Obesity : लठ्ठपणा अनुवांशिक आहे का? लठ्ठपणाविषयीचे समज, गैरसमज..

भारतातील लठ्ठपणाचे प्रमाण गेल्या पन्नास वर्षात वेगाने वाढत चालले आहे.
obesity
obesity esakal
Updated on

डॉ. अविनाश भोंडवे

लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, ऑस्टियोआर्थरायटिस, स्लीप अॅप्निया, काही मानसिक आजार, काही कर्करोग, वंध्यत्व असे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. अगदी माफक वजन कमी केल्यास ते आरोग्याबाबत हितकारक ठरते.

दवाखान्यात डॉक्टरांकडे आपल्या बाळांना किंवा किशोरवयीन मुलामुलींना घेऊन येणाऱ्या पालकांची अनेकदा एक मागणी असते, “हा फारच बारीक आहे हो.

याला जरा हेल्दी बनवा.” अशी मागणी कधीकधी स्त्रिया आपल्या नवऱ्यांबद्दल किंवा पुरुष त्यांच्या पत्नीबद्दलही करतात.

याचे मुख्य कारण म्हणजे, स्थूलपणा, लठ्ठपणा, जाडजूड असणे, गुटगुटीत दिसणे, हेल्दी असणे या साऱ्याबाबत आपले बरेच समज-गैरसमज आहेत.

शरीरात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मेद असण्याला लठ्ठपणा म्हणतात, पण लठ्ठपणा म्हणजे नक्की काय असते? हे समजून घ्यायला आपल्याला बॉडी-मास-इंडेक्स (बीएमआय) ही शास्त्रीय संकल्पना समजून घ्यायला हवी.

आपल्या किलोग्रॅममधील वजनाला मीटरमधील उंचीच्या वर्गाने भागल्यावर जे उत्तर येते, त्याला बॉडी-मास-इंडेक्स म्हणतात. म्हणजे, समजा एखाद्याचे वजन ७० किलोग्रॅम आहे आणि उंची १६५ सेंटीमीटर म्हणजेच १.६५ मीटर आहे.

तर त्याचा बीएमआय काढण्यासाठी १.६५चा वर्ग काढायचा, म्हणजे १.६५ गुणिले १.६५ हा गुणाकार करायचा. तो २.७२२५ येतो.

आता या आकड्याने ७०ला भागल्यावर जे २५.७१ असे उत्तर मिळते ते म्हणजे तुमचा बीएमआय. बीएमआयनुसार आपले वजन योग्य आहे का, हे कळू शकते.

बीएमआय निष्कर्ष

१८.५ किंवा त्यापेक्षा कमी कमी वजन, कृश

१८.५ ते २४.९ आदर्श वजन

२५ ते २९.९ लठ्ठपणा

३० किंवा त्यापेक्षा जास्त स्थूलत्व

भारतातील लठ्ठपणाचे प्रमाण गेल्या पन्नास वर्षात वेगाने वाढत चालले आहे. बीएमआय ३० किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या लोकांचे प्रमाण पाहिले, तर १९७५मध्ये स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ६.४ टक्के आणि पुरुषांमध्ये ३.२ टक्के होते, २०१४मध्ये ते अनुक्रमे १४.९ टक्के आणि १०.८ टक्क्यांपर्यंत वाढले.

२०२०च्या आकडेवारीमध्ये ते २१.८ आणि २१.७ टक्क्यांपर्यंत पोहोचले. एका संशोधन प्रकल्पानुसार २०४० पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण अनुक्रमे ३०.५ टक्के आणि २७.८ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.

लठ्ठपणा ही केवळ व्यक्ती कशी दिसते याबाबतची कॉस्मेटिक चिंता नसून तो एक वैद्यकीय आजारच असतो.

त्यातून हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, यकृत रोग, स्लीप अॅप्निया, काही विशिष्ट कर्करोग, सांध्यांचे तसेच मणक्यांचे विकार, पीसीओडीसारखा वंध्यत्व निर्माण करणारा आजार असे अनेक आजार आणि आरोग्यसमस्या निष्पन्न होऊ शकतात.

गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाशी संबंधित आरोग्य समस्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. पण, अशास्त्रीय समजुती, जाहिराती आणि सोशल मीडियामुळे अनेक मिथकेही अखंड पसरत असतात.

अशापैकी अनेक समज-गैरसमजांमुळे लठ्ठ व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लठ्ठपणाबाबतच्या प्रचलित गैरसमजांच्या विळख्यातून सुटण्यासाठी काही माहिती घेणे जरुरीचे आहे.

obesity
Heart Attack : लठ्ठपणा असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध...

