डॉ. आशुतोष जावडेकर
भाग १ :
उत्तम विनोद - मग तो इंग्रजी असो वा मराठी - मन एकदम निर्मळ करून जातो. आपण फक्त थोडं मोकळं राहून वाचायचं असतं, आणि बिनधास्त हसायचं असतं.
कुठल्याही भाषेची खरी ताकद ही त्या भाषेतील विनोदामध्ये आढळते. विनोद ही मानवी मनाची महत्त्वाची प्रेरणा असल्यामुळे सगळ्या भाषांमध्ये या ना त्या पद्धतीने विनोद उतरावा यात काही आश्चर्य नाही. पण तरीही प्रत्येक समाजानुसार त्या विनोदाची धाटणी आणि मांडणी बदलत असते. त्यामुळे काही भाषांमध्ये काळाच्या ओघात विनोदी साहित्य अधिक परिपक्व झालेले आढळते.
इंग्रजीमध्ये तर विनोदी साहित्याची फार मोठी परंपरा आहे. आणि आपण जेव्हा इंग्रजी नव्यानं वाचत असतो आणि मोठ्या हौसेनं एखादं विनोदी पुस्तक वाचायला घेतो, तेव्हा कधीकधी तीन-चार पानं उलटून गेली तरी एकही विनोद कळत नाही.
मग तो विनोद नक्की काय होता हे समजून घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि विनोदाचा अभ्यास हीदेखील एक अंमळ विनोदीच घटना असते! पण जर आपल्याला इंग्रजीमधील विनोदाचा आस्वाद आयुष्यभर घ्यायचा असेल तर सुरुवातीच्या अभ्यासाला पर्याय नाहीच.
साहित्याच्या वर्गांमध्ये सहसा जुन्या काळापासून नव्या काळापर्यंत साहित्य शिकवतात. आपण मात्र इंग्रजीमधील विनोद हा आत्ताच्या काळापासून मागं जात बघूया. कारण आजच्या लेखात मी एकदम शेक्सपिअर साहेब घेतले, तर या लेखाची पानं पटापट नुसती उलटून तुम्ही साप्ताहिक सकाळमधील उर्वरित लेखांचा आस्वाद घ्यायला जाणार याची मला कल्पना आहे! आता याच्यापुढे एक मी स्मितचिन्ह - इमोजी ठेवली आहे असं समजा!