डॉ. राजेंद्र गोणारकर
आत्मटीकेचा उद्देश समाजाची कमजोरी दाखवणे असा नसून, त्यांना त्यांच्या त्रुटींची जाणीव करून देणे हा आहे. आत्मटीकेतून दलित कवितेला अधिक संघर्षशील आणि आत्ममूल्य वाढवणारी दिशा मिळाली. ही कविता विसंगतींवर विचार करण्याची प्रेरणा देते आणि त्यातून सामाजिक सुधारणेचा मार्ग शोधण्याची अपेक्षादेखील व्यक्त करते.
विद्रोह ही एक जाणीव आहे. तिचे स्वरूप विविधांगी आहे. एका परंपरेविरुद्ध दुसरी एखादी परंपरा विद्रोह करू शकते. दुष्टांविरुद्ध त्याहून अधिक दुष्टावा हा एका अर्थाने विद्रोह ठरू शकतो. म्हणून विद्रोहाच्या मुळाशी कोणती मूल्ये आहेत आणि त्यांचा विद्रोह कोणती व्यवस्था आणि कोणत्या मूल्यांना नकार देतो, यावरून त्या विद्रोहाची पातळी आणि परिणामकारकता तपासता येते. या पार्श्वभूमीवर दलित चळवळ आणि दलित कवितेने उभ्या केलेल्या विद्रोहाची महती समजून घ्यावी लागते.