समज -लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘कमी खा आणि जास्त हालचाल करा’

शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी आहारातून दीर्घकाळ घेत राहणे आणि अजिबात व्यायाम न करणे, हीच लठ्ठपणाची मुख्य कारणे असतात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठीच्या बहुतेक उपायांचे उद्देश, आहारातील उष्मांक कमी करणे आणि शारीरिक हालचाल वाढवणे हेच असतात.

आहार आणि व्यायाम या महत्त्वाच्या घटकांबरोबर अनेक असंबंधित घटकदेखील लठ्ठपणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

त्यात मानसिक तणाव, तीव्र वेदना, हार्मोन (संप्रेरके), काही औषधांचा वापर यांचा समावेश होतो. अनेकदा जास्त खाणे हे वजनवाढीच्या कारणाऐवजी एखाद्या विकाराचे लक्षण असू शकते.

लठ्ठपणा वाढवण्यासाठी हे घटक एकत्रितपणे गुंतलेले असतात. उदाहरणार्थ, तणावामुळे लठ्ठपणाची शक्यता वाढते. आपण जाड होत चाललो आहोत हे अनेकांना लांच्छनास्पद वाटते, तर काहींना आत्मप्रतिमा डागाळण्याची भीती वाटते.

अशा व्यक्तींमध्ये लठ्ठपणा तणावपूर्ण ठरतो. त्यांच्या तणावाची पातळी वाढते आणि ते वजन कमी करण्यासाठी काहीही न करण्याच्या मनःस्थितीत जातात. याला ‘निगेटिव्ह फीडबॅक लूप’ म्हणतात.

याच सोबत, वाढता तणाव झोपेवर परिणाम करतो. त्यामुळे उशिरा झोपणे, झोप अपुरी होणे, झोपेतून अधूनमधून जाग येणे असे त्रास निर्माण होतात. झोपेसंबंधीचे त्रास म्हणजे लठ्ठपणा वाढवणारा एक घटकच असतो.

झोपेच्या कमतरतेमुळे तणावाची पातळी वाढते. त्यामुळे तणाव संप्रेरकांचीही पातळी वाढत जाते आणि पुन्हा झोपेचा कालावधी कमी होत जातो. हे एक दुष्टचक्रच बनते.

स्लीप अॅप्निया या विकारात एखादी व्यक्ती झोपेमध्ये काही काळ श्वास घेणे थांबवते, जास्त वजन किंवा लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये हा विकार अधिक प्रमाणात आढळतो.

याचेही पुन्हा एक दुष्टचक्र तयार होते. जसजसे वजन वाढत जाते, तसतसा स्लीप अॅप्नियाचा त्रासही वाढत जातो. परिणामतः झोप कमी होते आणि वजन आणखीच वाढत राहते.

दीर्घकालीन वेदना आणि वजनवाढ यांचा संबंध असल्याचे अनेक संशोधनांत आढळून आले आहे. या दोन्हीतल्या संबंधाची कारणे गुंतागुंतीची असतात आणि व्यक्तीपरत्वे ती भिन्न असू शकतात.

शरीरातील जैवरासायनिक घटक, झोप, नैराश्य आणि जीवनशैली या सर्वांचा त्यात समावेश असतो. दीर्घकालीन वेदनादेखील तणाव पातळी वाढवितात आणि तिसरे दुष्टचक्र सुरू होते.

तणाव, झोप आणि वेदना हे तीन परस्परसंबंधित घटक आहेत जे लठ्ठपणा वाढवू शकतात. प्रत्येक व्यक्तीबाबत वजनवाढीचे कारण वेगवेगळे असू शकते.

म्हणजेच वजनवाढीसाठी केवळ ‘जास्त खाणे आणि कमी हालचाल करणे’ हीच कारणे नसतात. अतिरिक्त कॅलरी टाळणे आणि व्यायाम करणे हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी महत्त्वाचे घटक नक्कीच आहेत, परंतु लठ्ठपणाच्या पटकथेत इतर खलनायकांचाही समावेश असतो.

obesity
पुण्यात तरुण होताहेत लठ्ठ

समज -लठ्ठपणामुळे मधुमेह होतो

लठ्ठपणामुळे मधुमेह होत नाही. टाइप-२ मधुमेहासाठी वाढते वजन हा महत्त्वाचा जोखीम घटक असतो, पण प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला टाइप-२ मधुमेह होतोच असे नाही आणि टाइप-२ मधुमेह असलेला प्रत्येक जण लठ्ठ नसतो.

