प्रसाद नामजोशी
तान्याच्या बॉन्ड गर्लला मात्र दोन्ही टोकांचा प्रतिसाद मिळाला. काहींनी तिला टॉप टेन बॉन्ड गर्ल्समध्ये नेऊन ठेवलं, तर काहींच्या मते ती खालून टॉप टेनमध्ये यायला हवी. वाईट अभिनयासाठी दिला जाणाऱ्या रॅझी (द गोल्डन रास्पबेरी ॲवॉर्ड) अवॉर्डसाठी तिला नामांकनही मिळालं होतं. कुणी निंदा, कुणी वंदा असं म्हणत तान्या जगभरातल्या बॉन्डप्रेमींची आवडती मात्र झाली.
नेहमीप्रमाणे भयंकर हाणामारी करून अखेरच्या क्षणी सुंदर आणि तरुण स्टेसीला हात देऊन आपल्याजवळ खेचून घेऊन जेम्स बॉन्ड वाचवतो आणि आकाशात आगीचे लोळ उठतात. या सगळ्या गदारोळात बॉन्ड जिवंत आहे की नाही अशी शंका ब्रिटिश हेरखात्याला येते.
बॉन्डच्या शोधार्थ त्यांचा शास्त्रज्ञ क्यू आपला स्नूपर नावाचा कुत्र्यासारखा रोबो स्टेसीच्या प्रशस्त बंगल्यात सोडतो. क्यूकडे असलेल्या पडद्यावर स्नूपर जिथे जातो, तिथल्या गोष्टी दिसत आहेत. स्टेसीच्या आलीशान बाथरूममध्ये हालचाल दिसते.
बाथरूमच्या पडद्यामागून शॉवरमध्ये एकत्र असलेले स्टेसी आणि बॉन्ड दिसतात. पुढे काहीतरी मजेदार प्रसंग बघायला मिळेल म्हणून क्यूचे डोळे लकाकतात. तेवढ्यात त्याचा फोन खणखणतो. हेड ऑफिसमधून विचारणा होते, ‘काय पोझिशन आहे?’ क्यू उत्तरतो, ‘बॉन्ड जिवंत आहे, शेवटचा हात फिरवतोय!’ बॉन्ड आणि स्टेसी बिलगतात आणि चित्रपट संपतो.