ले. ज. विनायक पाटणकर (निवृत्त)
अखेर गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. दिनक्रम पुरा करून दुपारी आमच्या ढोल आणि ताशांच्या गजराने सर्व रेजिमेंटचा परिसर भरून टाकला! अनेक जण प्रथमच लेझीमच्या तालबद्ध हालचाली बघत होते आणि वाद्यांच्या ठेक्यांनी प्रोत्साहित होऊन त्यातले काही मिरवणुकीत सामीलही होत होते.
महाराष्ट्रात अनेक उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी काही सार्वजनिक, तर काही घरगुती पद्धतीने साजरे होतात. गणपती उत्सव हा असा एक उत्सव आहे जो घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही पद्धतीने अतिशय उत्साहाने साजरा होतो. गणेशोत्सवाची तयारी दोन अडीच महिने आधीपासूनच सुरू होते आणि अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत तो उत्साह कायम असतो. हे सगळं आपण वर्षानुवर्षे अनुभवत आलो आहोत. पण जी मराठी माणसं महाराष्ट्रात नसतात अशांचं काय? उदाहरणार्थ, देशाच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक हा उत्सव कसा साजरा करतात?