गरोदरपणातील मधुमेहाबाबत लठ्ठपणा हा नक्कीच जोखीम घटक आहे. परंतु टाइप-१ मधुमेहासाठी लठ्ठपणा हा धोक्याचा घटक नसतो.

समज -लठ्ठ लोक आळशी असतात

निष्क्रिय जीवनशैली हा लठ्ठपणाचा एक घटक असतो आणि अधिक सक्रिय होण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. परंतु लठ्ठपणामध्ये निष्क्रियतेपेक्षाही बरेच काही असते.

सन २०११मध्ये झालेल्या एका संशोधनात, २० ते ७९ वर्षे वयोगटातील २,८३२ प्रौढांनी चालताना दररोज टाकलेल्या पावलांचे आकडे अॅक्सिलरोमीटरने सलग चार दिवस मोजण्यात आले. यापैकी ज्यांचे वजन जास्त होते त्यांच्या पावलांची संख्या कमी भरली.

परंतु हा फरक तितका महत्त्वाचा नव्हता. या संशोधनात प्रसिद्ध झालेली यादी खाली दिली आहे. त्यात सहभागी व्यक्तींचे वजन आणि या प्रयोगादरम्यान त्यांनी दररोज किती पावले उचलली हे दर्शविते:

आदर्श वजन असलेले- बीएमआय १८.५ ते २४.५ : ८,८१९ पावले

जास्त वजन असलेले- बीएमआय २५ ते २९.९ : ८,५०६ पावले

लठ्ठ व्यक्ती- बीएमआय ३० पेक्षा जास्त: ७,५४६ पावले

महत्त्वाची गोष्ट अशी, की जास्त वजन किंवा लठ्ठपणा असलेली व्यक्ती जेव्हा पाऊल टाकते तेव्हा ती प्रत्येकवेळी इतरांपेक्षा (तिच्याच शरीराचे) जास्त वजन उचलत असते. म्हणजेच प्रत्येक पावलामागे त्या व्यक्तीची ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते.

हे लक्षात घेता, या तिन्ही गटांनी चालताना खर्चलेल्या ऊर्जेतील फरक फारच थोडा आहे, असे लक्षात आले. पण याचा अर्थ असा नाही, की उत्तम आरोग्यासाठी शारीरिक हालचाली आवश्यक नाहीत, कारण लठ्ठपणाची पटकथा अधिक गुंतागुंतीची आहे.

आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वच लोक शारीरिक हालचाली करू शकत नाहीत. म्हणजे काही शारीरिक अपंगत्व असले, तर हालचाल करणे जिकिरीचे किंवा अशक्यही होऊ शकते. तसेच, काही मानसिक आरोग्य समस्या हालचाल करण्याच्या इच्छेवर गंभीर परिणाम करतात.

या व्यक्ती मुळीसुद्धा हालचाल करत नाहीत. नैराश्य आणि लठ्ठपणा यांच्यातील हा आणखी एक संबंध पटकथेतील गुंतागुंत आणखी वाढवतो.

शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांव्यतिरिक्त, लठ्ठपणा असलेल्या काही लोकांमध्ये नकारात्मक शारीरिक प्रतिमादेखील असते, ज्यामुळे त्यांना घराबाहेर पडणे मानसिकदृष्ट्या अधिक त्रासदायक ठरू शकते.

obesity
Obesity: शंभरात १२ मुलांमध्ये आढळतो लठ्ठपणा ! लठ्ठपणात 'या' गंभीर आजारांची पाळेमुळे, तज्ञांनी दिली माहिती

समज -नातेवाईक लठ्ठ, तर तुम्हीही लठ्ठ

लठ्ठपणा आणि आनुवंशिकता यांच्यातील संबंध गुंतागुंतीचा आहे, परंतु ज्यांचे नातेवाईक लठ्ठ आहेत, अशा व्यक्तींमध्ये लठ्ठपणा आपोआप विकसित होत नाही. त्यांच्या वैयक्तिक घटकांमधून तो उद्‌भवण्याची शक्यता जास्त असते.

एका व्यक्तीचे जनुक आणि त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाचा परिणाम यामधून वजनवाढ होते. परंतु जे नातेवाईक समान जनुके सामायिक करतात, म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण, मुले, नातवंडे वगैरे, ते सहसा एकत्रितच राहात असतात किंवा घराण्याच्या परंपरेने त्यांच्या आहाराबाबतच्या आणि जीवनशैलीच्या सवयी एकसारख्या असू शकतात.

