मंगला गोडबोले
लग्नावलोकन करताना सतत एकच गोष्ट अंतिमतः विश्वासाची, भरवशाची वाटते, समारंभ कोणत्याही स्तरावरचा होवो, नात्यामध्ये पती-पत्नी, वरपक्ष-वधूपक्ष हे समान स्तरावर उभे राहतील, समोर येणाऱ्या आनंदाचे, आव्हानांचे समान हक्कदार ठरतील तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘तदेव लग्नम् सुदिनम् तदेव’ असं म्हणता येईल.
‘‘बाकी काही म्हणा हं, जोश्याने पोरीच्या लग्नाचा बार जोरदार उडवून दिला की!’’
‘‘बार म्हणा तुम्ही. पण पंगतीच्या जेवणात काही दम नव्हता म्हणण्यासारखा! शिवाय जावयाची नोकरी टेंपरवारी आहे, असं आलंय इकडून तिकडून कानावर! टेंपरवारी नोकरीवाल्या जावयासाठी आणखी किती करणार ना, माणूस?’’ अशी बोलणी बाहेर बैठकीत चालायची. इकडे आतल्या खोलीत बायकांच्यात कुजबूज असे, ‘‘मुलाची आई चपलाहारासाठी अगदी अडूनच बसली होती म्हणे. तोही अगदी चोख सोन्याचा हवा होता म्हणे!’’
‘‘होऽऽ. स्वतःसाठी नव्हती मागत. नवऱ्यामुलीच्या अंगाखांद्यावर चार ठळक जिन्नस दिसायला हवेत, म्हणून मागत होती. बाकी देण्याघेण्याचा फार कुटाणा नव्हता म्हणे.’’
‘‘जोश्यांना चार मुली आहेत. प्रत्येकीच्या लग्नात एवढं करत बसले, तर रस्त्यावर येतील एक दिवशी ते!’’