John Maynard Keynes Economic Policies
‘शूर मर्दाचा पोवाडा’
केन्सने अर्थशास्त्रीय क्रांती घडवून आणल्याचे मानले जाते. या क्रांतीच्या स्वरूपाबद्दल अजूनही चर्चा होत असते. केन्स क्रियाशील किंवा प्रोअॅक्टिव्ह धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. या धोरणामुळे ‘चमत्कार’ होऊ शकेल असे म्हणण्याइतका आत्मविश्वास व साहस त्याच्याकडे आहे.
मार्क स्काउसेनने आपल्या ‘द बिग थ्री इन इकॉनॉमिक्स’ (The Big Three in Economics) या ग्रंथात अर्थशास्त्रातील ज्या तीन महनीयांची ओळख करून दिली आहे त्यात अॅडम स्मिथ, कार्ल मार्क्स आणि केन्स यांचा समावेश आहे. शतकांचा विचार केला तर अठरावे शतक स्मिथचे, एकोणिसावे मार्क्सचे आणि विसावे केन्सचे असे म्हणावे लागते.
स्काउसेनने (Mark Skousen) ग्रंथ प्रकाशित केला तेव्हाचे साल २००७ होते. म्हणजेच बँका बुडणे, महामंदीसारखा बिकट पेचप्रसंग ओढवणे याच्या एक वर्ष आधीची ही घटना आहे. पण म्हणजेच स्काउसेनला पेचप्रसंगानंतरच्या केन्सच्या होणाऱ्या पुनरुज्जीवनाची पूर्वकल्पना असायचे कारण नव्हते.
तरीही तो केन्सची अशी दखल घेतो, हीच बाब केन्सचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पुरेशी मानता येईल.पण हा झाला ऐतिहासिकतेचा भाग. वर्तमानाचा विचार केला तर असे दिसून येईल, की मंदीनंतर अमेरिकेत जी पळापळ झाली तिचा उपसर्ग सर्वसाधारण नागरिकांना झाल्यामुळे सरकारच्या धोरणात अनुस्यूत असलेल्या अर्थशास्त्रीय सिद्धांतांची चर्चा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहिली नाही.
त्यामुळे नंतरच्या अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीत हा मुद्दा प्रचारातही आला. या काळात बराक ओबामा (Barak Obama) अमेरिकेचे अध्यक्ष. याच अध्यक्षांना २०१२च्या निवडणुकीत उतरवायचे असे डेमोक्रॅटिक पक्षाने ठरवले. विरोधातील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रॉम्नी (Willard Mitt Romney).
या निवडणुकीच्या तोंडावर काय होत होते याचे वर्णन प्रसिद्ध पत्रकार निलोकस वॅपशॉटने (Nicholas Wapshott) केले. त्याचे शीर्षकच होते ‘द केन्स-हाइक शोडाऊन (The Keynes-Hayek Showdown) वॅपशॉट केन्सनेच लिहिलेल्या ‘even the most practical man of affairs is usually in the thrall of the ideas of some long-dead economist,’ या वाक्याची आठवण करून देतो.
कल्पनांच्या प्रभावाबद्दल केन्स आणि हाइक यांच्यात मतैक्य होते याची नोंद येथे वॅपशॉट घेत नाही, हा मुद्दा वेगळा. निवडणुकीतील मुख्य वादविषयाविषयी तो सांगतो, ‘Those words of wisdom have never been more true than today as a Keynes-Hayek presidential election approaches next November.’
या वादाला तो ‘a saga that comes to define politics and economics in the twentieth century’, असे म्हणतो.या काळात अमेरिकेतील आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी अध्यक्ष ओबामा यांनी केन्सचे हस्तक्षेपवादी धोरण पत्करले होते.