संशोधकांच्या एका गटाने १९९०मध्ये न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात, वेगवेगळ्या वाढलेल्या जुळ्या मुलांची तपासणी केली आणि त्यांची तुलना एकत्र वाढलेल्या जुळ्या मुलांशी केली.

त्यामधून काढलेल्या निष्कर्षानुसार मुलांच्या वजनावर आनुवंशिकतेचा पूर्ण परिणाम असतो, पण बालपणातील बाह्यवातावरणाचा प्रभाव एकतर अजिबातच नसतो आणि असला तरी तो खूप अल्प असतो.

दत्तक घेतलेल्या मुलांचे वजन त्यांच्या जन्मदात्या पालकांच्या वजनाशी संबंधित असते, परंतु त्यांच्या दत्तक पालकांच्या वजनाशी नसते, असे १९८६मध्ये झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे.

गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनात, पर्यावरणामुळेही काही प्रमाणात वजनवाढ होते असे सिद्ध झाले असले तरी, त्यातही आनुवंशिकताच लठ्ठपणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे आढळून आले आहे.

obesity
लठ्ठपणा भविष्यात वाढणार,तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

गेल्या दोन दशकात, शास्त्रज्ञांनी लठ्ठपणा निर्माण करणाऱ्या जनुकांचा शोध लावला आहे. लठ्ठपणाशी संबंधित अगदी थोडा का होईना पण त्यांचा परिणाम घडवणारी तब्बल पन्नासपेक्षा जास्त जनुके जीनॉम-वाइड असोसिएशनने २००६पासून केलेल्या अभ्यासात आढळून आली आहेत.

वर्ष २०११मध्ये झालेल्या एका संशोधनात, लठ्ठपणाच्या वाढीत २५ ते ३० टक्के भर टाकणारा, एफटीओ (फॅट मास ॲण्ड ओबेसिटी) नावाच्या जनुकाचा शोध लागला.

आनुवंशिकता महत्त्वाची असली, तरी एखाद्या व्यक्तीचे नातेवाईक लठ्ठ असले, तर ती व्यक्ती लठ्ठ होईलच असे नसते.

एफटीओ जनुकाच्या संशोधनात या संबंधात एक महत्त्वाचा निष्कर्ष सादर झाला आहे. या संशोधनात २ लाख १८ हजारांहून अधिक प्रौढांच्या जनुकीय डेटाचे विश्लेषण केल्यावर संशोधकांना आढळले, की -

एफटीओ जनुक असलेल्या व्यक्तीमध्ये लठ्ठ होण्याची शक्यता, ते जनुक नसलेल्या व्यक्तीपेक्षा १.२३ पटीने जास्त असते.

नियमित शारीरिक व्यायाम करणाऱ्या प्रौढ व्यक्तींमध्ये एफटीओ जनुक असूनसुद्धा लठ्ठपणाची शक्यता २७ टक्के कमी आढळते.

एफटीओ जनुक आणि लठ्ठपणाशी संबंधित असलेले इतर जनुकीय घटक असलेल्या व्यक्तींनी नियमित व्यायाम किंवा वजन कमी करण्याचे इतर उपाय केले, तर त्यांचे वजन एफटीओ जनुक नसलेल्या व्यक्तींइतकेच कमी होऊ शकते.

या संशोधनाच्या पुनरावलोकनामध्ये आणि मेटा-अॅनॅलिसिसमध्ये या निष्कर्षांना दुजोरा मिळाला.

समज -लठ्ठपणाचा आरोग्यावर परिणाम होत नाही हे एक मिथक आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, ऑस्टियोआर्थरायटिस, स्लीप अॅप्निया, काही मानसिक आजार, काही कर्करोग, वंध्यत्व असे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो.

अगदी माफक वजन कमी केल्यासही ते आरोग्याबाबत हितकारक ठरते. शरीराच्या एकूण वजनाच्या ५ ते १० टक्के वजन कमी केल्याने रक्तदाब, रक्तातील कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेमध्ये सुधारणा होण्यासारखे आरोग्यविषयक फायदे होतात.

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, वजन कमी केल्यास लठ्ठपणा असलेल्या प्रौढांमधील सर्व कारणांमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.

---------------------

obesity
‘वर्क फ्रॉम होम’ ठरतंय आरोग्यासाठी घातक जीवनशैलीतील बदल कारणीभूत ः लठ्ठपणा, मधुमेह याबरोबर ह्रदयरोगालाही निमंत्रण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.