माधव गोखले
बै... बै...बै... बै... बाऽऽ ई... थोडं लक्ष नाहीसं दिसलं ना की मांडलाच यानी फराळ... अहो हाताला लागेल असं काही ठेवायची सोय नाही... लाडू म्हणू नका, चकल्या म्हणून नका... देवाला नैवेद्य दाखवण्याइतकाही धीर नाही मेल्याला...
माझ्या पिढीतल्या बऱ्याचजणांना ‘फराळ’ या शब्दाची चांगली ओळख व्हायची ती घरातली एखादी आजी, किंवा घरातल्या जावांच्या हिशेबात ज्येष्ठ असणाऱ्या सूनबाईंच्या या अशा करवादीतून.
या वाक्याचा सूर करवादीचा, त्राग्याचा असला तरी त्या वाक्यामागे असायचं ते अमाप कौतुक, जिव्हाळा, प्रेम... खरंतर या त्र्याग्याचा धनी झालेल्यानं; निगुतीनं, सणासुदीसाठी म्हणून मोठा घाट घालून रांधलेल्या एखादा जिनसेचा –घरातल्या कर्त्या सुगरणींच्या डोळ्याआड –एकट्यानेच (अक्षरशः) फन्ना उडवलेला असायचा.
आणि घरातल्या सुगरणीवर पुन्हा पहिल्यापासून सगळी मांडामांड करण्याची वेळ आणलेली असायची. पण तरीही अशा ह्या त्राग्यामागे कौतुक असतं, कारण तो तसा मांडलेला फराळ ही एका अर्थानं सुगरणीच्या हातच्या चवीला दिलेली पावतीच असते.