विरोधक हाइकच्या सिद्धांताचे हत्यार उगारून त्यांच्यावर चालून जात होते. यावर ऑक्सफर्डमध्ये झालेल्या विद्वचर्चेचे वृत्तांकन वॅपशॉटने केले आहे.वॅपशॉटचे वृत्तांकन विद्वानांमधील वादविवादाचे आहे. परंतु सामान्य माणसालाही केन्सबाबत काय घडले हे कळावे म्हणून की काय कदाचित रहस्यकथेच्या रचनेच्या धर्तीवर ‘जॉन मायनार्ड केन्सला कोणी मारले?’ असा प्रश्न उपस्थित करीत त्याचे उत्तर त्याच पद्धतीने पेश करण्यात आले होते.
ॲगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथांमधील हेस्टिंग्ज, पायरो हीच पात्रे या खुनाचे (?) रहस्य उलगडणारी चर्चा करीत आहेत; धागेदोरे जुळवीत आहेत, अशा थाटाचे हे लिखाण आहे. हाइक, फ्रीडमन, कम्युनिस्ट इ. संबंधितांची, कटामागच्या त्यांच्या हेतूसह, संशयित म्हणून चर्चा करीत शेवटी या सर्वांचाच यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हात असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
अर्थात हा प्रकारही स्वाभाविक मानायला हवा. केन्सच्या विचारांची पीछेहाट होत आहे, हे पाहून त्या विचाराचे विरोधक ‘केन्स ‘ मृत्युमुखी पडला आहे, ‘Keynes is dead’ अशा प्रकारची भाषा वापरू लागले होते. त्यावरील हा उतारा असावा!
ते काहीही असो, हा सर्व प्रकार केन्सच्या प्रभावाच्या खुणा दाखवणारा आहे, असेही म्हणता येते. हा प्रभाव केवळ युरोप-अमेरिकेपुरताच मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्याचे नमूद करणे आवश्यक आहे. अशा राष्ट्रांमधील एक उदाहरण जपानचे आहे. कोइचि हमदा (Koichi Hamada) या अभ्यासकाने ‘दि इम्पॅक्ट ऑफ द जनरल थिअरी इन जपान’ (The Impact of the General Theory in Japan) या शोधनिबंधात हा प्रभाव स्पष्ट केला आहे.
खरे तर जपान हा पाश्चात्त्यांच्या वासाहतिक साम्राज्यात मोडणारा, भारतासारखा देश नव्हे. साम्राज्याचा भाग असलेल्या देशांमध्ये जेत्याचे विचार आपोआपच प्रसृत होत असतात. जपानबाबत तसे म्हणायला जागा नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांची नेत्रदीपक प्रगती पाहून खाड्कन जाग आलेल्या जपानने स्वतः होऊन व स्वतःच्याच प्रयत्नांनी पाश्चात्त्य आधुनिकता आत्मसात केली.
केवळ पोशाखीपणाने किंवा तंत्रज्ञानातून निष्पन्न झालेल्या सुखसोयीच्या वस्तूंची नव्हे तर ज्ञानविज्ञानासह! पाश्चात्त्यांच्या आधुनिकेत त्यांच्या अर्थशास्त्रीय विचारांचा वाटा असल्याचे लक्षात आलेल्या जपान्यांनी इंग्रजी अर्थशास्त्रीय ग्रंथाचे जपानीत अनुवादही केले.
१९३० साली प्रकाशित झालेल्या केन्सच्या ‘द ट्रिटीज ऑफ मनी’चे (The Treatise on Money) जपानी भाषांतर निसाबुरो किटो (Nisaburo Kito) याने १९३२-३४ या कालखंडात सिद्ध केले. त्सुकुमो शिओनोया (Tsukumo Shionoya) याने केन्सच्या प्रभावशाली ‘दि जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अॅण्ड मनी’ (The General Theory of Employment, Interest and Money -प्रकाशन १९३६) या ग्रंथाचे जपानी भाषांतर १९४१मध्ये प्रसिद्ध केले.
