प्रसाद नामजोशी
आजही लोक सॉलिटेअर बघतात, जेन सीमोरला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात, मग तिच्या फॅशन ब्रँडविषयी माहिती घेऊन तिच्या वेबसाइटवर जाऊन काही खरेदीही करतात. बॉन्ड गर्लचं ग्लॅमर जेननं कधीच मागं सोडलेलं आहे. आज तिला स्वतःचं अस्तित्व आहे.
ते वर्षं होतं १९६६. ज्या घोषणेची रॉजर मूर हा इंग्लिश अभिनेता आतुरतेनं वाट बघत होता ती अखेर झाली. आजवरच्या पहिल्या पाच चित्रपटांत जेम्स बॉन्ड साकारणाऱ्या शॉन कॉनरीनं आता यापुढे आपण जेम्स बॉन्ड साकारणार नाही हे जाहीर केलं! पुढचा बॉन्ड कोण याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होतीच आणि सगळ्यांचं लक्ष रॉजर मूरकडे होतं. त्यानं बॉन्ड साकारावा अशी त्याच्या ‘पंख्यांची’ मांग होती.
डॉक्टर नो या पहिल्या बॉन्डपटासाठीच त्याला विचारणा झाली होती, पण आमच्या साहेबांनी नाही म्हटलं म्हणून शॉन कॉनरीला संधी मिळाली अशा चर्चाही चाहते करत होते. पण रॉजर मूर शांतपणे अपेक्षित संधीची वाट बघत होता. मात्र बॉन्डपटाचे निर्माते ‘इऑन फिल्म्स’नं शॉन कॉनरीच्या जागी जॉर्ज लेझनबी या ऑस्ट्रेलियन अभिनेत्याला निवडलं आणि ऑन हिज मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस या चित्रपटाची निर्मिती झाली. पण हा बॉन्ड एका चित्रपटापुरताच झळकला.