वर्षा गजेंद्रगडकर, पुणे
प्राचीन भारतीय समाज निसर्गाशी जवळीक साधत जगला आहे. भारतीय हस्तकला आणि निसर्ग यांचा तर खूप जवळचा संबंध. स्थानिक निसर्गाचं प्रतिबिंब हस्तकलेत दिसतं. निसर्गात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम हस्तकलांवर होतो आहे. मात्र, हवामान बदलांमुळे या हस्तकलांच्या भवितव्यावर संकट ओढवलं आहे.
चीन भारतीय समुदाय नेहमीच पृथ्वीशी, तिच्या पर्यावरणाशी जवळीक साधणारं आयुष्य जगत आले आहेत. भोवतालच्या परिसंस्थांशी या समुदायांचं जे नातं होतं, त्यातूनच त्यांची संस्कृती आकार घेत गेली. भारतीय कला आणि हस्तकला यांचं अस्तित्व, रूप आणि त्यांच्या निर्मितीमागचं तत्त्वज्ञानही निसर्गावरच अवलंबून आहे.
कित्येक शतकांपासून, त्या त्या ठिकाणचा निसर्ग स्थानिक समुदायांच्या कलादृष्टीला चेतना देत गेला आणि त्यातून रोजच्या जगण्यासाठी उपयुक्त ठरणारे, काही पारंपरिक विधिविधानांच्या गरजा भागवणारे कलाप्रकार उत्क्रांत होत गेले. आज एकविसाव्या शतकातही, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या हस्तकलांच्या अनेक प्रकारांमधून निसर्ग, पर्यावरण आणि भारतीय कलाविश्व यांचं परस्पर नातं पुरेसं स्पष्ट होताना दिसतं.
भारतातल्या हस्तकलांचा वारसा आजही सृष्टीशी स्वतःचं स्वतंत्र नातं टिकवून आहे. त्यामुळेच परिसंस्थांमधले लहानसे बदलसुद्धा हस्तकला उद्योगावर आणि त्या त्या प्रांताच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीवर लक्षणीय परिणाम घडवू शकतात. भारताच्या विविध भागातल्या हस्तकला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
आपलं अस्तित्व आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यासाठी त्या त्या प्रांतातल्या नैसर्गिक साधनांवर अवलंबून आहेत. प्रांत कुठलाही असो, तिथल्या पारंपरिक जीवनपद्धती स्थानिक निसर्गात इतक्या मिसळून गेलेल्या आहेत, की पर्यावरणाचा सातत्यानं होणारा ऱ्हास आणि स्थानिक कारागिरांपुढे उभं राहिलेलं संकट याचाही एक समांतर आलेख गेल्या दोन दशकांपासून अधिक स्पष्ट झालेला दिसतो आहे.