म्हणजे मूळ ग्रंथानंतर अवघ्या पाचच वर्षांत! विशेष म्हणजे जपानी भाषांतराचा हा काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता! ‘जनरल थिअरी’च्या प्रकाशनाच्यावेळी त्सुकुमोपुत्र युचि (Yuichi Shionoya) अवघा नऊ वर्षांचा होता. मोठा झाल्यावर तोही अर्थशास्त्राकडे वळला.
त्याने १९८३मध्ये याच ग्रंथाचा नवा सुधारित अनुवाद करून प्रकाशित केला. विशेष म्हणजे या दोन्ही अनुवादांचे प्रकाशक एकच टोयो कैझेयी (Toyo Keizai)! स्वतः युचि वडिलांप्रमाणे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मानला जातो. विशेष म्हणजे अर्थशास्त्राचा नितिशास्त्राशी निकटचा नव्हे तर अतूट संबंध असल्याचे केन्सचे मत त्याला मान्य आहे.
केन्सने अर्थशास्त्रीय क्रांती घडवून आणल्याचे मानले जाते. या क्रांतीच्या स्वरूपाबद्दल अजूनही चर्चा होत असते. मुळात निसर्ग विज्ञानात ज्याप्रमाणे क्रांती कुन्हच्या ‘पॅराडाइम शिफ्ट’ (Paradigm Shift) या अर्थाने होत असते तशी सामाजिक शास्त्रांमध्ये होत नाही.
हे मत यापूर्वीच निर्देशिले गेले आहे. तशी क्रांती सामाजिक शास्त्रात शक्य असती तर १९७० नंतर केन्स मागे पडून फ्रीडमनच्या (Milton Friedman) माध्यमातून हाइकचा विचार पुढे आला नसता व २००८ नंतर अर्थव्यवस्थेची झालेली मोडतोड विचारात घेऊन तिच्यावरील उतारा म्हणून पुन्हा एकदा केन्सच्या अर्थशास्त्रानुसार सरकारी हस्तक्षेपाची वेळ आली नसती, असेही म्हटले गेले आहे.
स्वतः केन्स मात्र स्वतःच्या मांडणीबाबत व सिद्धांतांबाबत अत्यंत ठाम होता. त्याची परखड व बोचरी शैली हा त्याचाच दुर्दम्य आत्मविश्वासाचाच परिपाक आहे, असे म्हणावे लागते. त्याने वापरलेल्या उपमादि अलंकारांकडे पाहिले तरी त्यांना अलंकार न मानता शब्दशः घ्यावे असा मोहही होऊ शकतो.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याने ब्रिटिश सरकारचा आर्थिक धोरणसल्लागार म्हणून काम केले. पतविस्तार (Credit Expansion) हा या धोरणाचा एक भाग होता. या धोरणाच्या मसुदापत्रात असे म्हटले आहे की अशा प्रकारचा पतविस्तार ‘miracle of turning a stone into bread’ घडवून आणेल.
उघड आहे की केन्स क्रियाशील किंवा प्रोअॅक्टिव्ह (Proactive) धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. या धोरणामुळे ‘चमत्कार’ होऊ शकेल असे म्हणण्याइतका आत्मविश्वास व साहस त्याच्याकडे आहे.
अशा प्रकारचा आत्मविश्वास केन्सचा प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या हाइककडे होता किंवा नव्हता याची चर्चा करताना असे म्हणावे लागेल की वैयक्तिक पातळीवर हाइककडे तो असू शकेल पण त्याच्या लेखनाच्या शैलीत तो प्रतिबिंबित होताना आढळत नाही.
केन्सच्या पुस्तकांचा, मतांचा, सिद्धांतांचा, वादविवादाचा परामर्श त्या त्या संदर्भाच्या गरजेप्रमाणे घेण्याचा प्रयत्न आपण करीत आलेलो आहोतच. त्यासाठी अभ्यासकांच्या मतांच्या आधारही घेतलेला आहे. त्यात केन्सच्या समर्थकांच्या व अनुयायांच्या लेखनाचाही समावेश होतो.
