डॉ. अविनाश भोंडवे
‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव आणि कमतरता ही जागतिक पातळीवर सर्वच देशांना भेडसावणारी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. जगभरात सुमारे एक अब्ज व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव जाणवतो, तर एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळते.
रक्तामध्ये असलेल्या ‘ड’ जीवनसत्त्वाच्या प्राथमिक स्वरूपाला २५(ओएच)डी म्हणतात. रक्तामधल्या लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट आणि रक्त गोठण्यासाठी असलेले घटक काढून टाकल्यावर जो द्राव उरतो त्याला सीरम म्हणतात.
या सीरममधील २५(ओएच)डी हे शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाच्या पातळीचे सूचक असतात. यकृतामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचे रूपांतर २५(ओएच)डीमध्ये केले जाते. नंतर मूत्रपिंडात त्याचे रूपांतर १.२५(ओएच)डीमध्ये होते. हे १.२५(ओएच)डी म्हणजे ‘ड’ जीवनसत्त्वाचे सक्रिय स्वरूप असते.
प्रत्येक मिलीलिटर सीरममध्ये २५(ओएच)डी २० नॅनोग्रॅमपेक्षा कमी पातळीत असल्यास तो ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव समजला जातो. ती पातळी जर दर मिलीलिटरमध्ये ३० नॅनोग्रॅमपेक्षा कमी असेल तर त्याला ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता म्हणून ओळखले जाते.
‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता, वृद्ध, लठ्ठ रुग्ण, नर्सिंग होममध्ये ठेवले जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वात जास्त असते.
भौगोलिक विभाग आणि वय हे घटक वगळता, लठ्ठ व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे प्रमाण ३५ टक्क्यांनी जास्त असते. अमेरिकेमध्ये झालेल्या एका शास्त्रीय सर्वेक्षणात, नर्सिंग होममध्ये आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ५० ते ६० टक्के रुग्णांत ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळली.
मानवांमधील वांशिकदृष्ट्या असलेली भिन्नता त्वचेच्या रंगांप्रमाणे पारखली जाते. श्वेत, कृष्ण, पीत, गव्हाळी हे त्वचेचे वर्ण त्वचेत तयार होणाऱ्या मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे तयार होतात. हे रंगद्रव्य ज्या रंगाचे आणि रंगछटेचे असते, त्याप्रमाणे आपल्या त्वचेचा रंग असतो.
ज्यांच्या त्वचेमध्ये मेलॅनिनचे प्रमाण जास्त असते आणि जे पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरतात, त्या व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येते, असे एका संशोधनात आढळून आले आहे. या संशोधनातील आकडेवारीनुसार -
मध्यपूर्व देशांमधल्या तसेच अमेरिकेतल्या, आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीयांमधल्या नवजात अर्भकांपैकी ४७ टक्के अर्भकांत आणि कॉकेशियन वंशामधील ५६ टक्के नवजात अर्भकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळली.
इराण, तुर्कीए आणि भारतामधील ९० टक्क्यांपेक्षा जास्त अर्भकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळली.
प्रौढ वयाच्या व्यक्तींमध्ये लोकसंख्येमध्ये, अमेरिकेमध्ये ३५ टक्के; तर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता दिसून आली. या उलट अमेरिकेतल्या ६१ टक्के वृद्धांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता लक्षात आली.
ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे प्रमाण तुर्कीएमध्ये ९० टक्के, भारतात ९६ टक्के, पाकिस्तानमध्ये ७२ टक्के आणि इराणमध्ये ६७ टक्के लोकांमध्ये आढळले.
कडक उन्हात पाऊलही न टाकणाऱ्या, उन्हात जाताना नियमितपणे सनस्क्रीन लोशन लावणाऱ्या, दुधाची जन्मजात अॅलर्जी असल्यामुळे दूध किंवा दुधाचे पदार्थ न घेणाऱ्या, संपूर्णपणे शाकाहारी आहार घेणाऱ्या व्यक्तींना ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका असतो.
‘ड’ जीवनसत्त्व म्हणजे सूर्यप्रकाशातून मानवी आरोग्याला मिळणारी एक देणगीच असते. आपले शरीर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर, शरीराच्या प्रतिसादातून शरीराद्वारे ‘ड’ जीवनसत्त्व तयार केले जाते. आपल्या त्वचेमध्ये काही प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते.
उघड्या त्वचेवर सूर्यकिरण पडल्यावर, त्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट-बी किरणांची कोलेस्ट्रॉलवर प्रक्रिया होऊन ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते. ते रक्तात शोषले गेल्यावर पुढे यकृत व नंतर मूत्रपिंडात पाठवले जाते. तिथे त्यावर अधिक प्रक्रिया होऊन सक्रिय ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते.
