयांत खपून जाईल अशी. शिवरामच्या चित्रातलं सगळं जग सुंदर आहे.गृहिणी देखणी आहे. शिडशिडीत, प्रमाणबद्ध बांध्याची, भरपूर केशसंभार असलेली, ना.सी. फडक्यांची नायिका शोभेल अशी. गृहस्थ फडक्यांचे नायक शोभतील असे, तरुण न् रुबाबदार. काही काहीवेळा ही गृहिणी जाडजूड असते, किंवा नायकाला टक्कल असते; पण हे जेव्हा विनोद बाईच्या जाडपणावर किंवा बुवाच्या टकलावर असतो तेव्हा न् या गोष्टी दाखवणं अटळ असतं तेव्हा. एरवी बेढब गोष्टींना या जगात प्रवेश नाही.बालकं सगळी गोजिरवाणी, ही खोड्या करतात. पण त्या तापदायक असण्यापेक्षा गमतीदार असतात. या खोड्यांमुळे त्यांचे आईबाबा चिडत नाहीत; उलट त्यांची करमणूक होते. त्यातील दुकानदार गिऱ्हाइकांना गमतीदारपणे फसवतात. नवरा-बायको एकमेकांची चेष्टा करतात पण माफक. संसारात संकटं येतात, पण फार मोठी, न पेलणारी नव्हे.माफक. ज्यामुळे गंमत वाटेल, संसाराची खुमारी वाढेल अशी. थोडक्यात, शिवरामच्या चित्रातल्या जगातली माणसं साधी, सुसंस्कृत, निर्मळ आहेत. त्यात दुष्ट, क्रूर, सुडानं पेटलेली, खडूस, विध्वंसक माणसं औषधालाही आढळणार नाहीत.चित्राची रेखाटनाशैलीही या जगाला सुसंगत अशीच आहे. जरूर तेवढाच तपशील. चित्रातून म्हणायचं आहे ते पाहिल्याबरोबर, बिनचूकपणे पाहणाऱ्याच्या ध्यानात येईल अशी चित्रातील मांडणी आणि डोळ्याला आल्हाद देईल अशी रंगरचना.सर्वसाधारण परंतु सुसंस्कृत प्रेक्षकांच्या अनुभव- विश्वातली, पाहिल्याबरोबर त्याच्याशी सुसंवाद साधू शकेल अशी कल्पना न् ती डोळ्यांतून आल्हाददायकपणे त्याच्यापर्यंत पोहोचवणारी प्रत्ययकारी शैली यामुळं शिवरामच्या चित्रांना कोठेही तात्काळ प्रचंड प्रतिसाद मिळतो. अक्षरशः आबालवृद्धांचा.आपल्या व्यंगचित्रांसाठी आजुबाजूच्या परिसरातून शिवराम कल्पना शोधतो हे मी पाहतो तेव्हा विद्यार्थिदशेत त्यानं आणि मी सकाळच्या कथास्पर्धेसाठी कथा पाठवल्या होत्या त्याची आठवण येते. त्या वयातल्या पोर उत्साहानं आम्ही दोघांनीही एकेक कथा पाठवली. आमच्या कथांना बक्षीस सोडाच पण त्यांचा उल्लेखनीय म्हणूनही निर्देश झाला नाही, हे वेगळं.पण आपल्या कथेसाठी त्यानं त्याच्या लहानपणीच्या भोज या खेडेगावातील, अचानक आलेल्या पावसामुळं भिजून स्वतःचे तंबाखूचं पीक निकामी झाल्यामुळं होणारं नुकसान सहन न करता आल्यामुळे गळफास लावून घेतला होता, ती हकीगत वापरली होती. हे आठवतं तेव्हा त्यामध्ये नंतरच्या सभोवतालमधून कल्पनाबीज शोधण्याच्या पद्धतीची लहानपणातील चाहूल मला दिसते.गेल्या वर्षी शिवरामचं दादरला प्रदर्शन भरलं होतं. तेव्हा ते पाहायला सर्वाबरोबर माझी त्या वेळी तीन वर्षाची असलेली नात अश्विनीलाही नेलं होतं. सर्व चित्रं समजण्याचं काही तिचं वय नव्हतं. तरीसुद्धा तिच्या पद्धतीनं तीन-चार चित्रांमुळं तिला मजा वाटली.