मग अंतिमतः त्याच्याबाहेर जाऊन एक महत्त्वाचा विरोधक आणि एक समर्थकही नव्हे आणि विरोधकही नव्हे असा एखादा महत्त्वाचा तिसराच अशा दोघांच्या मतांची चर्चा करायला हरकत नसावी. महत्त्वाचा विरोधक म्हणून मिल्टन फ्रीडमनला निवडण्यात काही गैर नाही. माऊंट पेलेरिनच्या परिषदेस हजर असलेला तरुण फ्रीडमन नंतर मोठा अर्थशास्त्रज्ञ म्हणून गाजला, हे वेगळे सांगायची गरज नाही.
फ्रीडमनची चर्चा स्वतंत्रपणे नंतर करूच. तो महत्त्वाचा यासाठी की १९७० नंतर केन्सचे अर्थशास्त्र मागे पडल्यानंतर हाइकची परंपरा चालवणारा फ्रीडमनच केन्सविरोधी गटाचा प्रतिनिधी व प्रवक्ता मानला गेला.
शुम्पिटरची चर्चा आपण यापूर्वी केलेली आहे. सर्जनशील विनाश हे भांडवलशाहीचे सूत्र मानून प्रयोजकामार्फत ही क्रिया भांडवलशाहीत सतत होत असते, असे सांगणारा शुम्पिटर समाजवाद नावाची रचना ही अशाच प्रकारच्या सर्जनशील विनाशातून होईल असे सांगतो तेव्हा समाजवाद ही, मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे, भांडवलशाहीला नाकारणारी अवस्था न राहता भांडवलशाहीचा पुढचा स्वाभाविक टप्पा ठरते.
‘शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने ऐकावा...’ असे शाहीर तुलसीदास याने नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील सिंहगडावरील पोवाड्यात लिहिले आहे. त्यात भर घालून ‘शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने लिहावा’ असे म्हटले तर हाइक, केन्स, शुम्पिटर, फ्रीडमन अशा मान्यवर अर्थशास्त्रज्ञांनी एकमेकांविषयी केलेल्या लेखनाचे महत्त्व अधिक स्पष्ट होईल.
आधी शुम्पिटर केन्सबद्दल काय म्हणतो हे त्याने लिहिलेल्या मृत्युलेखाच्या आधारे पाहू. त्याची वेगळी प्रस्तुतता भारताच्या संदर्भात कशी आहे हेही त्यातूनच लक्षात येईल.केन्सने आपल्या कारकिर्दीची सुरुवात इंडिया ऑफिसमधील नोकरीतून केली, हे आपण जाणतो.
१९१३-१४ दरम्यान तो इंडियन फायनान्स अॅण्ड करन्सीच्या रॉयल कमिशनवर सदस्य म्हणूनही कार्यरत होता. १९१३मध्ये त्याने ‘इंडियन करन्सी अॅण्ड फायनान्स’ (Indian Currency and Finance) लिहिले.
सुवर्णविनिमय मानक (Gold Exchange Standard) या विषयावरील तो इंग्रजी भाषेतील सर्वोत्तम ग्रंथ असल्याचे शुम्पिटर म्हणतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, “the book of 1913 (उपरोक्त) contains none of those characteristic proposition of the book of 1936 (General Theory) that have been felt so “revolutionary”, the general attitude taken towards monetary phenomena and monetary policy by the Keynes of 1913 clearly foreshadowed that of the Keynes of the ‘Treatise’ (1930).
१९३०मधील पुस्तकातील मुख्य विधानाची पूर्वछाया १९१३मधील पुस्तकात दिसून येते असे शुम्पिटरला म्हणायचे आहे. तसे कसे तर, ‘add the theoretical implications of the English experience in the 20’s to the theory of ‘Indian Currency and Finance’, and you will get the substance of the Keynesian ideas of 1930.’
