ग्रेट वेव्हचा निर्मिती काळ हा होकुसाईच्या आयुष्यातील बिकट काळ होता. पहिल्या पत्नीच्या अपमृत्युनंतर त्याने पुन्हा विवाह केला होता.
पण त्याची दुसरी पत्नीदेखील लवकरच मृत्यू पावली होती. (या दोन पत्नींपासून त्याला दोन मुलगे आणि तीन मुली झाल्या.) वयाच्या ५०व्या वर्षी आभाळातून पडलेल्या विजेने त्याच्या शरीरावर जोरदार आघात केला होता. त्यानंतर झालेल्या पक्षाघातामुळे त्याला ब्रश हातात धरणं मुश्कील बनलं होतं.
स्टुडिओला लागलेल्या आगीत अनेक चित्रं जळून भस्मसात झाली होती. जुगारी नातवाचं कर्ज फेडताना आर्थिक विवंचनेनं त्याचं मनःस्वास्थ्य हरपलं होतं. संकटं आणि अडचणींची भयंकर लाट होकुसाईला जणू आपल्या कराल पंजात चिरडत होती.