कटपीसवाला दुकानदार गिऱ्हाईक बाईच्या साडीचा तुकडा कापतो आहे ते न् अर्धपुतळ्याचे दात फरशी धुणारी बाई मोरी साफ करण्याच्या ब्रशने घासते आहे ते, ही दोन तिच्या चांगलीच लक्षात राहिली आहेत. इतकी की फडणीसकाका म्हटलं, की दात घासायचा अभिनय करून दाखवते..शिवरामनं आपल्या रंगीत हास्यचित्रांची ‘हसरी गॅलरी’ ज्या ज्या ठिकाणी नेली त्या त्या ठिकाणी तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अक्षरशः हजारो प्रेक्षकांनी रांगा लावून तिचा आनंद घेतला.इतक्या लोकांना एकावेळी एवढा निखळ आनंद देणारं निर्मल पात्रांचं जग शिवराम कसं निर्माण करू शकला? मला वाटतं, त्यासाठी कलावंताचं मनही तेवढंच निर्मळ हवं. निदान मनाचा एखादा भाग तरी तेवढाच निर्मळ असल्याखेरीज हे शक्य होणार नाही.लहानमोठ्या अडचणी, संकटं, येतच असतात. शिवरामही काही त्याला अपवाद नाही. पण अशा प्रसंगी त्याचं वागणं त्याच्याच पात्राप्रमाणं असलेलं मी पाहिलं आहे. चिडून बोलणारा, प्रचंड संतापलेला, मुलांवर रागावणारा, विध्वंसक मुडमध्ये असा शिवराम मला आठवत नाही.आज मागं वळून पाहताना मला वाटतं, की या खुणा त्याच्या लहानपणीच्या सुप्त वाटणाऱ्या वैशिष्ट्यांत शोधता येण्यासारखा आहेत. आजूबाजूचं डोळस निरीक्षण करण्याची, विसंगती पाहण्याची, इतरांच्या लकबी शोधून त्या लोकांना पटेल असा पद्धतीने हुबेहूब उतरवून प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं कौशल्य लहानपणाच्या नकलाकार शिवराममध्ये पाहता येतं तर सर्वांना सांभाळून घेऊन कामाला लावण्याच्या पण जरूर असेल तर कणखर निर्णय घेऊन कृती करण्याच्या वृत्तीचं मूळ लहानपणच्या 'बालशिवाजी'त शोधता येईल.त्याचप्रमाणं एरवी अवघड वाटणाऱ्या गोष्टी अगदी सर्वांना समजतील अशा भाषेत सोप्या करून सांगण्याची हातोटी रक्तातच नेत्यापाशी असावी लागते. ती शिवरामकडे आहे याची त्याची हास्यचित्रं ही जशी ठळक साक्ष आहे तशीच गणित, व्यवस्थापन इत्यादींसारख्या सर्वसामान्यांना फारशा सुगम न वाटणाऱ्या पुस्तकांसाठी त्यानं जी रेखाचित्रं तयार केली आहेत तीही आहेत.म्हणून तर 'पुणे आर्टिस्ट गिल्ड'सारख्या कलावंतांच्या संस्थेचं सेक्रेटरीपद काही वर्षं तो सांभाळू शकला न् कार्टूनिस्ट कंबाईन या व्यंगचित्रकारांच्या संस्थेचं पुण्यातलं सम्मेलन कोणतेही गंभीर मतभेद न होता न् तरीही व्यंगचित्रकलेविषयी उचित समज सामान्य रसिकापर्यंत पोहोचवण्याची खबरदारी घेत पार पाडू शकला.