गौतम पंगू, फिलाडेल्फिया, अमेरिका
अँड्रयूच्या ऑफिसचं दार बंद करून ती बाहेर आली, पण त्याचे शब्द तिचा पाठलाग करत राहिले. कंपनीची ‘अँटी- डिस्क्रिमिनेशन पॉलिसी’ पाळायची म्हणून मी तुला नेमलं - म्हणजे तू दक्षिण आशियाई वंशाची, एक स्त्री असूनही तुला मी हा प्रोजेक्ट लीड करायला दिला, त्यात कसलं डिस्क्रिमिनेशन केलं नाही हे नशीब समज आणि मी सांगतो तसं कर. उगाच बाकीचं डिस्क्रिमिनेशन थांबवायला जाऊ नकोस..
घराचा दरवाजा उघडून असीम आणि अवंती बाहेर आले. अवंतीनं दरवाजा लावून घेतला. “लंचबॉक्स, वॉटर बॉटल, होमवर्क फोल्डर, सगळं घेतलं?” असीमकडं बघत तिनं विचारलं. त्यानं मान डोलावली तसे ते दोघं त्यांच्या घरासमोरचा छोटासा रस्ता मुख्य रस्त्याला जिथं मिळत होता, त्या कॉर्नरकडं चालायला लागले. फॉल येऊ घातलाय याची चाहूल देणारा हलकासा गारवा हवेत होता. तिनं हातातल्या ॲपल वॉचकडं नजर टाकली.
असीमची स्कूल बस यायला अजून पाचेक मिनिटं होती, पण त्याला स्टॉपवर सोडून तिलाही ऑफिसला निघायचं होतं. चालता-चालता ते त्यांच्या शेजारच्या घराजवळ आले. समोरची बाग नेहमीप्रमाणं ताजी, प्रसन्न दिसत होती. बागेच्या एका बाजूला खाली वाकून हातातल्या खुरप्यानं माती उपसत बसलेला मिनोरू त्यांना दिसला.