Food Point: उरलेल्या फराळाचे स्वादिष्ट पदार्थ
वैशाली खाडिलकर
बटरी बैंगन बॉम्ब्स
वाढप
२ व्यक्तींसाठी
साहित्य
बैंगन बॉम्ब्ससाठी : दोन कप भाजलेल्या वांग्याचा लगदा, एका हिरव्या मिरचीचे तुकडे, २ लसूण पाकळ्या, १ आले तुकडा, १ बारीक चिरून तळलेला कांदा, पाव कप तिखट शेवेचा चुरा, १ टीस्पून धने-जिरे पूड, २ टीस्पून आमचूर पावडर, चिमटीभर मिरपूड, मीठ स्वादानुसार, १ टीस्पून भाजलेले बेसन, प्रत्येकी १ टीस्पून तूप-कोथिंबीर-पुदिना, ब्रेडक्रम्ब्स गरजेप्रमाणे, तळण्यासाठी तेल, १ पेटता कोळसा.
ग्रेव्हीसाठी : एक टीस्पून तेल, पाव टीस्पून जिरे, १ लहान बारीक चिरलेला कांदा, २ लसूण पाकळ्या, १ आले तुकडा, एका हिरव्या मिरचीचे तुकडे, एका काश्मिरी मिरचीचे तुकडे, २ बारीक चिरलेले टोमॅटो, ४ ते ५ काजूंचे तुकडे, मीठ, पाणी, प्रत्येकी १ टीस्पून गरम मसाला-तिखट-तेल-बटर-धने पूड-साखर, २ टीस्पून फ्रेश क्रीम, कोथिंबीर, कसूरी मेथी, कॉर्नफ्लोअर पेस्ट.
कृती
बैंगन बॉम्ब्ससाठी : सर्वप्रथम स्टीलच्या वाडग्यात बैंगन बॉम्ब्ससाठी दिलेले सर्व जिन्नस एकजीव करावेत. नंतर या मिश्रणात मधोमध एक वाटी ठेवावी त्यात कोळसा ठेवून वरून तूप घालावे व झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी झाकण काढावे. हे बॉम्ब्सचे मिश्रण तयार झाले.
ग्रेव्हीसाठी : सर्वप्रथम गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये तेल तापवून त्यात जिरे, कांदा, टोमॅटो इत्यादी ग्रेव्हीकरिता दिलेले सर्व जिन्नस घालून ५ मिनिटे परतून नंतर पाणी घालून ५ मिनिटे शिजवावे. मिश्रण थंड झाले त्याची की मऊसर पेस्ट करावी. नंतर गॅसवर कढईत तेल व बटर घालून त्यात तिखट, धने-जिरे पूड घालून हलकेसे परतावे. त्यात पेस्ट घालून ५ मिनिटे शिजवावे. नंतर साखर, मीठ, गरम मसाला, कसूरी मेथी, फ्रेश क्रीम घालून २ मिनिटे परत शिजवावे. नंतर कोथिंबीर घालून मिश्रण थंड करावे. ट्रेमध्ये बटर पेपर लावून त्यात ग्रेव्ही ओतावी व फ्रीजमध्ये ५ तास ठेवावी. थंड ग्रेव्ही मिश्रणाचे चौकोनी तुकडे करावेत. नंतर हाताला तेल लावून तयार वांगे मिश्रणाचा एक गोळा घेऊन त्याची पारी करावी व त्यात ग्रेव्हीचा तुकडा भरावा व पारी मिटवावी (बॉम्ब्स तयार). नंतर कॉर्नफ्लोअर पेस्टमध्ये बुडवून ब्रेडक्रम्ब्समध्ये मिश्रणाचा गोळा घोळवावा. असेच बाकीचे करावेत व तेलात खरपूस तळून प्लेटमध्ये पेपर टॉवेलवर काढावेत. चहा-कॉफीबरोबर सर्व्ह करावेत.