आज १९३०चे पुस्तक आणि १९३६चे क्रांतिकारक पुस्तक यांच्यातील प्रत्यक्ष संबंधाबाबत काही प्रश्न उपस्थित झाला तर त्यावर परत शुम्पिटरचेच विधान उद्घृत करायला हरकत नाही. त्याप्रमाणे १९३६ मधील ‘जनरल थिअरी’च्या प्रस्तावनेतच ‘Keynes himself claimed not more than that his teaching in 1936 seemed to him ‘a natural revolution of a line of thought which he had been pursing for several years.’ असे म्हटले आहे.
१९३० मधील केन्सलिखित ‘ट्रिटिज ऑफ मनी’ या ग्रंथाचा आणखी एका वेगळ्या संदर्भात शुम्पिटरने केलेला उल्लेखही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘It is there all the same, and not continued to the last book (VII) in which, among other things, we find all the essentials of Bretton Woods –what an extraordinary achievement!’
जिला केन्सप्रणित क्रांती म्हटले जाते तिचे थोडक्यात सूत्रबद्ध वर्णन शुम्पिटरने केले आहे. भांडवलशाहीच्या विकासात बचत नावाच्या प्रकारचे महत्त्व स्मिथपासून मार्शलपर्यंत जवळपास सर्वांनीच मान्य केले होते. बचतीतून गुंतवणूक असा नंतरचा प्रवास. मॅक्स वेबरने त्याचा संबंध प्रोटेस्टंट पंथाच्या शिकवणुकीशी लावला.
पण तो भाग वेगळा. केन्सच्या मतानुसार ‘who tries to save destroys real capital’ and that, via saving, ‘the unequal distribution of income is ultimate cause of unemployment’ (आणि केन्सने तर बेरोजगारीच्या प्रश्नाला अर्थशास्त्राच्या केंद्रस्थानी ठेवलेले) “This is what the Keynesian revolution amounts to.”
आता ज्याला केन्सचा संप्रदाय म्हटले जाते (Keynesianism) त्याबद्दलही शुम्पिटरचे मत चिंतनीय आहे. हा शब्दप्रयोग फ्रेंच, जर्मन, इटालियन संप्रदायासारखा सैल शब्द नसून एक ‘सोशिऑलॉजिकल एन्टिटी’ (Sociological Entity) असल्याचे शुम्पिटर सांगतो.
म्हणजे, ‘a group that professes allegiance to One Master and One Doctrine, and has its inner circle, its propagandists, its watchwords, its esoteric and its popular doctrine.’
इतकेच नव्हे तर ‘beyond the pale of orthodox Keynesianism there is a broad fringe of sympathizers and beyond this again are the many who have absorbed, in one form or another, readily or grudgingly, some of the spirit or some individual items of Keynesian analysis.
कदाचित याच अर्थाने नंतर फ्रीडमनने ‘we all are Keynesians now’ असे म्हटले असावे. ते काहीही असो. केन्सच्या हयातीतच त्याचे ‘इनर सर्कल’ तयार झाले होते. त्याला चक्क ‘सर्कस’ असे म्हटले जायचे.
स्वतः केन्सनेच या मंडळींचा कौतुकाने उल्लेख केलेला आढळतो. आर.एच. कुन्ह, जोन रॉबिन्सन (Joan Violet Robinson), हार्टवे आणि हरोड. काही उत्तरकालीन केन्स सांप्रदायिकांना अनुलक्षून रॉबिन्सनने ‘bastard Keynesian’ हा शब्दप्रयोग केला आहे. त्यावरून सांप्रदायिकांमधील स्पर्धाही दिसून येते.
मला शुम्पिटरची ही मांडणी कुन्हच्या ‘पॅराडाइम’च्या आणि त्याहीपेक्षा लॅकेटोसच्या ‘रिसर्च प्रोग्रॅम’च्या जवळ जाणारी वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.