काही खाद्यपदार्थांमध्ये ते नैसर्गिकरित्यादेखील आढळते. काही विशेष प्रकारचे मासे, फिश लिव्हर ऑइल, अंड्यातील पिवळा बलक यामध्ये ते मुबलक प्रमाणात असते. आजच्या जमान्यात काही दुग्धजन्य पदार्थांत आणि खाद्यपदार्थांत ते कृत्रिमरित्या एकत्रित करून तयार केलेल्या फॉर्टिफाइड अन्नपदार्थांतही असते.
हाडांच्या अंतर्भागात कॅल्शिअम आणि फॉस्फेट ही खनिजे जितकी जास्त प्रमाणात सामावली जातील, तितकी हाडे अधिक मजबूत होतात. कॅल्शिअमयुक्त पदार्थ केवळ आहारामध्ये जास्त प्रमाणात असून भागत नाही, कारण आहारातून मिळणारे कॅल्शिअम हाडांमध्ये सामावले जाण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
जन्मतःच ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास रिकेट्स किंवा मुडदूस हा विकार उद्भवतो. या विकारात हाडांच्या ऊतींमध्ये आवश्यक असलेली खनिजे योग्यरित्या सामावली जात नाहीत. त्यामुळे हाडे विरळ, मऊ होतात आणि शरीराच्या सांगाड्यामध्ये विकृती निर्माण होतात.
‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे
शरीरातील हाड न् हाड दुखणे, दैनंदिन हालचाली करताना स्नायूंची कमजोरी जाणवणे अशी लक्षणे जाणवत असतील, तर ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता नक्कीच असते. प्रत्यक्षात अनेकजणांमध्ये, ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असूनही अशी लक्षणे काहीशा सौम्य स्वरूपात असतात.
पण अशी कोणतीही लक्षणे जाणवत नसली आणि शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व खूप कमी असेल, तरीही आरोग्याबाबत विविध स्वरूपाचे धोके निर्माण होण्याची दाट शक्यता असते.
‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव आणि कमतरता असल्यास आरोग्याच्या दृष्टीने खालील जोखमीच्या गोष्टी घडू शकतात:
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार उद्भवणे. त्यातून अचानक होऊ शकणाऱ्या मृत्यूचा धोका वाढणे.
वृद्धांमध्ये संज्ञानात्मक (Cognitive) कमजोरी येणे.
बालकांमध्ये गंभीर स्वरूपाचा दम्याचा विकार संभवणे.
कर्करोगांची शक्यता वाढणे.
जागतिक पातळीवर झालेल्या अनेक संशोधनांत आढळल्यानुसार ‘ड’ जीवनसत्त्वाची रक्तातील पातळी योग्य प्रमाणात राखल्यास -
टाइप-१ आणि टाइप-२ प्रकारचे मधुमेह,
उच्च रक्तदाब,
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे (ग्लुकोज इन्टॉलरन्स)
मल्टिपल स्क्लेरोसिस
अशा अनेक विकारांचा प्रतिबंध होऊ शकतो. या विकारांच्या उपचारांमध्येदेखील ‘ड’ जीवनसत्त्वाचा समावेश उपयुक्त ठरू शकतो, असे सिद्ध झाले आहे.
कमतरतेची कारणे
दैनंदिन जीवनात लागणारे ‘ड’ जीवनसत्त्व आहारातून आणि सूर्यप्रकाशातून पुरेसे न मिळणे, हे ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे सर्वात महत्त्वाचे कारण असते.
‘ड’ जीवनसत्त्वाचे बहुतेक नैसर्गिक स्रोत प्राणिजन्य आहारात आहेत. यामध्ये मासे, माशांचे तेल, मटण, प्राण्यांचे यकृत, अंड्यातील पिवळ बलक, फोर्टिफाइड दूध यांचा समावेश असतो. मात्र शाकाहारी व्यक्तींना त्यांच्या आहारातून ‘ड’ जीवनसत्त्व खूप कमी प्रमाणात मिळते, परिणामतः त्यांच्यात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येते.
आहार वगळता, ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेला खालीलपैकी काही कारणे असतात-
सूर्यप्रकाशाशी कमी संपर्क ः त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण केले जाते. त्यामुळे पूर्णवेळ घरातच राहणाऱ्या व्यक्ती, उत्तर ध्रुवाजवळील देशातील नागरिक, लांब झगा, अंगभर कपडे घालणाऱ्या व डोके सतत झाकलेले ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये तसेच सूर्यप्रकाशाला प्रतिबंध करणारे व्यवसाय करणाऱ्या, दरवाजे-खिडक्यांच्या काचांना काळ्या फिल्म लावलेल्या ऑफिसांमध्ये दिवसभर काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते.
