योगिराज प्रभुणे
काश्मीर. ‘पृथ्वीवरील स्वर्ग’. नयनरम्य निसर्ग, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि अद्वितीय साहसी खेळ यांचा अनोखा मिलाफ. राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर पर्यटनाला चालना मिळाली आणि त्यात महाराष्ट्रातील पर्यटक आणि पर्यटन उद्योजकांची भूमिका महत्त्वाची ठरली. मात्र राजकीय अस्थिरता, सुरक्षा, पर्यावरणीय आव्हाने, पायाभूत सुविधा अशा काही मुद्द्यांवर अजूनही खूप काही होणे अपेक्षित आहे. योग्य दिशेने प्रयत्न झाल्यास काश्मीर आणखी बहरेल, असा विश्वास पर्यटन उद्योगाला आहे.
काये हसीन वादियां,
ये खुला आसमां
काश्मीरच्या भुरळ घालणाऱ्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या गीतातील ह्या ओळीमधून गीतकार पी. के. मिश्रा काश्मीरचे यथार्थ वर्णन करतात. आकाशाकडे झेपावणाऱ्या उत्तुंग हिमशिखरांचा हा अतिदुर्गम प्रदेश. काश्मीरचे सौंदर्य, तेथील मनोहारी पर्वतरांगा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली संस्कृती याचा अनुभव घेतल्यावर प्रत्येकजण शुभ्रधवल किरीट ल्यायलेल्या हिमालयाच्या प्रेमात पडतो.
गेल्या काही दशकांत काश्मीरच्या या सौंदर्याला गालबोट लावणाऱ्या घटना मागे सारत काश्मीर पर्यटन कात टाकते आहे. राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर ठळक होत गेलेल्या या बदलामध्ये महाराष्ट्रातील पर्यटक आणि पर्यटन उद्योजकांचाही मोठा वाटा आहे.