डॉ. श्रीकांत कार्लेकर
भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेने विज्ञान जगताला एक नवी दिशा दाखवली आहे आणि भविष्यातील संशोधनासाठी एक मजबूत आधारही दिला आहे. चंद्राची निर्मिती पृथ्वीपासूनच झाली आहे का, हे शोधण्यासाठी जे संशोधन चालू आहे त्यालाही या नवीन शोधामुळे चालना मिळेल हेही तितकेच खरे!
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान-३ मोहिमेतून मिळालेल्या नवीन माहितीमुळे चंद्राच्या निर्मितीबाबतच्या ‘चंद्रावरील शिलारस किंवा लाव्हा रसाचा महासागर’ (Lunar Magma Ocean) या सिद्धांताला बळ मिळाले आहे.
वैज्ञानिकांच्या मते चंद्राचा दक्षिण ध्रुव कधीकाळी तरल अशा वितळलेल्या अग्निज खडकाच्या समुद्राने आच्छादित होता, चंद्राच्या अंतरंगात आणि पृष्ठभागावर फक्त शिलारसच होता. या अवस्थेला ‘शिलारसाचा महासागर’ असे म्हटले जाते.
अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या (PRL)शास्त्रज्ञांनी प्रज्ञान रोव्हरवरील उपकरणांच्या साहाय्याने केलेले हे संशोधन अलीकडेच नेचर या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले आहे.