नेहा लिमये, पुणे
मानवी मनाच्या भाव-भावनांचं सुरम्य चित्रण करणाऱ्या गोष्टी आणि बोलगाणी लोकसंगीताची धारा अखंड वाहती ठेवतात. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीताशी छंदोबद्ध धाग्यांनी आपल्याला ओवून देतात. हा अनुबंध उत्सवी रंगांशी, ऋतुछटांशी, वाद्यसंगीताशी, नृत्यरूपांशीही सांधलेला आहे.
गोष्ट सांगणं आणि ऐकणं आवडत नाही असा माणूस विरळाच. गोष्टीतल्या शब्दांना सुरांची, ठेक्याची जोड मिळाली की गोष्ट गाऊही लागते. या संदर्भात सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार सांगतात ते मला फार भावतं.
ते म्हणतात, ‘मी संगीतकाराच्या वेषातला गोष्टाड्या आहे. गाणं रचणं म्हणजे त्यातल्या शब्दांना संदर्भ देणं.’ शब्दातले चढ-उतार, भाव सुरांच्या माध्यमातून पोहोचवणं म्हणजे एका अर्थी गाण्यातून गोष्ट सांगणंच! त्यातून गोष्टीतले शब्द आपल्या रोजच्या जगण्यातले असतील, त्याला आपल्या मातीचा, भाषेचा, भवतालाचा गंध असेल, तर ती आणखी जवळची वाटू लागते.
अगदी पांडुरंगाच्या आरतीतलं ‘आषाढी कार्तिकी भक्तजन येती’ घ्या किंवा ‘कारल्याची भाजी कर गं सूनबाई’ हे हादग्याचं गाणं घ्या, त्यातून सतत ‘काहीतरी’ घडत असतं, त्याची चित्रभाषा डोळ्यांसमोर येते.