सर्वांना सांभाळून घेण्याच्या, मिळून मिसळून वागण्याच्या त्याच्या वृत्तीबरोबरीनंच त्याच्या मनाचा एक कप्पा कायम जागरूक असणारा असा आहे, ज्यामुळं न्याय-अन्याय, योग्य-अयोग्य यातून योग्य निवड करून ठाम निर्णय घेऊन त्याला कणखरपणे चिकटून राहण्याची शक्ती त्याला लाभलेली आहे.काही वर्षांपूर्वी त्याच्या असं लक्षात आलं, की एखाद्या विशिष्ट कामासाठी करून दिलेली चित्रं काही काही प्रकाशक परस्पर, चित्रकाराला न कळवता, दुसऱ्या गिऱ्हाईकाला (जे प्रकाशकच असेल, असंही नव्हे) वापरायला देत आहेत. यात दोन तऱ्हेचं नुकसान होतं. पहिलं म्हणजे आर्थिक. पण त्याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे ह्या दुसऱ्या गिऱ्हाईकाशी चित्रकाराचा काहीच संपर्क नसल्यानं ते कोणीही असू शकेल न् ते चित्राचा अयोग्यही वापर करू शकेल.शिवरामनं मग चित्रकाराच्या कॉपीराईट कायद्याचा कसोशीनं अभ्यास केला, चित्रकाराचे कायद्यात मिळालेले कोणते अधिकार आहेत हे ठामपणे समजून घेतलं आणि त्यानुसार वकिलाच्या सल्ल्यानं गैरवापर करणाऱ्या प्रकाशकांना नोटीसा पाठवल्या. त्यामुळे पुण्यातील प्रकाशकवर्गात खळबळ माजली. फडणीस हा कोणी शायलॉक अवतरलाय असं बोललं जाऊ लागलं.पण त्यातले न्याय-अन्याय जाणणारे, जे प्रकाशक होते त्यांनी त्याची बाजू न्यायाची आहे हे जाणलं व त्याचं म्हणणं मान्य केलं. इतर जणांनाही मग मान्यता द्यावीच लागली. आज चित्रकारांचा कॉपीराईट मान्य केला जात आहे. त्याला शिवरामनं केलेली कृती कारण आहे हे विसरता कामा नये.पुष्कळवेळा या ना त्या कारणानं माझं पुण्याला जाणं होतं. बहुतेकवेळा मी शिवरामकडेच उतरतो. त्याच्या लीना व रूपा या दोन्ही मुली लग्न होऊन सासरी गेल्या आहेत. घरी सौ. शकुंतलावहिनी व शिवराम दोघंच असतात. त्या वेळी खूप गप्पा होतात. लहानपणीच्या आठवणी निघतात. हास्यविनोद होतो. चित्रकला, साहित्य या विषयांवर गप्पा होतात.त्याच्या घरातल्या अनेक वस्तू त्याच्या चित्रात आल्या आहेत. त्या कोणाच्याही लक्षात येण्यासारख्या आहेत. मला मात्र वस्तूबरोबरीनंच त्याच्या चित्रातील वातावरण आहे ते त्याच्या घरातून आलं आहे असं नेहमी वाटतं. विशेषतः लीना किंवा रूपा सहकुटुंब- सहपरिवार त्याच्या घरी येतात तेव्हा तर ते विशेष लक्षात येते.(बत्तिशी या नियतकालिकाच्या १९९०च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला व्यंगचित्रकार, लेखक वसंत सरवटे (१९२७-२०१६) यांचा हा लेख ऑक्टोबर २००५मध्ये मॅजेस्टिक प्रकाशनाच्या सहप्रवासी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. हा लेख पुन्हा प्रसिद्ध करण्यास अनुमती दिल्याबद्दल वसंत सरवटे यांच्या कन्या मंजिरी सरवटे यांचे आभार. -संपादक)--------------------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.