हवामान ः हिवाळ्यात आणि थंड हवामानाच्या प्रदेशात सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे ही कमतरता उद्भवण्याची शक्यता जास्त असते.
गडद त्वचा ः त्वचेचा सूर्यप्रकाशाशी संपर्क आल्यावर ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते. मेलॅनिन या त्वचेतील रंगद्रव्यामुळे ‘ड’ जीवनसत्त्व तयार करण्याची त्वचेची क्षमता कमी होते. त्यामुळे मेलॅनिन जास्त प्रमाणात असलेल्या वृद्धांना ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका मोठा असतो.
मूत्रपिंडांची अक्षमता ः वाढत्या वयानुसार मूत्रपिंडांकडून ‘ड’ जीवनसत्त्वाचे रूपांतर १.२५(ओएच)डीमध्ये सक्रिय स्वरूपात रूपांतर करण्याची क्षमता कमी होत असल्यामुळे ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका वाढतो.
‘ड’ जीवनसत्त्वाचे कमी शोषण ः क्रॉह्न्स डिसीज, सिस्टिक फायब्रोसिस आणि सीलिअॅक डिसीज अशा काही विकारांमध्ये, आतड्यांची ‘ड’ जीवनसत्त्व शोषण्याची क्षमता कमी होते, साहजिकच आहारात ‘ड’ जीवनसत्त्व पुरेसे जरी असले, तरी रक्तामधील पातळी कमी राहते.
स्थूलत्व ः शरीरातील चरबीच्या पेशी रक्तामधील ‘ड’ जीवनसत्त्व खेचून घेतात, त्यामुळे रक्ताभिसरणातून पसरणाऱ्या ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी घसरते. परिणामतः बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ३० किंवा त्याहून अधिक आलेल्या लठ्ठ व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी अल्प असते.
निदानासाठी चाचण्या
तुमच्या शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व किती आहे, हे मोजण्याचा सर्वात अचूक मार्ग म्हणजे २५-हायड्रॉक्सी व्हिटॅमिन डी ही रक्ताची चाचणी. साधारणतः ३० नॅनोग्रॅम/मिलीलिटर ते ५० नॅनोग्रॅम/मिलीलिटर ही ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी निरोगी व्यक्तींसाठी पुरेशी मानली जाते.
१२ नॅनोग्रॅम/मिलीलिटर किंवा त्यापेक्षा कमी पातळी ही ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव दर्शवते. परंतु ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी खूप जास्त असणे हेदेखील धोकादायक असते. ही पातळी १०० नॅनोग्रॅम/मिलीलिटरपेक्षा असल्यास, तो ‘ड’ जीवनसत्त्वाचा अतिरेक समजला जातो आणि त्यामुळे काही गंभीर व विपरीत लक्षणे उद्भवू शकतात.
‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेवर उपचार
‘ड’ जीवनसत्त्व जर २० नॅनोग्रॅम प्रति मिलीलिटर किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर त्यावर त्वरित उपचार घेणे आवश्यक ठरते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेकरिता केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये आहार आणि पूरक आहारांद्वारे, रुग्णाला ‘ड’ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात घेणे आवश्यक असते.
इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दैनंदिन आहारातून १ ते ७० वर्षे वयोगटातील प्रत्येकासाठी ६०० आंतरराष्ट्रीय युनिटपर्यंत (IU) ‘ड’ जीवनसत्त्व मिळणे आवश्यक असते. सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये हाडांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दैनंदिन स्वरूपात ८०० ते ४ हजार आययूची गरज असते.
‘ड’ जीवनसत्त्वासाठी ही सुरक्षिततेची मर्यादा ४ हजार आययूपर्यंत वाढविण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व खूप कमी असल्यास, त्याची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टर ४ हजार आययूपेक्षा जास्त प्रमाणातही ते घेण्याची शिफारस करू शकतात.
‘ड’ जीवनसत्त्व खूप कमी पातळीत असेल, आणि आहारातून ते पुरेसे मिळण्याची शक्यता नसेल, तर ‘ड’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. या १००० आययू, २००० आययू अशा स्वरूपात रोज घ्यायच्या असतात. याशिवाय काही रुग्णांना ६०,००० आययूच्या गोळ्या आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा घेण्याची शिफारस केली जाते. ‘ड’ जीवनसत्त्वाचे शोषण आतड्यांमधून होत नाही अशा व्यक्तींना, आठवड्यातून एकदा घ्यावयाची, ‘ड’ जीवनसत्त्वाची ६ किंवा ८ इंजेक्शन्सही डॉक्टर लिहून देतात.
सर्वच जीवनसत्त्वे ही निरामय आरोग्यासाठी आवश्यक असतात. पण इतर शारीरिक विकारांशी संबंध असल्यामुळे, सर्वांगीण आरोग्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाचे महत्त्व अपरंपार आहे.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.